- अमोल उदगीरकरभाकरी फिरवणे हा ग्रामीण भागात वापरला जाणारा शब्दप्रयोग सकल महाराष्ट्राला कळला तो शरद पवार यांच्यामुळे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते. असं प्रमेय पवारसाहेबांच्या भाषणात अनेकदा ऐकू येतं. जेव्हा जेव्हा पक्षसंघटनेत किंवा सत्तास्थानांमध्ये मूलभूत बदल घडवायचे असतात तेव्हा तेव्हा पवार भाकरी फिरवतात.भाकरी फिरवणं म्हणजे वर्षानुवर्षे खुर्च्या उबवणाऱ्या जुन्या चेहऱ्याना हटवून नवीन लोकांना संधी देणं. थोडक्यात नव्या रक्ताने, जुन्या रक्ताची जागा घेणं. पुढे जाण्यासाठी, प्रगती होण्यासाठी भाकरी फिरवण्याची ही प्रक्रिया अपरिहार्य आणि आवश्यकच असते. जुने लोक अनेकदा जुन्या कालबाह्य संकल्पनांनाच कवटाळून बसलेले असतात त्यामुळे बदलाची कालसुसंगत राहण्याची प्रकिया थांबते आणि काही तरी नवीन होण्याची शक्यता पण. याउलट नवीन रक्त उत्साही आणि अधिक उपक्र मी असतं. आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडे नवनवीन कल्पना असतात.२०१८ हे वर्ष भारतीय सिनेमाच्या इतिहासात भाकरी फिरवण्याचं वर्ष म्हणून ओळखलं जाईल.गेल्या वर्षाने फिल्मी दुनियेचं रूपरंगच पार बदलून टाकलं आहे. हिंदी आणि इतर प्रादेशिक सिनेमात बदलांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. प्रस्थापितांना नव्या पिढीकडून जोरदार आव्हान मिळालेलं आहे. या आव्हानाला सामोरं कसं जायचं हे प्रस्थापिताना सध्या तरी कळत नाहीये. सिनेमाचा कणा मानला जाणारा प्रेक्षक सध्या तरी नवीन पिढीच्या पारड्यात आपलं वजन टाकून त्यांना पाठिंबा देत आहे असं एकूण चित्र आहे.बॉलिवूडपुरतं बोलायचं झालं तर हे वर्ष नवीन दमाच्या लोकांचं वर्ष आहे. यावर्षी अंधाधुन, बधाई हो बधाई, स्री, संजू, पद्मावत, बागी २, सोनू के ट्विटू की स्वीटी या चित्रपटांवर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवली, तर चित्रपटाच्या कथेच्या दृष्टीने वेगळे प्रयोग असणाऱ्या भावेश जोशी, आॅक्टोबर, मुल्क, लैला मजनू, मनमर्र्जिया, तुंबाड या सिनेमांना समीक्षकांनी आणि प्रेक्षकातल्या एका विशिष्ट वर्गाने उचलून धरलं. हे सिनेमे वेगवेगळ्या जॉनरचे, प्रॉडक्शन हाऊसचे आणि कलाकारांचे आहेत. पण या वेगवेगळ्या सिनेमांना जोडणारा एक समान धागा आहे : या यादीतल्या सर्वच्या सर्व सिनेमांशी कोणत्याही खानचा, कोणत्याही रोशनचा, कोणत्याही कुमारचा किंवा कोणत्याही जौहर अथवा चोप्राचा कुठलाही संबंध नाही!- आजवर कोणत्याही गाजलेल्या चित्रपटाशी या आडनावांचा कुठून तरी संबंध असतो असा एक अलिखित नियम असायचा. तो नियम यावर्षी संपुष्टात आला.इंडस्ट्रीवर एकहाती वर्चस्व गाजवणाºया खान त्रयीसाठी तर हे वर्ष व्यावसायिकदृष्ट्या अतिशय वाईट होतं. सलमानचा रेस ३, आमीरचा ठग्ज आॅफ हिंदुस्थान आणि शाहरूखचा झीरो या चित्रपटांना प्रेक्षकांनी सपशेल नाकारलं.अक्षय कुमार, तब्बू आणि अजय देवगण या जुन्या पातींनी प्रतिष्ठा राखली असली तरी हे वर्ष आहे आयुष्यमान खुराणा, राजकुमार राव, विकी कौशल, आलिया भट, अविनाश तिवारी आणि कार्तिक आर्यन यांचं ! यातला आलिया भटचा आणि काही प्रमाणात विकी कौशलचा अपवादवगळला तर इतर लोक हे आउटसाइडर्स आहेत. त्यांचा कोणत्याही फिल्मी खानदानाशी दुरूनपण संबंध नाही, की त्यांचा कुणीही गॉडफादर नाही. या लोकांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. प्रेक्षकांमधल्या सर्व वर्गांना आणि समीक्षकांना त्यांनी आपलंस केलं आहे.श्रीराम राघवनसारख्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणाºया आणि कथानकाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणाºया दिग्दर्शकाला यावर्षी कारकिर्दीत पहिल्यांदाच अंधाधुनमुळे प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली, तर कायम प्रेक्षकशरण सिनेमे बनवणाºया अनुभव सिन्हासारख्या दिग्दर्शकानं मुल्क या सिनेमातून संवेदनशील विषयाची सुंदर हाताळणी करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.लव रंजनसारख्या दिग्दर्शकाने नवीन चेहºयांना घेऊन बनवलेला सोनू के ट्विटू की स्वीटी चक्क शंभर कोटीच्या क्लबमध्ये जाऊन बसला. आलिया भटला मध्यवर्ती भूमिकेत घेऊन बनवलेला राझी सिनेमा हिट झाला आणि स्रीप्रधान सिनेमे चालत नाहीत हा अनेकांचा गैरसमज दूर झाला.संजय लीला भन्साळी, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा पद्मावत आणि रणबीर - राजू हिराणीचा संजू बॉक्स आॅफिसवर चालले असले तरी त्यांच्या चालण्यामागे सिनेमाच्या कण्टेण्टपेक्षा त्या सिनेमाच्या निमित्ताने झडलेल्या वादांचा मोठा वाटा असावा. करणी सेनेने पद्मावत प्रदर्शित होऊ नये म्हणून जाळपोळ आणि दंगे घडवले. सरकारने त्यावर अळीमिळी गुपचिळी धोरण स्वीकारलं तरी देशभरातल्या प्रेक्षकांनीच पद्मावतला हिट करून करणी सेनेला चोख उत्तर दिलं.यावर्षी बॉलिवूडला राही अनिल बर्वे, अमित शर्मा, अमर कौशिक यांसारख्या ताज्या दमाचे ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवता येतील, असे स्टोरीटेलर मिळाले.पण अर्थात या एका वर्षातल्या यादीवरून खान मंडळी, जौहर, चोप्रा या मंडळींची सद्दी संपली असा लगेच निष्कर्ष काढणं चुकीचे ठरेल, हे नक्की ! ही मंडळी वर्षानुवर्षे इंडस्ट्रीमध्ये टिकून आहेत. व्यावसायिक आयुष्यात अनेक चढउतार या लोकांनी बघितले आहेत. एक वाईट वर्ष त्यांना संपवू शकणार नाही. पण नवीन पिढीचं आव्हान ते कसं स्वीकारतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हे आव्हान स्वीकारण्यासाठी त्यांना कम्फर्ट झोनच्या बाहेर यावं लागेल. प्रेक्षकांचा कल जाणून घेऊन वेगवेगळे प्रयोग करावे लागतील. नाहीतर अंबानींच्या लग्नात मागे नाचणारे किंवा वाढप्याचं काम करणारे अशी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात बनून राहणं त्यांना परवडणार नाही.हिंदी आणि मराठी सिनेमा-जगतातली भाकरी फिरवण्याची उदाहरणं ही आर्थिकदृष्ट्या, बदलत्या पिढीच्या दृष्टीने सुसंगत आहेत. ते महत्त्वाचं आहेच; पण सध्या तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पा रंजित जी भाकरी फिरवत आहे त्याला अनेक अस्वस्थ करणारे जातीय संदर्भ आहेत. चेन्नईमध्ये बसून पा रंजित जो वंचितांचा सिनेमा घडवत आहे त्याचे पडसाद देशभरात जाणवत आहेत. आपल्या समाजाचं अस्वस्थ करणारे जातीय वास्तव जो ते आपल्या सिनेमातून दाखवत आहे त्याला देशभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक म्हणून कालामधून आणि त्यानेच निर्मिती केलेल्या पेरियेरूम पेरूमलमधून त्याने वंचितांचं सौंदर्यशास्त्र निर्माण केलं आहे.भारतासारख्या खंडप्राय देशात सिनेमा हे फक्त मनोरंजनाचं एक साधन एवढ्यापुरतंच त्याचं महत्त्व नाही. सिनेमाने सामाजिक बदलांमध्ये, समता प्रस्थापित करण्यामध्येपण आपल्या परीने वाटा उचलणं अपेक्षित असतं. आपल्याकडे अशा सिनेमांची एक मोठी परंपरा होती जी मध्यंतरी लुप्त झाली होती. पा रंजित, नागराज मंजुळे, भाऊसाहेब कºहाडे ही मंडळी या सिनेमाचं पुन्हा पुनरुज्जीवन करत आहेत, हे या वर्षाचं मोठं संचित.- शेवटी भाकरी फिरवणं म्हणजे तरी वेगळं काय असतं?मराठीतही फिरली भाकरी!ही भाकरी फिरवण्याची प्रक्रि या मराठी प्रेक्षकांनीपण सुरू केली आहे असं मानण्यास बराच वाव आहे. गुलाबजाम, मुरांबा, फर्जंद, बबन, नाळ आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमांना प्रेक्षकांनी अतिशय उत्कट प्रतिसाद दिला.पुन्हा हे सिनेमे अतिशय वेगळ्या जॉनरचे आणि त्या अर्थाने प्रेक्षकानुनयी नाहीत. या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी अतिशय कन्व्हिक्शनने हे विषय पडद्यावर मांडलेले आहेत. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी (सीनिअर) यांचा अपवादवगळता या सिनेमांशी संबंधित कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक हे प्रथितयश सदरात मोडणारे नाहीत. सचिन कुंडलकर हा प्रयोगशील लेखक-दिग्दर्शक म्हणून ओळखला जात असला तरी गुलाबजामच्या निमित्ताने प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद काय असतो याचा अनुभव त्याला पहिल्यांदाच मिळाला असणार.फर्जंद हा शिवकालीन घटनेवर आधारित सिनेमा यावर्षीचा सरप्राइज हिट आहे. नवीन पिढीमधल्या करिअरविषयक आणि एकूणच गोंधळाबद्दल भाष्य करणारा वरु ण नॉर्वेकर या दिग्दर्शकाचा मुरांबा हा सिनेमा शहरी भागातल्या प्रेक्षकांना अपील झाला. भाऊराव कºहाडे आणि नागराज मंजुळे या मराठी सिनेमातल्या न्यू वेव्हच्या प्रतिनिधींचे सिनेमे वेगळे विषय आणि हाताळणीमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस आले.वर्षाच्या शेवटी आलेल्या मासेसला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या आदित्य सरपोतदारच्या ‘माउली’ने मराठी सिनेमा-वर्षाचा शेवट गोड केला.(लेखक फॅण्टम फिल्मसोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात)
manthan@lokmat.com