मूळचेयवतमाळ जिल्ह्यातील मांगली गावचे असलेले प्रा. विवेक विजय पोलशेट्टीवार यांनी मुंबईच्या ‘टीआयएफआर’मध्ये हे संशोधन केले. नॅनोतंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी ‘काळे सोने’ विकसित केले आहे. त्याद्वारे कार्बन डायऑक्साइडपासून मिथेन वायूचे इंधन मिळवणे शक्य झाले आहे. ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’ या रसायनशास्त्रातील प्रथितयश जर्नलमध्ये पोलशेट्टीवार यांचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. त्यामुळे या संशोधनाला जगाची मान्यता मिळाली आहे. लवकरच या प्रयोगाच्या पेटंटसाठी अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रयोगास केंद्र सरकारचा अणूऊर्जा विभाग व विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सहकार्य लाभले.असे आहे संशोधन सोन्याच्या गुणधर्मात काही बदल करून प्रा. पोलशेट्टीवार यांनी त्याचे ‘ब्लॅक गोल्ड’ या वेगळ्या पदार्थात रूपांतर केले. याच पदार्थाचा वापर करून समुद्राच्या पाण्याचे बाष्पीकरणाद्वारे पिण्याच्या पाण्यात रुपांतर करणेही शक्य आहे. काळ्या सोन्याचे कृत्रिम वृक्ष उभे केल्यास वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचे बहुपयोगी इंधनात रुपांतर करता येणार आहे. यात सोने वापरल्याने ते खर्चिक असले, तरी ते एकदाच वापरायचे असते. सोन्याच्या नॅनो (अतिसूक्ष्म) कणांमधील पोकळ्यांमध्ये बदल करून त्याची प्रकाश शोषण्याची क्षमता वाढवली. प्रकाश संग्रहित केल्यावर या कणांमधील इलेक्ट्रॉन्सचे संक्रमण होऊन त्यातून ऊर्जा तयार होते. तिचाच वापर करून कार्बन डायऑक्साइड व पाण्यातील हायड्रोजनचा वापर करून मिथेन वायू तयार करणे शक्य झाले. काळ्या सोन्याचा हा प्रयोग जगात प्रथमच करण्यात आला. हा उपयुक्त शोध लावणाऱ्या तरुणाचे नाव आहे प्रा. विवेक विजय पोलशेट्टीवार. यवतमाळ जिल्ह्यातील मांगली (ता. झरीजामणी) हे छोटेसे खेडे त्यांचे जन्मगाव. मांगली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतच सातवीपर्यंत आणि वणीत बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर ते नागपूरला एका कंपनीत नोकरीसाठी गेले. आणि आता मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये संशोधनाचे कार्य करीत आहेत.म्हणून त्याचे नाव ‘ब्लॅक गोल्ड’निसर्गातील वृक्ष ज्याप्रमाणे कार्बन डायऑक्साइड, पाणी व सूर्यप्रकाश यांचा वापर करून आपले अन्न तयार करतात, त्याचप्रमाणे आम्ही तयार केलेले काळे सोनेही इंधन तयार करते. हे इंधन मोटारी चालवण्यासाठी वापरता येऊ शकते. हा पदार्थ तयार करताना सोने व सिलिका यांचा वापर केला असून त्याचा रंग काळा होतो व म्हणून त्याला काळे सोने (ब्लॅकगोल्ड) म्हटले गेले आहे. या प्रक्रियेत सोन्याच्या नॅनो कणांमध्ये सूर्यकिरण संग्रहित केले जातात. त्यामुळे औष्णिक व विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होते. या चुंबकीय क्षेत्रामुळे कार्बन डायऑक्साइडचे मिथेन इंधनात रुपांतर होते, असे प्रा. विवेक पोलशेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.नॅनो तंत्रज्ञानातील सूत्रे वापरून प्रदूषित वायूपासून इंधन मिळवणे व त्याद्वारे पर्यावरणाच्या प्रश्नावर मात करणे हे आमचे ध्येय होते. त्यात यश आले. याच काळ्या सोन्यापासून समुद्राच्या पाण्याची वाफ करून पिण्यायोग्य पाणी मिळवण्याची क्रियाही आम्ही ‘केमिकल सायन्स जर्नल’मधील शोधनिबंधात दिली आहे.प्रा. विवेक पोलशेट्टीवार, संशोधक, टीआयएफआर.
- अविनाश साबापुरे