- अच्युत गोडबोलेपहाटे ६ वाजताच फोन आला. अरुण साधू गेला. अजूनही बातमीवर विश्वासच बसत नाहीये. खरं तर अनेक वर्षांत अरुण साधूबरोबर माझ्या गाठीभेटी होतच होत्या. काही वेळेला त्याच्या घरी, तर अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून. दर भेटीत त्याची प्रकृती खालावत चालल्याचं जाणवत होतं. पण तरीही त्याच्यातला ‘माणूस’ जिवंत होता, अजूनही त्याच्यातली जिगर तशीच होती; पण त्याला कधी कमी तर कधी जास्त रक्तदाबाचा त्रास होत असल्याचं तो नेहमी सांगे. गेल्या काही महिन्यात एकदा तर त्याची प्रकृती जरा जास्तच बिघडली होती; पण त्यातून तो पुरता सावरला होता. पण तरीही वरखाली चालूच होतं. जे झालं ते केव्हातरी होणारंच होतं. पण इतक्या लवकर तो आपल्यातून निघून जाईल, असं वाटलं नव्हतं.माझं मन १९६०च्या दशकात झर्रकन मागे गेलं. मी त्यावेळी आयआयटीत होतो आणि समाजवादी चळवळीकडे आकर्षिलो गेलो होतो. त्यावेळी सर्व प्रस्थापित वर्तमानपत्रं आणि मासिकं रशिया, चीन आणि क्यूबा यांच्यावर प्रचंड टीका करत असतं. त्यामुळे एकीकडे समाजवाद जरी चांगला वाटत असला तरी त्या टीकेतही तथ्य वाटत होतं. अशा वेळी ‘माणूस’ या साप्ताहिकात अरुण साधूनं ‘फीडेल, चे आणि क्रांती’ हे सदर सुरू केलं आणि आमची मनं मोहरून गेली. क्यूबाचं आणि क्युबन क्रांतीचं एक सुंदर आणि रोमॅण्टिक रूप आमच्यासमोर उभं ठाकलं होतं. त्यावेळी अरुणशी माझी मैत्री नव्हती; पण त्या लेखांमुळे तो मला मित्रच वाटला होता. त्यानंतर त्याचं ‘मुंबई दिनांक’ बाहेर आलं. त्यानं तर साहित्यविश्वात खळबळच माजवून दिली होती. त्यावेळचं मुंबईचं जीवन, लोकलमधला प्रवास, व्ही.टी., फौण्टनपासची कार्यालयं, त्यातला तो ‘अय्यर’ आणि अनेक पात्रं आणि इतरही प्रसंग यातून मुंबईचं दाहक वास्तव समोर येत होतं. यानंतर ग्रंथाली चळवळीत आमचा संबंध आला. मी या चळवळीत कडेकडेनं थोडंफारच काम करत असे, कित्येक सभांना आणि प्रकाशनांना जात असे. मी ग्रंथालीच्या ग्रंथदिंडीतही भाग घेतला होता. या काळात दिनकर गांगल, कुमार केतकर, अशोक जैन यांच्या प्रमाणेच अरुणबरोबरही माझा जवळून संबंध आला.अरुणची ‘सिंहासन’ कादंबरीही प्रचंड गाजली. महाराष्टÑातल्या राजकारणाचं इतकं जिवंत चित्र त्या अगोदर क्वचितच कोणी उभं केलं असेल! पुढे ‘मुंबई दिनांक’ आणि सिंहासन या दोन कादंबºयांवरून ‘सिंहासन’ या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकरांसारखा समर्थ लेखक करतो काय आणि जब्बार पटेलसारखा ताकदवान दिग्दर्शक तो चित्रपट उत्कृष्टपणे पडद्यावर रंगवतो काय, सगळंच अजब होतं. त्या चित्रपटासाठी चित्रण करण्यासाठी प्रत्यक्षात मंत्रालयात किंवा ‘वर्षा’ बंगल्यावर शूटिंग करायला शरद पवारांनी काही लोकांचा त्यासाठी विरोध असूनही कशी परवानगी दिली याचं आणि एकूणच त्या कादंबरीविषयी, जब्बार, साधू आणि तेंडुलकर यांच्यातल्या गप्पागोष्टींविषयी जब्बारबरोबर गप्पा मारायला मजाही यायची. ‘सिंहासन’चा सोलापूरला जो प्रीमियर झाला होता, त्यावेळी मी तिथे हजर होतो.अरुणचं वैशिष्ट्य असं होतं की, तो एक उत्कृष्ट पत्रकारही होता आणि एक ग्रेट कादंबरीकार आणि कथाकारही होता! तो केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स आॅफ इंडिया, स्टेट्समन अशा अनेक मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रातून लेख लिही, आणि त्याचवेळी मुंबई दिनांक, सिंहासन, त्रिशंकू, झिपºया, शोधयात्रा, स्फोट, बहिष्कृत अशा अनेक कादंबºया, पडघम हे नाटक आणि अनेक कथासंग्रह तो मागे ठेवून गेला. तो प्रचंड जलद लिहीत असे. बहिष्कृत ही कादंबरी त्यानं फक्त ३-४ दिवसात पूर्ण केली होती ! पण फक्त ‘तो आणि ती’ अशा वरवरच्या प्रेमकथा किंवा प्रेमत्रिकूटं यात तो कधीच रमला नाही. त्याच्या प्रत्येक कादंबरीला एक सामाजिक विचारांची झालर असायची. मग ते दलितांचे प्रश्न असोत, स्त्रियांचे प्रश्न असोत, अंधश्रद्धेविषयीचे प्रश्न असोत किंवा नक्षलवादाचा प्रश्न असो, त्यानं कधीही टोकांची प्रस्थापित ‘उजवी’ बाजू घेतली नाही. त्याच्यातला एक न्याय आणि सामाजिक समतेच्या बाजूने काढणारा, विवेकवादी, विज्ञानवादी माणूस आपल्या कादंबºयांतून या मूल्यांसाठी सतत झगडत राहिला.त्यानं १९८०च्या दशकात लिहिलेली ‘झिपºया’ ही कादंबरी खूप गाजली होती. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरच्या बूट पॉलिश करणाºया आणि इतर मुलांच्या आयुष्याची फरफट, त्यांच्यातली बेकारी आणि त्यांच्या आयुष्यात येणारा आशेचा किरण असा तो विषय आपल्या समाजाचं दाहक वास्तवाचं चित्र आपल्यासमोर उभं करत होता. आता त्याच्यावर चित्रपटही निघतोय. गांधीजी आणि आंबेडकर हे त्याला जवळचे वाटत. त्यानं समकालीन राजकारणामधल्या चीन, रशिया आणि क्युबा यांच्यावर प्रचंड लिखाण केलं. तो राजकारण्यांना भीत नसे आणि ८०व्या साहित्य संमेलनाचा तो जेव्हा अध्यक्ष झाला तेव्हा त्यानं घेतलेल्या स्पष्ट आणि निर्भीड भूमिकेतून हेच दिसून आलं होतं. त्यावेळी मी नागपूरला त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा आपण एव्हढे मोठे पत्रकार आणि साहित्यिक आहोत आणि शिवाय साहित्य संमेलनाचा अध्यक्षही आहोत, याचा त्याच्या वागण्यात तसूनभरही लवलेश नसायचा. माझा तर तो जवळचा मित्र होता. त्यामुळे हे समजण्यासारखं होतं. पण तो सगळ्यांबरोबर तितक्याच अदबीनं आणि आदरानं वागायचा. तो कुणाला रागवून बोलू शकतो किंवा कोणाचा अपमान करू शकतो हे मला अशक्यच वाटायचं. पैज मारली तरी त्याला ते जमलं नसतं.मला आठवतंय, १९८०च्या दशकात त्यावेळी मी नरिमन पॉइंटला एका टॉवरमध्ये काम करत असे. माझं आॅफिसही बºयापैकी मोठं होतं. मी नेहमीचा नेकटाय लावून माझ्या कॅबिनमध्ये बसलो होतो. अचानक अरुण तिथे आला. मग तिथे तास-दोन तास आमच्या गप्पा रंगल्या. त्याला माझं भारी कौतुक वाटत असे. एकदा पार्ल्याला अशोक जैन, कुमार केतकर, अरुण साधू वगैरे बरीच मंडळी जमली असताना सगळ्यांनी आग्रह केला असताना मी शिळेवर बागेश्री, मालकंस की असेच कुठलेतरी राग प्रत्येकी १५-२० मिनिटे वाजवून दाखवले होते. त्यावेळी मी शीळ बºयापैकी वाजवत असे. सगळ्यांसकट अरुणलाही त्याचं किती कौतुक वाटलं होतं! पुढे मी आणि माझी बहीण सुलभा पिश्वीकर यांनी मिळून संगीतावर ‘नादवेध’ नावाचं पुस्तक जेव्हा लिहिलं होतं तेव्हा अरुणनंच त्याचं परीक्षण लोकसत्तामध्ये लिहिलं होतं. त्या परीक्षणातला अर्धा भाग फक्त माझ्यावर होता! माझं ते मोठं आॅफिस, माझं आयआयटीनंतरचं करिअर, माझं हे रागदारी वाजवणं आणि अशा इतर अनेक गोष्टींचं अरुणसारखा सिद्धहस्त लेखक कौतुक करतोय असं म्हटल्यावर माझीही कॉलर ताठ झाली होती.‘मुसाफिर’ हे माझं आत्मचरित्र लिहून झाल्यावर मी सर्वप्रथम अरुणलाच ते दाखवलं. ‘३-४ दिवसांत कसं वाटतं ते सांगतो’ म्हणाला. पण दुसºयाच दिवशी त्याचा फोन खणखणला. ‘मी आता एका कार्यक्रमात गुंतलोय. रात्री सविस्तर बोलतो’ म्हणाला. त्याला हे आत्मचरित्र कसं वाटतंय याबद्दल मला थोडी धाकधूक होतीच. ठरल्याप्रमाणे त्याचा फोन वाजला आणि तो सलग १० मिनिटे माझ्याशी ‘मुसाफिर’विषयी बोलला. त्याला काय बोलू आणि किती बोलू असं झालं होतं. त्याला ‘मुसाफिर’ अफलातून आवडलं होतं. ‘अतिशय प्रामाणिक आणि प्रांजळ आहे’, असं तो म्हणत होता. मुसाफिरमधल्या अनेक घटनांचा आणि चळवळींचा तो साक्षी असल्यामुळे त्याच्याकडून ही पावती मिळणं हे माझ्यासाठी खूपच मोठं होतं. ‘हे इतकं सुंदर आणि ओघवतं झालंय की हे बेस्ट सेलर तर नक्की होईल; पण यावर सिनेमा काढण्यासाठी अनेकजण तुला विचारतील. पण तू विचारपूर्वक निर्णय घे’, असं तो म्हणाला होता. मुसाफिरचं प्रकाशनही अरुणच्याच हस्ते झालं होतं.विजय तेंडुलकरांसारखं अरुणलाही माझं खूप कौतुक असायचं. ‘नवीन काय चाललंय?’ असं दोघंही मला नेहमी विचारत आणि मुख्य म्हणजे स्वत: कितीही मोठे साहित्यिक असूनही माझ्यासारख्याची पुस्तकं वाचून मला प्रोत्साहन देत. अरुण तर प्रचंडच. थोडक्यात तो माझा मित्र होता, मार्गदर्शक होता आणि गुरुही होता. एकदा असंच त्याच्या घरी गेलो असताना त्यानं मला त्याची ‘स्फोट’ ही कादंबरी सही करून भेट दिली. आणि कशी वाटते ते सांग असं आवर्जून म्हणाला. त्यांच्याकडे गेलं की वेळ कसा जायचा हे कळायचंच नाही. अरुण आणि त्याची सतत आनंदी आणि हसतमुख असलेली जोडीदार अरुणा यांच्याबरोबर गप्पा व्हायच्या. आणि त्या साहित्य, राजकारण अशा अनेक विषयांवर असायच्या.काही महिन्यांपूर्वी माझा मित्र सुधीर महाबळ यानं ‘परतवारी’ हे पुस्तक लिहिलं. त्याची प्रस्तावना त्यानं इतकी सुंदर लिहिलीय की तोबा! सुधीर, मी आणि अरुण कित्येक वेळा भेटायचो. पुस्तकाच्या प्रकाशनालाही अरुण आला होता. ती बहुधा माझी शेवटचीच भेट असावी. त्यानंतर काल रात्री तो सीरियस असल्याचा मेसेज आला आणि पहाटे तो गेल्याचा.यापुढे पत्रकार अनेक होतील, कादंबरीकार अनेक होतील, कथाकार अनेक होतील; पण हे सगळे एका माणसात जुळून येणं आणि तेही अत्युच्च दर्जाचं हे मात्र होणं कठीणच! आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या इतका शांत, निगर्वी, नि:स्वार्थी, मदत करणारा, प्रोत्साहन देणारा ‘माणूस’ मी माझ्या उभ्या आयुष्यात
(तंत्रज्ञानाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखक achyut.godbole@gmail.com)