-संजय मेश्राम.
पहाटेच्या स्वच्छ हवेत ती एकटीच फिरायला निघते. लांबच लांब. कधी हिरव्यागार निसर्गात. कधी विस्तीर्ण समुद्रकिनारी. अनवाणी. हवेवर उडणारी ओढणी नीट सांभाळत. उंचपुरी. वेगळाच रुबाब. चालण्यातही एक मोहक लय. तिच्या कवितेसारखी. मानेवर रुळणारे मोकळे केस. हवेत वेगळाच सुगंध भरलेला. खरं तर हवाच भारलेली. जवळून गेल्यास कुणीही हमखास मागं वळून बघणारच.
ती आपल्याच धुंदीत. तिची आपली स्वत:ची दुनिया. फुलांवरील दवबिंदूंचे छोटे- छोटे आरसे, पाकळ्यांची महिरप आणि वेलींची वेलांटी तिच्या नजरेतून सुटत नाही. फुलाला स्पर्श न करताही त्याची ‘खुशबू’ ती रोमारोमात भरून घेते. दुरून हे सर्व बघते. अलगद मागं सरकते. फुलपाखराला चाहूल लागली तरी उडून जाईल ना!
वाळूवरून चालत गेलेल्या कीटकाच्या पाउलखुणांची समांतर नक्षी तिला तिच्या गझलेच्या ओळी भासतात. त्यात ती तिचे रदीफ, काफिया शोधण्याचा अट्टाहास करते. फूल, सुवास, गीत, अथांग निळे पाणी हे तिचं आवडीचं विश्व.
तिला वाचनाची मोठी आवड. दिवसा खिडकीशेजारी बसून पुस्तकात रमते. तिच्या कवितांची जुळवाजुळव करते, गुणगुणते. खिडकीबाहेरील पानं त्या तालावर डोलतात. साथ देतात. ती पक्षांशी हितगुज करते. आपल्या दु:खाची छाया त्यांच्या घरट्यावर पडू नये, म्हणून सावध करते. चंद्राची किरणं तिच्या खिडकीच्या तावदानावर टिक-टिक करतात. रात्रीच्या एकांतात ती मस्त रमते. तोच तिचा यार. ती त्याची सखी. तिच्या कल्पनेला अशा एकांतात पंख फुटतात. फुलपाखरू होऊन उडू लागतात. ती समाधानानं दिलखुलास हसते. मात्र ओठांतून हसू सांडणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेते. गार हवेची झुळूक हरवलेल्या क्षणांची याद घेऊन येते. ती थोडं स्मित करते. आनंदून जाते. पुढच्याच क्षणी तिचा चेहरा कोमेजतो. हृदयाची ही चलबिचल ती लिहून काढते. मग कसं मोकळं मोकळं वाटतं तिला.
तिनं काही काळ गाणं शिकण्याचा प्रयत्न केला. नंतर कविता करायला लागली तर गाणं कायमचं सुटलं. तिनं उच्च शिक्षण घेतलं आहे. मोठ्या पदावर काम करायची. एकदा तर परीक्षेत तिच्याच कवितासंग्रहांवर प्रश्न विचारण्यात आला होता.
तिचं बोलणं अगदी हळुवार तरीही सुस्पष्ट. कसलाही अविर्भाव नाही. तिच्या वागण्या- बोलण्यातही कमालीचा साधेपणा. खरं तर हेच तिचं वैशिष्ट्य. ती म्हणते, मी जी आहे, ती तुमच्यासमोर आहे. बस्स. तिच्या बोलण्यात कधी अवजड शब्दांचा मारा नसतो. तिला त्याची गरज वाटत नाही. सुंदर वाक्य, सुंदर प्रसंग, सांगण्याची शैली याशिवाय सुंदर निसर्ग, सुंदर संगीत या गोष्टी तिला खूप भावतात. तिच्या हृदयाला स्पर्शून जातात.
तिच्याजवळ कायम एक छोटीशी डायरी असते. कधी कुठं काही सुंदर सुचलं, काही सुंदर दिसलं तर ती डायरीत टिपून घेते. तिच्या मते, सौंदर्याबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. मला सुंदर वाटेल ते इतरांना सुंदर वाटेलच असं नाही.
तिला आयुष्याच्या पायवाटेवर बरेच खाचखळगे लागले. बरेच झटके बसले. तिनं धैर्यानं त्यांचा मुकाबला केला. हे सांगताना तिच्या चेहऱ्यावर दु:खाची कसलीही रेषा उमटत नाही. दु:खातून ती मार्ग काढत राहिली. ओठांवर बळजबरीनं हसू आणण्याचा ती प्रयत्न करीत राहिली. त्याचवेळी तिच्या डोळ्यांतील काजळ मात्र भिजत असायचा. तिला तिची विनोदबुद्धी आवडते. तिच्यात क्षमाशील वृत्ती ओतप्रोत भरली आहे. यामुळं ती दु:ख हलकं करू शकली. त्यातून मार्ग काढू शकली. स्वत:वर पुरेपूर प्रेम करू शकली. तिनं मित्रांचा फार मोठा गोतावळा जमा केला नाही. ‘आपण काही न सांगताही आपल्या मनातलं ओळखतो, तोच खरा मित्र!’ ही तिनं केलेली मैत्रीची व्याख्या. अशा समजूतदार मित्रांची संख्या इन मिन तीनच असणार.
तिचं स्मित हाच तिचा खरा दागिना. नवनवीन पोशाख, गाडी, संपत्ती याची तिला हौस नाही. एकच हौस, ती म्हणजे पुस्तकं गोळा करणं. विविध भाषांमधली काही हजार पुस्तकं होती तिच्या संग्रहात. त्यामुळं तिला आपण एकटे आहोत, असं कधी वाटलंच नाही.
ती म्हणते, आपण आपल्या मनातील प्रतिमेच्या शोधात असतो. कुणी तरी भेटावं आपल्या मनासारखं. आपलं सर्व काही त्याला सांगावं, खुशाली विचारावी, सुख-दु:खाच्या गोष्टी त्याच्याशी वाटून घ्याव्या, असं वाटतं. असं हक्काचं ठिकाण मिळालं, तर तो आनंद काही औरच असतो. ते सर्वांना मिळेलच असं नाही. मिळालं तर ते कायम टिकेलच असंही नाही. शेवटी आपण माणूस आहोत. आकाशातून अवतरलेले देवदूत नाही. चुका होऊ शकतात. गैरसमज होऊ शकतात. त्यातून आपणच समंजसपणे मार्ग काढू शकतो. एकमेकांना सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंसह स्वीकारलं असेल तर टोकाची भूमिका घेण्याची वेळ येणारच नाही.
ती बोलत असते... प्रेम, प्रीती, अनुराग, इश्क, मुहब्बत काहीही म्हणा, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. मौनाचीसुद्धा भाषा असते. संवादातील विराम किंवा शांततासुद्धा बोलकी असते. सुवास दाखवता येतो का? सांगता येतो का? नाही ना! हळूच डोळे मिटून तो मनातल्या मनात अनुभवायचा असतो. आपण एकमेकांची किती काळजी घेतो, किती जपतो, हे फार महत्त्वाचं असतं. मात्र आपल्या अपेक्षांमुळे कुणी गुदमरून तर जात नाही ना, याचाही विचार करावा. प्रत्येकाला आपला एक अवकाश हवा असतो. तो जपायला हवा.
तिला तिच्या आवडत्या विषयांवर बोलतं केलं तर ती अशी मनमोकळी बोलते. ती शांतताप्रिय आहे. तिला तोंडाला कुलूप लावून बसणं खूप आवडतं. या अवस्थेत आपल्याला आपल्याशी भेटता येतं. संवाद साधता येतो. यासाठी फार संयम हवा असतो.
तिला चाहत्यांची अनेक पत्रं यायची. एका आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती. त्याला तिच्या कवितांचं पुस्तक वाचायची इच्छा होती. तिनं मोठ्या मनानं त्याची इच्छा पूर्ण केली. यातून तिला फार समाधान मिळालं. ती सांगते, एखाद्या गोष्टीकडं बघण्याची तुमची दृष्टी काय, यावर तुमचा आनंद किंवा दु:ख अवलंबून असते. दु:ख गोंजारत बसू नये. हरवलेल्या स्वप्नांचा ठावठिकाणा शोधात बसू नये. आपलं मस्त जगावं आनंदात. स्वत:साठी!
ती अखेरपर्यंत आनंदात जगली। केवळ उर्दूच नव्हे तर सारं साहित्यविश्व तिला परवीन शाकिर नावानं ओळखतं.