- स्नेहल जोशी गेले काही रविवार आपण चर्चा करत आहोत ती यांत्रिकीकरण, औद्योगिक क्र ांती, महायुद्ध, समाजाचे बदलते विचार आणि आधुनिकतावाद याबद्दल. या सगळ्यातून ‘इंडस्ट्रियल डिझाइन’ जन्माला आलं. नव्या वस्तू नवीन पद्धतीने कारखान्यात तयार होऊ लागल्या; पण औद्योगिकीकरणाचा परिणाम भारतावर काय झाला?भारत इंग्रजांच्या ताब्यात होता. आपलं अर्थार्जन हे कृषिमालावर, मसाल्यांवर अवलंबून होतेच; पण त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात कपडा उत्पादनावरही अवलंबून होते. भारतीय सुती कपडा, कुयर्यांची नक्षी, ठोकळ्याची छपाई, बांधणी, इकत-पटोळा-पैठणीसारखे हातमागाचे प्रकार, नीळ (इंडिगो)चा डाय, हे सगळेच हस्तव्यवसाय जगप्रसिद्ध होते. हस्तकलेची रेलचेल असलेल्या आपल्या भारतासमोर यांत्रिकीकरण आलं ते कापड गिरणीचं रूप घेऊन. 1850च्या दशकात पहिली कापड गिरणी यशस्वीरीत्या सुरू झाली. इंग्रजांनी भारतात तयार कपड्यावर बंदी घालून इंग्रजी कपडा आपल्यावर लादला. भारतात गिरण्या थाटून, कच्चा माल शेतकर्यांकडून कावडीच्या भावात घेऊन, कपडा उत्पादन सुरू केलं; ते चढय़ा भावावर निर्यातसुद्धा केलं. अतिशय क्रूर पद्धतीने भारतीय हातमाग व्यवसाय नष्ट केला जात होता. 1920-30 दरम्यान, जवळ जवळ 70 वर्षे लोटल्यावर स्वदेशी चळवळ उभी राहिली. हातमाग आणि हस्तव्यवसाय पुनरुज्जीवित करण्यासाठी खादी हा पाया ठरला; तरीही या कार्याला खरी गती मिळायला बराच वेळ लागला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, सर्वाधिक लोकसंख्या खेड्यांमध्ये वसली होती. तिथे प्रगती झाल्याशिवाय आपला देश आर्थिकदृष्ट्या सबळ झाला नसता. तेव्हा खेड्यांचा विकास, म्हणजेच हस्तव्यवसाय, हातमाग यांचं पुनरु ज्जीवन करणं अनिवार्य होतं. त्यामुळे अर्थकारणाबरोबर, जनतेचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान यावरही सकारात्मक परिणाम साधला जाणार होता; पण एव्हाना गिरण्या चांगल्याच स्थिरावल्या होत्या आणि त्यातून रोजगारही खूप निर्माण झाला होता. सरकारच्या बरोबरीने बरेच लोक याबाबत कार्यरत होते. अहमदाबादमध्ये प्रख्यात कला-इतिहासतज्ज्ञ डॉ. आनंद कुमारस्वामी यांच्या प्रेरणेतून, गौतम आणि त्यांची बहीण गिरा साराभाई यांनी भारतातल्या सगळ्या हातमाग कलांचं सर्वेक्षण केलं. त्या अभ्यासातून 1949 मध्ये कॅलिको टेक्सटाइल म्युझियमचं नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झालं. इथे संपूर्ण देशातले हातमागावर तयार केलेल्या कापडांचे नमुने प्रदर्शित केले गेले आहेत. भारत सरकारनेदेखील देशातल्या हस्तमाग व्यावसायिकांचा आढावा घेतला. त्यातून 1950च्या दशकात दिल्लीच्या प्रगती मैदानावर भव्य हातमाग प्रदर्शन भरवण्यात आलं. 1955 साली कर्वे कमिशनने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. एक म्हणजे गिरणी आणि पॉवरलूमवर कापड उत्पादनाला बंधन घातलं; दुसरं हातमागाच्या विकासाकरिता संस्था स्थापन करण्याचं ठरलं. त्याप्रमाणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅण्डलूम टेक्नॉलॉजी ही हातमाग तंत्रज्ञानावर नवीन संशोधन करणारी संस्था आणि हातमाग कलाकारांच्या प्रशिक्षणार्थ विवर्स सर्व्हिस सेंटरची चार केंद्रे देशात सुरू झाली. त्यापाठोपाठ अहमदाबादला ‘एनआयडी’ (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन)मध्ये टेक्सटाइल डिझाइनची शाखाही सुरू झाली. खादी आणि हातमागाच्या विकासासाठी सगळीकडून प्रयत्न चालू होते. त्यातला डिझाइनच्या दृष्टीने महत्त्वाचा असा एक प्रयत्न सविस्तर सांगायलाच हवा.हैदराबादपासून 50 कि. मी. अंतरावर नालगोंडा जिल्हा आहे. त्यात हातमाग व्यवसाय असलेल्या चंदूर, यल्लंकी, र्शीरामपूर, पोचमपल्ली असा 80 खेड्यांचा समूह आहे. इथला रेशमी ‘तेलीया रूमाल’ वर्षानुवर्षे जगभर निर्यात केला जात होता. इकत हातमागाच्या पद्धतीत धागा रंगवण्याला खूप महत्त्व आहे. मागावर विणकाम करण्याअगोदर नक्षीचा आराखडा मांडावा लागतो. त्यात किती रंग असतील, कुठे चढवले जातील याचं संपूर्ण नियोजन केलं जातं. त्याप्रमाणे ताना किंवा बाना किंवा दोन्ही धागे ‘रेझिस्ट डाय’ पद्धतीने रंगवले जातात. जितके रंग जास्त तितकी ही प्रक्रि या क्लिष्ट होत जाते. इंग्रजी राज्यात या व्यवसायाची संपूर्ण वाताहत झाली होती. वर नमूद केल्याप्रमाणे इथेही सरकारी प्रयत्न चालू होतेच; पण पोचमपल्ली ‘इकत’चं जे रूप आज आपण पाहतो त्यामागे केशव आणि बिना राव या डिझायनर दांपत्याचा मोलाचा वाटा आहे. अहमदाबादच्या ‘एनआयडी’मध्ये टेक्सटाइल डिझाइनचं शिक्षण पूर्ण करून बिना यांनी आपल्याच गावी काम करायचं ठरवलं. 1980च्या दशकातही नालगोंडा जिल्ह्यातल्या हातमाग व्यवसायाची परिस्थिती फार बरी नव्हती. तयार होणारा कपडा, लोकांची आवड आणि बाजारपेठ यांचा ताळमेळ बसत नव्हता. अशात बिना आणि केशव यांनी ही परीस्थिती बदलण्याचा चंग बांधला. डिझाइनचे शिक्षण घेतल्यामुळे त्यांना सगळ्या प्रक्रियांचं तंत्र अवगत होतंच, त्याबरोबर फॅशनचंदेखील ज्ञान होतं. त्यांनी इकत कलाकारांच्या अडचणी समजून घ्यायला सुरु वात केली. परंपरागत पद्धतीचं दस्तऐवजीकरण सुरू केलं. हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी शेतीची पद्धत ठरवायला हवी. त्यासाठी निळीची लागवड करण्यापासून सुरु वात केली. चांगल्या प्रतीचे रंग तयार केले. कलाकारांचं नव्या बाजारपेठेशी नातं तुटल्यामुळे कामात एक प्रकारची मरगळ निर्माण झाली होती. ती दूर करण्यासाठी डिझाइनची शिबिरं घ्यायला त्यांनी सुरु वात केली. नवीन फॅशनसाठी नवीन नक्षी कशी तयार करायची, त्याचं नियोजन कसं करायचं, वेगळे धागे कसे वापरावे याबद्दल प्रशिक्षण गावकर्यांना त्या देऊ लागल्या. विवर्स सर्व्हिस सेंटरमध्ये माग सुधारण्याचे प्रयत्न चालू होते. तेव्हा इकतबरोबर जरीची बुट्टी विणकामात आणायला मदत झाली. अशाप्रकारे लहान लहान बदल करत, जिथे इकतचे फक्त तेलीया रूमाल तयार होत होते, तिथे आता सुती आणि रेशमी ड्रेस मटेरिअल, शर्ट पीस, साड्या, पडदे, गाद्या, गालिचे, सोफे. यासाठीचा सगळ्या प्रकारचा कपडा तयार होऊ लागला. आणि मुख्य म्हणजे देशी-विदेशी बाजारात योग्य भावात विकला जाऊ लागला. 10 वर्षांच्या कालावधीत पोचमपल्ली इकतचा खरोखरच कायापालट झाला. सरकारी योजना आणि डिझाइन हे एकमेकांना पूरक ठरले. नालगोंडामध्ये आज तरु ण पिढी हातमाग व्यवसायाकडे परत आली आहे यातच सारं काही आलं.
snehal@designnonstop.in(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)