कुठूनही, कुठेही आणि कितीही दूर गेली तरी अचूक ‘घरवापसी’ करणा:या कबुतरांची कित्येक रहस्यं अजून माणसाला उकललेली नाहीत!
- निरंजन घाटे
माणसानं पशुपालन सुरू केलं त्याला दहा हजार वर्षे झाली, असं पुरातत्त्व विद्या आपल्याला सांगते. त्यानंतर कधीतरी पक्षी पालन सुरू झालं असावं, असं म्हटलं जातं. पशुंची हाडं भरीव असतात, त्यामुळं ती टिकून राहतात मात्र जे पक्षी आकाशात उंच भरा:या घेतात, त्यांच्या दृष्टीनं भरीव हाडं अडथळा ठरतात. गगनविहारी पक्ष्यांची हाडं पोकळ आणि त्यामुळं वजनाला हलकी असतात. त्यामुळं ती त्या पक्ष्यांच्या मृत्यूनंतर टिकून राहणं अवघड असतं. त्यामुळेच मानवी अवशेषांबरोबर ज्या संख्येनं पशुंची हाडं सापडतात, तशी आकाशात ङोपावणा:या पक्ष्यांची हाडं सापडत नाहीत. त्यामुळे असे पक्षी माणसानं पाळायला केव्हा सुरुवात केली याचे निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत.
चीनमध्ये इ.स. पू. अकराव्या शतकामध्ये शोभेची कबुतर राजदरबारी पाळल्याचे उल्लेख आढळतात. शिबी राजाने कबुतराला मांडीचं मांस देण्याबद्दलची कथा आपल्या पौराणिक वा्मयात सापडते. जिमी कुपर ह्या प्राणीप्रेमी स्त्रीनं बरीच मेहनत करून ‘अॅनिमल्स इन वॉर’ नावाचं एक वाचनीय पुस्तक लिहिलं आहे. ‘अॅनिमल्स इन वॉर मेमोरिअल फंड’ नावाचा एक निधी दुस:या महायुद्धानंतर ग्रेट ब्रिटनमध्ये स्थापन झाला. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी एका अमेरिकी कबुतराचा खास सन्मान करण्यात आला होता. ह्या कबुतराने 1क्क् ब्रिटिश सैनिकांचे प्राण इटलीतील युद्धात वाचवले होते.
इ.स. पू. 1150 मध्ये मेसो पोटेमियात कबुतरांचा संदेश वहनासाठी वापर होत होता ह्याचे लेखी पुरावे तेथील उत्खननात खापरांवरल्या मजकुरांमध्ये मिळाले आहेत. रोमन साम्राज्यामध्येही कबुतरांचा संदेशवहनासाठी उपयोग केला जात असे. ज्युलिअस सीझरच्या सैन्याने युरोपात गॉल (म्हणजे आत्ताचे फ्रान्स) वर मिळविलेल्या विजयाची बातमी कबुतरांनीच रोमला पोचवली होती.
आपल्याकडे हे काम - म्हणजे निरोप पोचविण्याचं काम - मेघापासून हंसार्पयत अनेक दूतांनी केलंय, पण ते कबुतरांनी केल्याचा संस्कृत वा्मयात उल्लेख आढळत नाही. असं असलं तरी वात्स्यायनाच्या कामशास्त्रत आणि चाणक्यनीतीमध्ये गुप्त संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी कबुतरांचा वापर करावा असे निर्देश आहेत. अर्थात दोघांचे संदर्भ वेगवेगळे आहेत.
भारतात कबुतरं फार पूर्वीपासून पाळली जात असतं. मात्र त्यांचा संदेशवहनासाठी उपयोग करण्यात आल्याचे उल्लेख का नसावेत, हे एक कोडंच आहे. मात्र रानकबुतराचे मांस आणि रक्त कामप्रेरक असते ही समजूत परंपरेनं भारतात सर्वत्र चालत आल्याने आढळते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ात पाखे या कामासाठी विकले जातात. पारव्यांची एक गोष्ट कथा सरितसागरात आहे, ती खरं तर एकेकाळी खूप प्रसिद्ध होती ती आता टॉम अॅण्ड जेरीनंतरच्या जमान्यात कुठे वाचायला मिळत नाही.
- एक पारधी रानात दाणो पसरून त्यावर जाळे टाकतो. ते दाणो पाहून एका कबुतरांच्या थव्याला तिथं उतरावंसं वाटू लागतं. कळपातलं एक वयस्क आणि अनुभवी कबुतर असं करणं धोक्याचं ठरेल असं सांगू लागतं. तरुणांच्या गटाला ते मान्य नसतं. अखेर बहुमताच्या रेटय़ापुढं अनुभवी सल्ला पराभूत होतो आणि तो कळप त्या दाण्यांवर उतरतो; आणि जाळ्यात अडकतो. मग तो अनुभवी नर सांगतो, ‘गडय़ांनो, आता माझं ऐका, आपण सगळे एकदमच उडूया’, आणि बहुतेक तो तीन आकडे मोजतो आणि तो कबुतरांचा थवा, जाळ्यासकट उडून जातो. ही एकमेव कबतुर विषयक गोष्ट आपल्या प्राचीन वा्मयात आढळते. गुणाढय़ानं ती पैशाची भाषेत लिहिली पुढं कुणीतरी ती संस्कृतात अनुवाद करून आणली.
सशांची संख्या ज्या वेगानं वाढते त्याहीपेक्षा कबुतरांची संख्या वेगानं वाढते. आजकाल ब:याच महानगरांमधून कबुतरांची वाढती संख्याही एक महत्त्वाचा आणि अडचणीचा प्रश्न बनलेली आहे. त्यासाठी लंडनच्या महानगरपालिकेनं कबुतरांना टाकलेल्या दाण्यातून त्यांना चक्क संतती नियमनाच्या गोळ्या भरवून चारण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता. टोकियो, न्यू यॉर्क, मुंबई यासारख्या महानगरातून रोज लक्षावधी कबुतरे आकाशात विहार करताना दिसतात.
माझा स्वत:चा कबुतरांशी संबंध अगदी बालपणी आला. पुढे महाविद्यालयात जीवशास्त्रचा अभ्यासक्रमात जरी त्यांचा समावेश नव्हता तरी कुतूहल म्हणून डार्विन यांचे ‘द ओरिजिन ऑफ द स्पेसीज्’ नावाचं पुस्तक महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून आणून चाळत होतो. डार्विननी त्यांचा उत्क्रांतीविषयक सिद्धांत मांडताना कबुतरांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या सहाशे पानांच्या या ग्रंथात सुमारे 4क् ते 5क् पानं कबुतरांवर खर्ची पडली असावीत, असं आठवतं.
त्या काळात ब्रिटिशांबरोबरच युरोपातील इतरही राजसत्ता जगभर त्यांच्या त्यांच्या साम्राज्याच्या कक्षा वाढविण्यासाठी धडपडत होत्या. त्यांच्या जहाजांवर नेहमीच पाळीव कबुतरं असत. जहाज कुठूनही मायदेशी परतत असलं तरी 50-60 कि.मी. दूरवर असतानाच त्यावरून जहाजाच्या नावाची चिठ्ठी पायाला बांधलेलं कबुतर सोडलं जात असे. ते जहाजाच्या मालकाच्या कचेरीत पोहोचलं की त्या जहाजाच्या आगमनाची बातमी जाहीर केली जायची. मग बंदरावर खलाशांच्या नातेवाइकांची एकच गर्दी व्हायची. याशिवाय जहाजावरचा माल उतरवून घ्यायला कंपनीची माणसं यायची. ब:याच सामानाचा न बघताच लिलावही केला जात असे. हा एक प्रकारचा जुगारच होता; कारण पूर्वेकडचा माल, पश्चिमेकडचा माल असं म्हणून या मालाची बोली लावली जात असे. त्या पेटा:यांमध्ये काय निघेल याची कुणालाच कल्पना नसे.
या संदेशवाहक कबुतरांना पॅरिसला घातलेल्या वेढय़ामध्ये महत्त्व प्राप्त झालं याचं कारण रशियन सैन्यानं पॅरिसमधून बाहेर पडणा:या तारा एक एक करून तोडायला सुरुवात केली. बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी सीन नदीच्या पात्रमधून एक तार गुप्तपणो घालण्यात आली होती. जमिनीवरच्या सर्व तारा तोडल्या तरी पॅरिसमध्ये काय चाललंय, हे जगाला कळतयं हे लक्षात आल्यानंतर खास पाणबुडे सीन नदीच्या पात्रत उतरले. त्यांनी नदीच्या पात्रतील ही तार शोधून काढून ती तोडल्यानंतर संदेशवाहक कबुतराचं महत्त्व वाढलं.
या कबुतरांना संदेशवाहक कबुतरं (कॅरिअर पीजन) किंवा होमिंग पीजन्स म्हणजे घरी परतणारी कबुतरं असं म्हटलं जातं. कुठेही सोडलं तरी घरी परतणारच ही जिद्द बाळगून नेमकं आपलं घर शोधून काढण्याबद्दल दोन प्राणी जगप्रसिद्ध आहेत. ते म्हणजे मांजर आणि कबुतरं. पण कबुतरांचा उडण्याचा वेग आणि घरी परतण्याची खात्री ही मांजरांच्या ह्या गुणांवर मात करणारी ठरते. मांजराला इतर मांजरं, कुत्री आणि जंगलातले इतर प्राणी यांना चुकवून घरी परतायला बरेच दिवस लागू शकतात. कबुतरांना इतर शिकारी पक्षी आणि आता विजेचे किंवा भ्रमणध्वनी ग्राहकांसाठी बांधलेले संदेश ग्राहक आणि प्रक्षेपक असे शत्रू असतात.
आपल्याला कल्पना नसते; कबुतराचा वेग खरंच अफाट असतो. आरामात आकाशगामी झालेल्या कबुतराचा उडण्याचा वेग हा ताशी 40 ते 60 कि.मी. असू शकतो, पण एरवी तो ताशी 80 कि.मी. र्पयत आणि संकटसमयी तो 140 कि.मी. र्पयत वाढतो. निसर्गानेच ही सोय करून ठेवली आहे.
ज्या प्राण्यांकडे अंगभूत संरक्षणाची साधनं नसतात, अशा प्राण्यांना दोन वरदानं निसर्गदत्त मिळतात. एक म्हणजे प्रजननाचा वेग आणि दुसरं वरदान म्हणजे चपळाई. ससा आणि कबुतरं ही अशा सजीवांची उदाहरणं आहेत. दोन्हीही प्राण्यांची प्रजावाढ अद्भुत अशीच असते. सशाला दर सहा महिन्यांनी पाच ते सहा पिल्लं होतात. कबुतरं दर सहा महिन्यांनी दोन अंडी घालतात. वेगानं मार्गक्रमण करताना कबुतरं आणि ससे त्यांचा मार्ग वेडावाकडा बदलू शकतात. ही गोष्ट त्यांच्या शिका:यांना जमत नाही. सरासरीने 75 ते 8क् टक्के वेळा ही दोघंही शिका:यांना हुल देण्यात यशस्वी ठरतात.
कुठलीही वेगवान गोष्ट दिसली की माणूस त्या गोष्टींच्या शर्यती लावतोच; पण त्या शर्यतींवर जुगारही खेळतो. जुगाराला खेळ का म्हणतात, हे मला कधी न सुटलेलं कोडं आहे. एक मात्र खरं, ज्या प्राण्यांची किंवा वाहनांची शर्यत लावली जाते त्या प्राण्यांची आणि वाहनांची माणूस जिवापाड काळजी घेतोच; पण त्यांचा वेग वाढण्याची क्षमता अधिक प्रगल्भ व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असतो. प्रजनन शास्त्रच्या दृष्टीनं घोडे, कुत्री आणि कबुतरांनीही वेगवान बनण्याची अंतिम मर्यादा गाठली आहे.
कबुतरं म्हणजे डोमेस्टिक पीजन आणि पारवा म्हणजे रॉक पीजन. पारव्यात साधारणपणो एकाच रंगाच्या गडद, फिकट आणि काळसर वगैरे मर्यादित छटा असतात. मानवाने जे पहिले पक्षी पाळले त्यात कबुतरांचा समावेश होतो. त्या आद्य जंगली कबुतरांच्या नियंत्रित प्रजननांत आजची ‘कोलंबा लिव्हिया डोमेस्टिक’ ही जात निर्माण झाली. त्यातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कबुतरांची निर्मिती झाली. जपानमध्ये लांबचलांब शेपटाची केवळ शोभेची आणि कोंबडी इतपत जेमतेम उडू शकतात, अशा जातीच्या कबुतरांची पैदास केली जाते. तर दुस:या टोकाला ताशी 14क् कि.मी. वेगानं उडू शकणारी शर्यतीची (रेसिंग) कबुतरं (पीजन्स) आढळतात. भारतात मोरासारखा पिसारा असणारी पांढरी कबुतरं मिळतात यांना ‘लख्खे’ असं म्हणतात. ती फार उडू शकत नाहीत कारण त्यांच्या पंखांच्या हालचालीत या शेपटाच्या फुलो:याचा अडथळा होतो.
कबुतरांच्या शर्यती हा पाश्चात्य देशातील एक मोठा उद्योग आहे. सर्वसाधारणपणो या शर्यतींमध्ये भाग घेणा:या कबुतरांना किमान 100 मैल (160 कि.मी.) अंतर पार करावं लागतं. तसं बघायला गेलं तर कबुतरांनी 18क्क् ते दोन हजार कि.मी. दुरून घर गाठल्याची उदाहरणंसुद्धा आहेत.
संदेशवाहक कबुतरं काय किंवा शर्यतीची कबुतरं काय, यांची ‘घरवापसी’ असते. त्यांना घरापासून दूर सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचता येत नाही. त्यामुळेच त्यांच्यासाठी खास बनविलेल्या पेटय़ांमधून त्यांना बरोबर न्यायचं आणि तिथे गेल्यावर शर्यत असेल तर शर्यतीसाठी आणि संदेशवहन असेल तर संदेशासह सोडून द्यायचं. मग ती त्यांच्या मूळ घरी/ठिकाणी कधी परततात याची वाट बघत बसायचं हा ‘एक दिशा मार्ग’ कबुतरांच्या बाबतीत वापरावा लागतो.
संदेशवाहक कबुतरं नेहमी जोडीजोडीने सोडली जातात. ही जोडी कधीही नर मादी अशी नसते. याचं कारण हिंदी चित्रपटातील नायक-नायिका ज्याप्रमाणो कधी गाणं म्हणायला सुरुवात करतील याचा असा नेम नसतो, त्याचप्रमाणो कबुतरांची नरमादीची जोडी कधी प्रणयरंगात रंगेल हे सांगता येत नाही. त्यामुळे नेहमीच संदेशवाहक जोडी नर-नर, मादी-मादी अशी असते.
दुस:या महायुद्ध काळात जर्मनांनी आकाशातून एकटीदुकटी उडणारी कबुतरं मारण्यासाठी खास नेमबाज बंदुकधारी नेमले होते तर अफगाणिस्थान आणि पाकिस्तान यांच्या सीमारेषेवरील तालिबान नियंत्रित भागात कबुतरपालन आणि त्यांची वाहतूक यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. दुस:या महायुद्ध काळात कबुतरांचा वापर करून क्षेपणास्त्रंची अचुकता वाढविण्याचा एक विभाग निर्माण करण्यात आला होता, पण नंतर तो सोडून देण्यात आला.
असं हे कबुतर पुराण ! खरं तर भारतात ब:याच ठिकाणी कबुतरांचे शौकीन आहेत. खूप मोठमोठे कबुतर बाजार आहेत; पण तो अगदी वेगळा आणि कलंदर विषय! त्याबद्दल पुन्हा केव्हातरी!
प्यार (किसने) किया?
आपल्या साहित्यात आणि चित्रपटांमध्ये कबुतरांची जोडी ही प्रणयी जोडीच असते आणि ती प्रेमाच्या चिठ्ठय़ांची देवाण-घेवाण करण्यासाठी वापरली जाते. पूर्वी प्रभातच्या सिनेमात एकातरी दृश्यात कबुतरं दिसत.
अगदी अलीकडच्या काळातले आधुनिक नायक-नायिकाही कबुतरांच्या माध्यमातून प्रेमसंदेशांची पाठवणी करताना आपण पाहिलेच की!
युद्धातले ‘शांतिदूत’
पंडित नेहरू पांढरी कबुतरं हवेत सोडताहेत, हे छायाचित्रही बरेचदा बघायला मिळत असे. पण या शांतिदूतांनी युद्धात फार महत्त्वाची कामगिरी बजावली आहे, हे त्यांना शांतिदूत म्हणून जगापुढं आणताना सोयीस्करपणो विसरलं जात असे. बगदादच्या सुलतानाने युद्धकाळात त्याच्या सैनिकांना धीर मिळावा म्हणून प्रार्थना लिहून कबुतरांमार्फत सैनिकांना पोहोचविल्या होत्या. लॉर्ड वेलिंग्टनने वॉटर्लूच्या लढाईत विजय मिळाल्याचा संदेश कबुतरांमार्फत इंग्लंडला पाठवला होता, तर एकविसाव्या शतकात पॅरिसला वेढा घातल्यावर पॅरिसच्या नागरिकांचे होणारे हाल कबुतरांमार्फत जगाला कळविले जात होते.
‘घरवापसी’चे टपाल
कोणत्याही दिशेने कुठेही आणि कितीही दूरवर गेली, तरी घरी परतण्याच्या गुणधर्माचा फायदा घेऊन इ.स. 1896 मध्ये न्यूझीलंडमधील न्यूटन ते ग्रेट बॅरिअर बेटांदरम्यान पहिली ‘पोस्टल पीजन ग्रॅम’ सेवा सुरू करण्यात आली. त्यावेळी प्रथमच कबुतरं पोस्टाच्या तिकिटांवर आली. भारताच्या टपाल सेवेनेही वेळोवेळी टपाल तिकिटांवर कबुतरांना स्थान दिलेलं आहे. भारतात ओरिसामध्ये 2क्क्2 र्पयत पोलीस खात्यात कबुतरांचा वापर केला जात होता. मग लेखापरीक्षकांच्या विपरीत शे:यांमुळे ही टपाल सेवा बंद करण्यात आली.
ओरिसाला सतत सागरी वादळांना तोंड द्यावं लागतं. त्यावेळी दळणवळणाची सर्व प्रचलित साधने निरूपयोगी ठरत, अशावेळी या कबुतरांनी मदतकार्यात महत्त्वाची भूमिका
बजावली होती.
कबुतरं घरी परत कशी येतात?
कबुतरं नेमकी स्वगृही कशी परततात, यावर गेली पन्नास वर्षे तरी संशोधन चालू आहे. पशुपक्ष्यांचं स्थलांतरण आणि कबुतरांचं स्वगृही परतणं, या दोन भिन्न गोष्टी आहेत. स्थलांतर करणारे पशुपक्षी आणि काही किटक हे पिढय़ान्पिढय़ा एकाच मार्गावरून प्रवास करतात. स्वगृही परतणारी कबुतरं तशी नसतात. यांचे परतीचे मार्ग प्रस्थापित नसतात. हे कोडं पूर्णपणो सुटलेलं नसलं तरी काही स्पष्टीकरणं मात्र उपलब्ध आहेत, ती अशी -
1. नाकावरचं होकायंत्र
कबुतरांच्या नाकावर जो एक पांढरा उंचवटा असतो, त्यात अतिसूक्ष्म असे चुंबकीय कण असतात. निसर्गाने दिलेलं हे होकायंत्र कबुतरांमध्ये कार्यरत असतं. त्यामुळे कबुतरांना सतत दिशाज्ञान होत राहतं. खरं तर माणूस बिनडोक किंवा बुद्धू ह्याअर्थी ‘पीजन ब्रेन्ड’ किंवा ‘बर्ड ब्रेन्ड’ असे शब्द वापरत असतो; पण प्रत्यक्षात होकायंत्र वापरून योग्य ठिकाणी पोहोचणं माणसातल्या किती जणांना जमू शकेल, हा प्रश्नच आहे.
2. डोळे, मान आणि खाणाखुणा
एकदा एका भागावरून उड्डाण केल्यानंतर कबुतरं खालच्या भूभागातल्या खाणाखुणा लक्षात ठेवत असतात. एकमेकांना छेदणारे रस्ते, नद्या नाल्यांची वळणं, या बाबी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. त्यासाठी उडत असताना कबुतरं आळीपाळीने दोन्ही डोळ्यांचा वापर करता यावा म्हणून सतत मान आळीपाळीने वाकडी करून दोन्ही डोळ्यांनी त्यांच्या उड्डाण मार्गाखालचा भूभाग निरखत असतात.
3. वासांचा माग
अलीकडेच लक्षात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे वासांचे अतिसूक्ष्म कण कबुतरांना स्थळ निर्देशास मदत करतात. कबुतरं ज्या भूभागावरून उडतात, त्या भूभागावरून येणारे त्या भूभागाचे वैशिष्टय़दर्शक वास त्यांच्या लक्षात राहतात. तसेच अतिविशाल वारंवारतेच्या श्रव्यातीत ध्वनिलहरी कबुतरांचे कान टिपू शकतात. या चारही कौशल्यांचा वापर करून कबुतरं घरी परततात.
(लेखक मराठीतील विख्यात विज्ञानलेखक आणि बदलत्या तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)