धनंजय जोशी
झेन मार्गामध्ये साधना आणि दैनंदिन जीवन यात फरक मानत नाही! तुम्ही जे काय करीत असाल ते शंभर टक्के लक्ष देऊन करायचं एवढंच!
भांडी घासताना भांडी घासायची, गाडी चालवताना गाडी चालवायची, झोप आली की झोपायचं आणि भूक लागली की जेवायचं. समोर कुणी तहानलेला भेटला तर त्याला पाणी द्यायचं!
- अगदी सोपी साधना आपण उगीचच अवघड करत असतो.
मला स्वैपाक करायला आवडतो आणि ‘स्वैपाक साधना’ तर आणखी सुंदर!
या साधनेत शिजवूून काय निघतं, तर आपलं मन! आता स्वैपाक म्हटला म्हणजे ‘रेसिपी’ किंवा प्रक्रिया आलीच की!
या स्वैपाक साधनेतले मसाले पण मजेदार! पहिला मसाला म्हणजे ‘शंका’! सान सा निम त्याला ‘ग्रेट डाऊट’ म्हणजे महान शंका म्हणायचे! साधीसुधी शंका नव्हे! ‘मी कोण आहे?’ असं विचारणारी ही शंका! ‘धनंजय’ हे असेल माझं नाव, पण ते माझं खरं नाव आहे का?
- ही शंका महान शंका म्हणायची. या प्रश्नानं स्वैपाक साधनेची चूल पेटवायची!
दुसरा मसाला म्हणजे श्रद्धा. ही श्रद्धा कशी?
- जे समोर दिसेल ते जसं असेल (आपल्याला हवं तसं नव्हे) तसं पाहणं म्हणजे श्रद्धा किंवा निखळ सत्यावरचा विश्वास! निळं निळं आभाळ आणि हिरवं हिरवं गवत यापेक्षा सत्य निराळं नसतं.
शंका ही प्रश्न उभा करते आणि श्रद्धा ही उत्तरापुढचा पडदा बाजूला करते.
पण आणखी एका मसाल्याची गरज आहे. ती म्हणजे ‘निश्चय’! हा निश्चय तात्पुरता नव्हे. दहा हजार वर्षे टिकणारा. सान सा निम आम्हाला सांगायचे, ‘ट्राय, ट्राय, ट्राय, टेन थाऊजंड इयर्स!’ हे निश्चयाशिवाय होणारं काम नाही.
‘रेसिपी’मध्ये नेहमी सांगतात, किती वेळ शिजवा म्हणून! आणि त्या आधी ‘तयारीची वेळ’ म्हणजे ‘प्रिपरेशन टाइम’पण देतात. ङोन स्वैपाक साधनेमधे हा प्रश्न विचारायचा नसतो. साक्षात्काराच्या ‘रेसिपी’ला वेळेचं बंधन जरुरीचं नाही आणि सांगता पण येत नाही. कधी एक क्षण तर कधी दहा हजार वर्षे! ‘मन ‘मुख्य. तीन मसाले- शंका, श्रद्धा, निश्चय!
‘मीठ’ कोणतं? - ते ङोन गुरूंकडे!
तुमच्या साधनेसाठी ‘मीठ’ विचारायचं तर त्यांच्याकडे! सान सा निम जाऊन अनेक वर्षे झाली. मी अजून स्वैपाक करतोय!
- मिठासाठी थांबलोय!.