- सुमंत अयाचित मुख्य उपसंपादक, औरंगाबादआपल्याला दर महिन्याला शून्य रुपये लाइट बिल आले तर? ही कल्पनाच किती सुखावह आहे ना. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा या सूर्यमंदिरासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या गावातील सर्व घरांत ही संकल्पना अक्षरश: प्रत्यक्षात उतरली आहे.दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस सौरऊर्जेवर चालणारे देशातील पहिले गाव म्हणून मोढेराने जगभरात लौकिक मिळविला आहे. या सोलार व्हिलेजमध्ये १,३०० घरे असून, प्रत्येक घराच्या छतावर एक किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा प्रणाली बसविण्यात आली आहे. सौरऊर्जेमुळे गावातील लोकांचा पैसा आणि वेळही वाचत आहे. येथील जगप्रसिद्ध सूर्यमंदिरात सौरऊर्जेने संचलित ३-डी प्रोजेक्शनद्वारे पर्यटकांना मोढेराचा समृद्ध इतिहास सांगण्यात येत आहे. दररोज सायंकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंत होणाऱ्या या ३-डी लाइटिंग शोमुळे पर्यटकही आकर्षित होणार आहेत. सौरऊर्जेने गाव उजळण्यासाठी राज्य सरकारने १२ हेक्टर जमीन दिलेली आहे. या गावाप्रमाणेच संपूर्ण देशाचे वीजबिल शून्य रुपये होईल, तो सुदिन म्हणावा लागेल.
महाराष्ट्रात हे करता येईलटप्प्याटप्प्याने गावागावांतील घरावर सौर पॅनेल उभारता येईल. शेतात सौर पॅनेल उभारून दिवसाही शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध करून देता येईल.गावागावांतील पथदिवे सौरऊर्जेवर करता येतील. ज्या दुर्गम भागांत वीज पोहोचत नाही किंवा चोवीस तास उपलब्ध होत नाही, तेथे सौरऊर्जा प्रकल्प उभारून गावांचा विकास करता येईल.नापीक जमिनीवर मोठमोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून अक्षय ऊर्जा मिळविता येईल. याद्वारे रोजगारही उपलब्ध होईल. आता विजेवरची वाहने आली आहेत. अशा स्थितीत गावांत व महामार्गांवर सौर ऊर्जेवरचे चार्जिंग पॉइंट करता येतील.
येथे सरकारच वीज खरेदी करतेकेसाभाई प्रजापती (वय ६८) यांचा मातीची भांडी बनविण्याचा व्यवसाय असून, पूर्वी त्यांना दर महिन्याला १,५०० रुपये लाइट बिल यायचे. आता सौरऊर्जेवरील यंत्रे वापरल्यामुळे उत्पादन तर वाढलेच आहे, पण खर्चही कमी झाला आहे. त्यांच्या गावाची लोकसंख्या सुमारे ६,५०० आहे. गावातील मुख्य व्यवसाय मातीचे भांडे बनविणे, टेलरिंग, शेती आणि पादत्राणे बनविण्याचा आहे. संपूर्ण गावात सौरऊर्जा यंत्रणा लावण्यात आल्यामुळे त्यांची जास्त झालेली सौर वीज सरकार खरेदी करते.मुले घरात अभ्यास करू शकतीलवीज बिल भरण्यातून सुटका झाल्यामुळे उरलेल्या पैशांतून टेलरिंग करणारे ४३ वर्षीय प्रवीण भाई आता गॅस कनेक्शन, स्टोव्ह घेण्याचा विचार करीत आहेत. गावातील अनेक घरांमध्ये आजही जळणासाठी लाकडांचा वापर केला जातो. पूर्वी मला माझ्या मुलांना रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करण्यास सांगावे लागत होते. आता मुले घरात बसून अभ्यास करू शकतील.विजेचे झीरो बिल झाले व्हायरल४२ वर्षीय गडवी कैलाशबेन यांचे विजेचे झीरो बिल व्हायरल झाले आहे. त्या म्हणतात, सौरऊर्जा नव्हती तेव्हा मला वीजबिलासाठी मोठी रक्कम भरावी लागत होती. आता घरात फ्रीजपासून वॉशिंग मशीनपर्यंत सर्व काही सौरऊर्जेवर चालते. त्यातून उरलेल्या पैशांचा वापर मी मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे.सूर्यमंदिराचेच गाव का निवडले?मोढेरा येथे सूर्यदेवाचे मंदिर आहे. त्यामुळे हे गाव व समुदायासाठीची संपूर्ण ऊर्जा सूर्यापासून आली पाहिजे, या विचाराने सौरप्रकल्पासाठी या गावाची निवड करण्यात आली. गावकऱ्यांना हरितऊर्जेच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. सौर मंदिर परिसरातील पार्किंगमध्ये चार्जिंग पॉइंट दिले आहेत, असे गुजरातच्या ऊर्जा व पेट्रो केमिकल्स विभागाच्या प्रधान सचिव ममता वर्मा यांनी सांगितले.