- पवन देशपांडे
कोरोनातून काही अंशी सुटका होत असल्याने आता उद्योग-व्यापारांनाही गती आली आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगारही परत सुरू झाले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून तळाशी असलेली घरांची विक्री आता जोर धरू लागली आहे. गृहकर्जही स्वस्त झाल्याने अनेकांचा घर घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांची मागणी वाढली आहे; पण याचा उलटा परिणाम तर होणार नाही, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत काही अंशी स्वस्तात, सवलतीत मिळणारी घरे महाग होणार का? सध्याचे चित्र काय सांगते?
घरांची मागणी वाढल्याची कारणे...
१. सात प्रमुख शहरांमध्ये आयटी आणि त्यासंबंधी उद्योगांतील नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरांचीही मागणी वाढली आहे.
२. उद्योग-व्यापारातील रोजगार कमी होणार नाहीत किंवा रोजगार जाण्याची फारशी भीती नाही. या सुरक्षित वातावरणामुळे घर घेण्याकडे कल वाढला आहे.
३. ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना आता आधीपेक्षा मोठे घर हवे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे अशा लोकांनीही घर खरेदी केल्याचे दिसते.
किमती कमी की जास्त?
१- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घरांच्या सरासरी दरांमध्ये जवळपास ३ टक्के वाढ झाली आहे. सध्याची मागणी पाहता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. घरांच्या किमती आणखी १० टक्क्यांनी वाढू शकतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
२- घरांची विक्री वाढावी, यासाठी बिल्डर्सकडून मिळणाऱ्या ऑफर्स कमी होण्याची शक्यता आहे.
३- शिवाय जोवर व्याजदर कमी आहेत, तोवर कर्ज घेऊन घर घेण्याचे प्रमाणही वाढतेच राहणार आहे. मागणी वाढल्याने अनेक विक्रेत्यांचा कल घरांच्या किमती वाढवण्याकडे असू शकतो.
कुठे, किती विक्री वाढली?
हैदराबाद- ३०८ टक्के
मुंबई महानगर- १२८ टक्के
चेन्नई- ११३ टक्के
कोलकाता- १०१ टक्के
पुणे- १०० टक्के
दिल्ली- ९७ टक्के
बंगळुरू- ५८ टक्के
(जुलै ते सप्टेंबर या काळातील गेल्या वर्षीच्या तुलनेतील टक्केवारी)
(सहायक संपादक, लोकमत)
pavan.deshpande@lokmat.com