- डॉ. सॅम इव्हान्सउस्ताद झाकीर हुसेन यांचे तबलावादन असलेली एक रेकॉर्ड हातात आणि मनात अफाट कुतूहल, एवढा ऐवज घेऊन विसेक वर्षांपूर्वी भारतात प्रथम उतरलो. इथे पोहोचण्यापूर्वी कित्येक मैल तुडवून झाले होते. एकाच उद्देशाने. जगभरातील विविध देश आणि त्यांच्या संस्कृतीने सांभाळून ठेवलेले त्यांच्या मातीचे संगीत ऐकायचे होते, जाणायचे होते आणि त्यातून टिपायचे होते माझ्यासाठी माझे स्वर. जेमतेम अठरा वर्षांचा असेन. जगाच्या दृष्टीने कदाचित अगदी अपरिपक्वसुद्धा. पण पाचव्या वर्षापासून भावाच्या गिटारला ड्रमची साथ करू लागलो तेव्हापासून मनात उत्सुकता वाटू लागली ती आधी माझ्या हातात असलेल्या ड्रमबद्दल. मग त्याच्या साथीने निर्माण होणार्या संगीताबद्दल. थोडा जाणता होत असताना ड्रमिंगच्या वेगवेगळ्या परंपरा जाणून घेण्याचा प्रय} करू लागलो. ऑस्ट्रेलियातील एका अगदी छोट्या वोगावोगा नावाच्या गावात वाढतांना असे कोणते आणि कितीसे संगीत कानावर पडणार? पण ते ऐकून मनात प्रश्नांचा धुमाकूळ सुरू झाला. माझ्या गावाच्या बाहेरच्या जगाचे संगीत कोणते असेल? ते कोणी निर्माण केले आणि सांभाळले असेल? काय असतील या संगीताच्या कहाण्या? शहर आणि गावं यांच्या गाण्यांच्या चुली वेगळ्या असतील की त्यांच्यामध्ये असेल एखादा दुवा? या आणि अशा अनेक प्रश्नांनी जन्म दिला तो ‘म्युझिकल जर्नी’ नावाच्या माझ्या साहसी प्रयोगाला.प्रयोग वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताचा शोध घेत केलेली मनसोक्त भटकंती. गावाच्या सीमेबाहेरचे आयुष्य फारसे बघितले नसताना एवढा मोठा पल्ला मारण्याचा विचारसुद्धा वेडेपणाचा होता; पण मी खांद्यावर सॅक अडकवून निघालो होतो.! या भटकंतीत कुठे मुक्काम ठोकून फार काळ राहण्याचा अजिबात इरादा नव्हता. तरीही कसा रेंगाळत राहिलो भारतात? आणि कोलकात्यात वेळोवेळी भरणार्या संगीत मैफलींमध्ये? मैफल संपली की धावत ग्रीनरूममध्ये जाऊन तबला साथीदाराला गाठून विचारायचो, ‘मला काही धडे द्याल तबल्याचे?’ असे बर्याच गुरुंचे उंबरठे झिजवून झाले. कुठेच फार काळ रमलो नाही. नेमका कसला शोध होता मला? याचे अगदी टोकदार उत्तर नव्हते माझ्याकडे. पण थकून थांबावे असेही कधी वाटले नव्हते. या दोन वर्षात किती मैफली ऐकल्या त्याची मोजदाद करणे अवघड. अशाच एका मैफलीनंतर भेटले पंडित अनिंदो चॅटर्जी आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळतेय असे वाटू लागले. त्यांच्याकडे शिकायला जाऊ लागलो. दोन तीन दिवस फक्त इतरांचे ऐकत होतो. गुरुजी कसे शिकवतात ते बघत होतो. मग एक दिवस त्यांनी मला जवळ बोलावले आणि फटाक्यांची एक भली मोठी पेटलेली लड अंगावर टाकावी तसे तबल्याचे बोल ऐकवून म्हणाले, ‘याचा सराव कर आणि उद्या ऐकव मला..’ काय होते हे नेमके? काही क्षण बधीर झालो मी. घरी गेलो. अनेक गुरुंकडून ऐकलेले, हाताखालून गेलेले असे बरेच काही आतवर झिरपले असावे. गुरुजींनी एका दमात म्हटलेल्या तबल्याच्या बोलांची ती भली मोठी मालगाडी मला जणू डोळ्यापुढे दिसत होती आणि ते कसे वाजवायचे ते मला माहिती होते. दुसर्या दिवशी गुरुजींनी ते ऐकले आणि मी अनिंदो गुरुजींचा शिष्य झालो..!सतरा-अठराव्या वर्षापयर्ंत भान हरपून ड्रम वाजवणारा मी, एकाएकी झपाटल्यासारखा तबल्याबरोबर तासनतास कसा घालवायला लागलो? गुरुजींचे शिष्यत्व सोपे अजिबात नव्हते. कारण त्यात सरावाखेरीज दुसरे काही नव्हतेच. नास्ता किंवा जेवण अशा काही किरकोळ; पण अपरिहार्य बाबी सरावाच्या दोन सत्रांमध्ये असायच्या, एरवी साधारणपणे रोज किमान दहा तास सराव करावा लागायचा. तरुण वयात सक्तमजुरीच वाटावी असा हा दिनक्रम मी तब्बल दहा वर्षं जगलो. पण अगदी क्वचितच त्याला कंटाळलो. कारण एकच, माझ्या हातात आलेले तबला नावाचे वाद्य रोज माझ्यापुढे नवीन कोडे टाकीत असे आणि मजा म्हणजे तरीही मला त्याचा राग येत नसे. तबल्यावर माझे इतके नितांत प्रेम बसण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यात असलेला सूर. कोणी यावे आणि हातात घेऊन कशी थाप द्यावी त्याच्यावर असा मध्यमवर्गीय साधेपणा नाहीय त्यात. आधी त्याला सुरात मिळवून घ्यावे लागते तेव्हा कुठे ती थाप लक्ष वेधून घेते. एखाद्या ताल वाद्याला सूर असू शकतो हे कुठे ठाऊक होते मला? मग जाणवले ते या वाद्याचे भारतीय संगीतात असलेले महत्त्व. भारतीय संगीतासाठी हे निव्वळ तालवाद्य किंवा साथीपुरते असलेले वाद्य नाही. गायनाच्या किंवा एखाद्या वाद्याच्या मैफलीत साथ करणार्या तबल्याचेसुद्धा स्वतंत्र असे काही म्हणणे असते; जे त्याला त्या मैफलीत सांगायचे असते. वाद्याच्या किंवा गायकाच्या त्या मैफलीतील स्वरांशी नाते जुळल्यामुळे हे घडते. आणि ते त्या मैफलीत जो रंग भरलेला असतो त्याचा एक भाग असते.मला तबला आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे, त्यात असलेली समृद्ध सामग्री. बोल, कायदे, परन, रेला. प्रत्येकाची वेगळी लय. नृत्यात वाजणारा तबला वेगळा, गायकाला साथ करणारा वेगळा आणि स्वतंत्रपणे वाजणारा त्यापेक्षा वेगळा. बोल तेच; पण प्रत्येक वेळचा अंदाज भिन्न. हे सगळे ऐकताना वाटले, कसे मुठीत येणार हे सगळे? आणि मग शिकता-शिकता समजत गेले, माझ्या बोटात आले आहे त्यापेक्षा गुरुंच्या आणि कलाकारांच्या हातात असलेले बरेच काही बाकी आहे जे अजून माझ्या कानावरसुद्धा पडले नाहीय..! मग स्वत:ला बजावले, सगळे काही शिकण्याचा अट्टहास नकोच, जे शिकलो त्यावर स्वत:चे संस्कार करून ते इतरांपेक्षा वेगळे करणे महत्त्वाचे. संगीत शिकणे म्हणजे घर बांधणे नाही, विटा रचल्या, गिलावा मारला आणि छप्पर ठेवले की काम पूर्ण. इथे रोज नव्याने काही घडत असते, माणसाच्या जगण्यातून इथे खूप काही येत असते..!केव्हातरी घरी परतावे लागणार होते. आणि जे काही शिकलो त्याचा सांधा माझ्या देशाच्या संगीताशी, त्या देशाला आवडणार्या संगीताशी, त्यातील प्रयोगांशी जोडायला हवा होता. परत आलो तेव्हा माझे कार्यक्रम सुरू केले, तबल्याची साथसंगत असे बरेच समोर दिसत होते; पण मी जसा गुरुच्या शोधात गेलो, तसाच शोध घेत एक शिष्य माझ्यापयर्ंत आला आणि मी गुरुच्या भूमिकेत गेलो. त्या एका शिष्यापासून सुरू झालेली गुरु नावाची भूमिका आता माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग झाली आहे. स्कूलच्या तेरा वर्षांच्या प्रवासातील दोन गोष्टी माझ्यासाठी फार जिव्हाळ्याच्या. पहिली, आपला देश न बघितलेल्या अनेक भारतीय मुलांना मी त्यांच्या देशाशी जोडून दिले, या देशाच्या एका समृद्ध संचिताची ओळख करून दिली. आणि दुसरी, माझ्या देशाच्या शाळेच्या अभ्यासक्रमात तबला शिक्षणाचा झालेला समावेश. तबला हा विषय घेऊन शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचे या विषयात मिळालेले गुण विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत मोजले जातात. ऑस्ट्रेलियाच्या औपचारिक शिक्षणात मान्यता मिळालेले हे एकमेव भारतीय वाद्य आहे. माझ्या स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही छोट्या मैफली करतो. त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करतो. अनेक पाहुणे त्यांना भेटायला येतात. हा गजबजलेला माहोल बघताना मला रोज कोलकात्यातील गुरुजींचा वर्ग आणि मी ऐकलेल्या त्या शहरातील मैफली आठवत असतात.पण एक कलाकार म्हणून माझी तहान भागवण्यासाठी हे पुरेसे नाही. आणि औपचारिकपणे माझे शिक्षण संपले असले तरी जगाच्या संगीताबद्दल माझ्या मनात असलेले कुतूहल अजून कुठे शमले आहे? उलट आता मला त्यात अनेक नव्या प्रयोगांच्या शक्यता दिसायला लागल्या आहेत. त्या आजमावून बघताना जे काही घडत असते ते माझ्यासाठी असते, आजच्या जगाचे संगीत. भारतीय तबला पारंपरिक भारतीय संगीताच्या चौकटीतून बाहेर काढून वेगळ्या संगीताबरोबर जोडता येईल का असे म्हणत मी एक पियानो आणि गिटारच्या मदतीने एक अल्बम बनवला. जो लोकांना ‘थेरपी देणारा’ वाटला आणि लोकांनी तो आपल्या रोजच्या दिनक्रमात बसवला. नृत्य, सिनेमासारखी माध्यमे आणि पाश्चिमात्य संगीत हे सगळे काही माझ्या प्रयोगशाळेत आले आहेत! शेवटी, ज्या झाकीरभाईंची रेकॉर्ड हातात घेऊन मी प्रथम भारतात पाय ठेवला त्यांना भेटणे हे माझ्यासाठी माझ्या प्रवासाचे वर्तुळ पूर्ण करण्यासारखे होते. झाकीरभाईंच्या अमेरिकेतील वर्गात मी बसलो आणि गुरु होऊन ते बोलू लागले तेव्हा मी पुन्हा विशी-बाविशीतील विद्यार्थी होऊन नव्याने काही शिकत होतो..
डॉ. सॅम इव्हान्सडॉ. सॅम इव्हान्स हे ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथे ‘मेलबर्न तबला स्कूल’ चालवतात. तबला विषयात त्यांनी डॉक्टरेट घेतली असून, त्यांच्या स्कूलला मिळणार्या प्रतिसादानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या औपचारिक शालेय शिक्षणात तबला विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पारंपरिक भारतीय संगीत आणि समकालीन जागतिक संगीताचे कलाकार म्हणून ते जगभर मैफली करतातच; पण तज्ज्ञ म्हणून अनेक विद्यापीठामध्ये त्यांना व्याख्यानांसाठी आमंत्रित केले जाते.
मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे vratre@gmail.com(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)