- मुलाखती आणि शब्दांकन :सोनाली नवांगुळ
आमची पिढी इतकी एक्सपोज्ड आहे सगळ्याच गोष्टींना की स्वत:ची भाषा सापडत नाहीये आम्हाला. जे सगळं पाहतो, वाचतो त्यातून वाटतं की आपल्याला जे वाटतंय ते सगळं होऊन गेलंय, कुणीतरी आधीच करून ठेवलंय, मग आपण नवं काय लिहिणार आहोत? आजची संवेदना मांडण्यासाठी शब्द कुठले हे कळत नाही. मी जी भाषा वाचते, मला आवडते, ती जुनी आहे, मग आमचं आजचं एक्सप्रेशन काय हे कळत नाही. सापडेपर्यंत थांबावं लागतं. कदाचित हा संघर्ष प्रत्येक काळात होत असेल.
मोठय़ा मोठय़ा घटना सतत मनावर आदळत राहतात. त्यांचं प्रमाण आणि वेग इतका आहे की प्रत्येक मोठी गोष्ट सतत ऐकून- पाहून ढोबळ होत जाते. त्यावर लिहायला गेलं तर तेही या ढोबळपणामुळं गवसत नाही.
- मनस्विनी लता रवींद्र नाटककार, पटकथा-संवादलेखक
कला, साहित्य, भाषा, तत्त्वज्ञान याकडे ज्या समाजाचं लक्ष असतं आणि ते विकसित करावं असं ज्याला वाटतं तो आदर्श समाज. आपल्या शिक्षणव्यवस्थेत कला व भाषेचे शिक्षक सरप्लस होतात. जेमतेम लायकी नसणारेही व्यवस्थेत शिकवण्याच्या, सांगण्याच्या जागेवर येऊन बसलेत आणि जे गांभीर्यानं या गोंधळाबद्दल सांगू, बोलू पाहतात त्यांना व्यवस्था बाजूला नेऊन बसवते. शिक्षणातून कुशल कामगार व आदर्श नागरिक घडावा हा दृष्टिकोन व्यावसायिक आहे. तो चांगला माणूसही व्हावा असा विचार झाला तर नवीन ऊर्जेला संधी आहे. लेखक घडवण्याची गोष्ट फार दूर, आपण अजून चांगला वाचक होऊ किंवा घडवू शकत नाही आहोत. पाश्चात्त्य जगात लेखनव्यवसायावर करोडपती होणारे लोक स्वप्नवतच वाटतात इथे. एखाद्या सजर्काला विद्यापीठ घडवू शकत नाही, फारतर आकार देऊ शकतं. वाचणारे घडतील तर बदलाला बरीच जागा आहे.
- गणेश विसपुते लेखक, कवी आणि अनुवादक
मोजक्याच लाडक्यांना पुढे आणणारी साहित्यपरंपरा केवळ जुनी आहे, म्हणून ती श्रेष्ठ होती असं नव्हे. या परंपरेचं मी कौतुक नाही करू शकत. साहित्यवृद्धीसाठी उपकारक नसणारी ही चाकोरी नव्या समाजमाध्यमांनी मोडली ते बरंच झालं. ठराविकांची पाठराखण, हांजीहांजी, वा्मयीन नियतकालिकात वर्णी, शिफारस यातून काही चांगलं घडलंही असेल; पण ती पोषक संस्कृती नव्हती. आज एक पुस्तकही न येता आपण लिहिलेली कविता फेसबुकच्या वॉलवर पोस्ट केली की तिच्यावर वाचणारे बोलतात, काही सुचवतात, शेअर करतात आणि आवडत राहिलं तर आपण नवं काय करतो याची वाट पाहतात.
तुम्ही वाईट, बिनबुडाचं लिहिलं की इथे तुम्हाला झोडपूनही काढतात. त्याअर्थी हा आरसाही आहे.
हे मला आवडतं. महत्त्वाचं वाटतं.
- वीरा राठोड युवा-साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी