कार्स्टन विके
रु द्रवीणा नावाच्या वाद्याचे नाव ऐकलेय तुम्ही? बहुदा नसेल ऐकले. आपल्या संगीत मैफली, महोत्सव, संगीताच्या खासगी बैठका यामध्ये कुठेच सहसा आमंत्रण नसलेल्या (आणि त्यामुळे न दिसणार्या!) या वाद्याचे नाव तुम्ही ऐकणार तरी कुठे आणि कसे? शास्रीय संगीताच्या मैफलींची एवढी गजबज आत्ता-आत्तापर्यंत देशभरात सुरू असताना आणि सतार, संतूर, सरोद, बासरी अशी तर्हेतर्हेची वाद्य या मैफलींमधून रसिक र्शोत्यांची तुडुंब दाद घेत असताना रु द्रवीणेकडे रसिक अशी का पाठ फिरवतील? या प्रश्नाचे नेमके उत्तर मिळणे जरा अवघड. कदाचित र्शोत्यांच्या अभिरु चीकडे बोट दाखवणारे वाटेल ते. गेल्या काही दशकापासून आम्हाला सोप्पे, झटकन मनाची पकड घेणारे, वादन सुरू होताच माहोल निर्माण करणारे असे संगीत आवडायला लागले आहे कदाचित. असं म्हणताना मी आजच्या कोणत्याही वाद्याला कमी लेखत नाहीय. पण जगण्याच्या आपल्या प्रत्येकच निवडीमध्ये हवे ते चटकन मिळवण्याची ही घाई आली आहे आता. मग संगीत त्याला अपवाद कसे असेल? मोजक्याच दोन-तीन स्वरांसोबत मैफल सुरू करीत, त्या स्वरांमधील परस्परसंवादाची नाजूक कलाकुसर अनुभवत, त्या वाद्याच्या स्वराचा आपला असा काही बाज असतो तो जोखत-अनुभवत मैफल ऐकायची तर त्या मैफलीत काही तास मांडी ठोकून बसावे लागते. कलाकाराला अवचित सुचणारा आणि र्शोत्याला व्याकूळ करून टाकणारा एखादा आलाप कानावर पडेपर्यंत जीव मुठीत धरावा लागतो. आणि असा निवांतपणा असल्यावर त्या रागाच्या चहू दिशांनी उजळत जाणार्या रूपाचे तेज झेपणे हे कोणा ऐर्यागैर्याचे काम नाही..! हा निवांतपणा आणि जातिवंत सुंदर क्षण वाट्याला यावा यासाठी करावी लागणारी साधना करण्याचा संयम आम्ही गमावला आणि रु द्रवीणा आमच्या मैफलींमधून मागे-मागे सरत गेली..! आणि तरीही, मी मात्र माझ्या मातृभूमीला निरोप देऊन, जगण्यासाठी भारताची निवड करून या वाद्याची साधना करतो आहे. कारण? खर सांगू, ही निवड मी नाही, आपले बोट धरून चालवणारा तो जो कोणी आहे त्याने केली आहे. त्यानेच माझ्या मनात या माझ्या वाद्याबद्दल इतके अथांग प्रेम भरले आहे की, मी त्याशिवाय माझ्या आयुष्याचा विचार करूच शकत नाही..पूर्व र्जमनीमधील एक छोटेसे गाव ते भारतातील कोलकात्यासारखे महानगर हा काही हजार मैलांचा प्रवास छोटा नाही आणि सोपापण नाही. पण तो करण्याची इच्छा माझ्या मनात निर्माण केली ती र्जमनीमधील माझ्या घरी मी ऐकलेल्या भारतीय संगीताने. मी जेमतेम विशीत असेन तेव्हा. पूर्व र्जमनीमध्ये राहणारे आम्ही सगळेच त्यावेळी एका विलक्षण अनुभवातून जात होतो. पूर्व आणि पश्चिम असे आमच्याच देशाचे दोन तुकडे पाडणारी भिंत जमीनदोस्त होण्याच्या अनुभवातून. भिंत पडण्यापूर्वीचे आयुष्य सोपे होते. अगदी साधे, फक्त गरजा भागवणारे आणि पोट भरणारे. पण भिंत पडली आणि महापूर यावा तशा आमच्या बाजारपेठा तर्हेतर्हेच्या वस्तूंनी ओसंडून वाहू लागल्या. कालपर्यंत आम्हाला एकाच कंपनीचे चॉकलेट, गाडी आणि कपडे मिळत होते. आता शंभर ब्रॅण्ड्स आमचा अनुनय करू लागले. हे सगळे खिशाला न परवडणारे, पण मोहाच्या जाळ्यात खेचणारे होते. या तुफानात मी स्वत:ला काठावरच ठेवू शकलो कारण, सुदैवाने याच काळात माझ्या घरात आलेल्या काही पाहुण्यांमुळे भारतीय संगीत आणि त्याबरोबर योग आणि ध्यान याची माझी तोंडओळख झाली होती. लहान असताना कधीतरी आईने ढकलले म्हणून मी व्हायोलिनवादन शिकलो; पण कागदावर लिहिलेल्या त्या रचना बघत वाजवणे मला फार कंटाळवाणे आणि निर्जीव वाटत होते. त्यामुळे त्या वाटेवर मी तत्काळ भलीमोठी फुली मारली आणि संगीताच्या वाटेला न जाण्याचा निर्धार केला. त्या कॅसेटमधून कानावर येत असलेले एन. राजम यांचे व्हायोलिन आणि झाकीर हुसेन यांचा तबला ऐकताना सर्वात प्रथम जाणवली ती त्या संगीतातील उत्स्फूर्तता आणि ताजेपणा. हा कुठून आला या संगीतात? मग, खिशात होते ते पैसे घेतले आणि भारताची वाट धरली तेव्हा मी जेमतेम वीस वर्षाचा होतो. त्यानंतरचे कित्येक हिवाळे मी भारतात काढले. मला ध्यानात अधिक खोलवर जायचे होते आणि भारतीय संगीताची नीट ओळख करून घ्यायची होती. दोन्हीकडे साधना होती. त्यासाठी गुरु अनिन्दो चॅटर्जी यांच्याकडे आधी तबल्याचे शिक्षण सुरू झाले. त्या काळात मला जाणवले, कोलकत्याच्या हवेतच संगीत आहे त्यामुळे तिथे माणसे भेटत होती ती एकतर गाणे म्हणणारी किंवा गाण्यावर बोलणारी! त्या काळात कोलकात्यात होणार्या संगीत मैफलींना हजेरी लावत मी हे संगीत आणि त्यामागे उभी संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. अशाच एका मैफलीत रुद्रवीणेबद्दल प्रथम ऐकले! रु द्रवीणा. किती कहाण्या आहेत या वाद्याभोवती. संहार करणारा अशी ज्याची ख्याती त्या शिवाने निर्माण केले हे वाद्य. पार्वतीचे अनुपम सौंदर्य बघत असताना त्याच्या तोडीचे काही निर्माण करायचे या इच्छेतून निर्माण झालेले. शिवाला प्रिय ते त्याच्या भक्तांनाही प्रिय, म्हणून ते योगी आणि तपस्वी यांच्या साधनेत आले. मन स्थिर आणि शुद्ध करीत, साधनेच्या अत्युच्च क्षणी अनुभवाला येणारा अनाहत नाद वास्तव जीवनात त्यांना पुन्हा ऐकू आला तो या वीणेतून. त्यामुळे या वाद्याला असलेले दोन तुंबे/भोपळे हे दोन जगांचे प्रतीक मानले गेले. एक, पाय मातीवर ठेवणारे भौतिक जग आणि दुसरे, अनाहताची ओढ लावणारे पारलौकिक जग. असे वाद्य मनोरंजन, करमणूक यासाठी काय उपयोगाचे? नीरव अशा शांततेची ओढ लावते ते. उपासनेचा एक भाग झाल्यावर साधूंनी ते आपल्याबरोबर मंदिरात नेले आणि तेथून ते आले राजदरबारात होणार्या मैफलींमध्ये..! भारतीय संगीतात एक हीलिंग पॉवर, स्वस्थ करण्याची ताकद आहे हे मला एव्हाना समजले होते; पण या वाद्याने त्याच्यापलीकडे असलेल्या अज्ञात पारलौकिकाची ओढ लावली आणि मला माझ्या जगण्याचा हेतू मिळाला.! खूप शोधानंतर गुरु उस्ताद असद अली खां भेटले तो क्षण मला अजून आठवतो. दिल्लीमधील त्यांच्या घरातील त्यांच्या खोलीत पाय ठेवला आणि त्यांनी माझ्याकडे बघितले तेव्हा मला जाणवले, माझे आयुष्य आरपार बदलणारा हा क्षण आहे. धृपद गायकीची जी चार प्रमुख घराणी आहेत त्यापैकी लयाला जात असलेल्या खंडर घराण्याचे ते प्रतिनिधी. अर्थात तेव्हा केवळ धृपद गायकीच लयाला जाण्याच्या बेताला होती असे नाही तर तिच्याबरोबर वीणा हे वाद्य बनवणारे कारागीर (खरं म्हणजे तेही कलाकारच!) पुढच्या पिढीच्या हाती आपले संचित न सोपवताच निरोप घेऊ लागले होते..! संचित घेण्यासाठी सिद्ध होतच नव्हते त्याला ते तरी काय करणार ! मग मी ठरवले, केवळ वीणावादन नाही शिकायचे तर वाद्य बनवण्याची कलापण शिकायची. रु द्रवीणा बनवणारा शेवटचा कारागीर मुरारी मोहन यांच्या निधनानंतर, जवळजवळ वीस वर्षांपूर्वी भारतात स्थायिक होण्यासाठी आलो. 90 साली ज्या शहरात मी प्रथम आलो होतो त्या कोलकात्याची निवड केली. र्जमनीसारख्या देशातून भारतात स्थायिक होण्यासाठी येणे हे सांस्कृतिक धक्का देणारे नव्हते का, असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. तेव्हा मला जाणवते, मी पूर्व र्जमनीत वाढलो हे एका अर्थाने उपकारकच होते. अतिशय साधे, किमान गरजांमध्ये जगण्याचे धडे मला माझ्या देशाने दिले. त्यामुळे भारतात येऊन राहणे हे मला कधीच अवघड वाटले नाही. पण इथे आल्यावर जाणवलेली एक बाब अस्वस्थ करणारी होती. 25-30 वर्षांपूर्वी ज्या भौतिक समृद्धीच्या लाटांवर र्जमनीसारखी राष्ट्रे स्वार होती आणि हळूहळू या भौतिक सुखांच्या चवीची व्यर्थता अनुभवल्यावर भारतीय संगीत, योग, ध्यानधारणा याकडे वळली ती लाट भारतातून मात्र अजून ओसरलेली नाहीये. आणि म्हणून धृपद गायकी कालबाह्य होत गेली. रु द्रवीणा वस्तुसंग्रहालयापुरती उरली! विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि मला सांगतात, ‘मला तोडी शिकायचा आहे, महिनाभरानंतर होणार्या स्पर्धेत मला तो म्हणायचा आहे..’ तेव्हा मला आठवते, गेल्या दोन दशकांपासून माझी साधना सुरू आहे की! हातावर सुपारी घेऊन तोंडात टाकण्याइतके संगीत सोपे नाही म्हणूनच ते हजारो वर्ष जिवंत आहे हे कोणी सांगायचे ह्या पिढीला? मन:शांतीचा, आपल्या आतील जगाला जोडून देणार्या आयुष्याचा शोध घेणार्या पाश्चिमात्य लोकांनी धृपदसारखी वेदपठणाशी नाते सांगणारी आणि देवतास्तुती करणारी गायकी उचलून धरली त्यामुळे भारतात आता पुन्हा तिला पूर्वीचा सन्मान मिळू लागला आहे. तेव्हा मला माझ्या गुरु जींचे एक वाक्य नेहेमी आठवते. ते म्हणायचे, ‘कलाकार घडवणे ही वेगळी गोष्ट, तुम्ही जेव्हा वीणावादक घडवता तेव्हा तुम्ही एक माणूस, चारित्र्य घडवत असता..!’ नव्याने धृपद गायकीकडे आणि वीणावादनाकडे वळणार्या या देशासाठी ही भविष्यवाणी समजायची का?
कोण आहेत कार्स्टन विके?धृपद अंगाने वीणावादन करणारे जे अगदी मोजके कलाकार भारतात आज आहेत त्यातील एक आघाडीचे कलाकार. र्जमनीत जन्म झालेले कास्र्टन भारतीय योगशास्र आणि ध्यानधारणा याच्या ओढीने आधी भारतात आले आणि त्या वाटेवर त्यांना भारतीय राग संगीत भेटले. पाश्चिमात्य संगीतापेक्षा अगदी भिन्न जातकुळीच्या या संगीताच्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी तबल्यापासून केली आणि मग त्यांना रूद्रवीणा या आदिम वाद्याच्या गूढ स्वरांनी मोहिनी घातली. रु द्रवीणा वाजवणार्या कुटुंबातील सातव्या पिढीचे प्रतिनिधी उस्ताद असद अली खान यांच्याकडे त्यांनी या वाद्याचे शिक्षण घेतले आहे. देश-परदेशात होणार्या अनेक महत्त्वाच्या धृपद महोत्सवात त्यांनी आजवर हजेरी लावली आहे. आता भारतात स्थायिक झालेल्या या कलाकारचे वैशिष्ट्य म्हणजे, रु द्रवीणा बनवणारे कुशल कारागीरच आता उरलेले नसल्याने हे वाद्य बनवण्याची कला त्यांनी अवगत केली आहे आणि आजवर स्वत:च्या वापरासाठी आठ वाद्यं तयार केली आहेत.
मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे vratre@gmail.com(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)