लोकमत न्यूज नेटवर्क
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अँमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग आणि हवामान बदल. या सगळ्यांचा खूप मोठा फटका बसला तो वन्यप्राणी, कीटक आणि नैसर्गिक जैवसंपदेला.पक्ष्यांना; त्यातही स्थलांतरित पक्ष्यांनाही त्याची खूप मोठी झळ सोसावी लागली. अमेरिका आणि इतर काही देशांत तर अनेक पक्षी रस्त्यातच मरून पडल्याचं दिसून आलं.पण सगळ्याच स्थलांतरित पक्ष्यांना याचा फटका बसला किंवा बसेल का? भारतात काय परिस्थिती असेल?याचसंदर्भात बीएनएसचे संचालक संजय करकरे यांचं म्हणणं महत्त्वाचं आहे.ठिकठिकाणी पेटलेले वणवे आणि हवामान बदलाचा फटका तर सर्वांनाच बसतो, त्यातही त्या क्षेत्रात जे वन्यप्राणी आणि पक्षी राहतात त्यांना तो अधिकच बसतो.पण प्रत्येक स्थलांतरित पक्ष्याचा मार्ग ठरलेला असतो. भारतात असे नऊ मार्ग आहेत. त्याच मार्गाने हे पक्षी येतात आणि जातातही. त्यात काहीच बदल होत नाही. एखादेवेळी एखादा पक्षी भरकटला, किंवा वार्याच्या वेगाने भरकटत गेला, तरच त्याचा मार्ग बदलतो. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी लागलेल्या आगींमुळे भारतात येणार्या स्थलांतरित पक्ष्यांना काही धोका नाही. मंगोलिया, रशिया, युरेशिया, सैबेरिया, अफगाणिस्तान इत्यादी ठिकाणाहून पक्षी आपल्याकडे येतात. साधारण सप्टेंबरच्या सुरुवातीला हे पक्षी भारतातल्या विविध भागात यायला सुरुवात होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बरेचसे पक्षी आलेले असतात. आताही पक्षी आपल्याकडे यायला सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये मात्र त्यांच्या रिटर्न मायग्रेशनला सुरुवात होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लोकं घराबाहेर पडत नव्हते, लॉकडाऊन होतं, त्यामुळे प्राणी, पक्ष्यांचा मुक्त संचार बर्यापैकी वाढला होता, कारण त्यांच्यासाठी माणूस हा नंबर एकचा ‘शत्रू’. माणसांचं वास्तव्य जिथे वाढेल, तिथून बरेसचसे वन्यप्राणी, पक्षी कमी व्हायला लागतात. जगा आणि जगू द्या, हे माणसाला जेव्हा कळेल, तो सर्वांसाठीच सुदिन !.