"गलिच्छ! या नराधमांना...", मणिपूरमधील महिला अत्याचाराचा व्हिडिओ पाहून हेमंत ढोमे संतापला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:10 AM2023-07-21T11:10:37+5:302023-07-21T11:14:10+5:30
Manipur Violence : मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या व्हिडिओवर हेमंत ढोमेची संतप्त प्रतिक्रिया
मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. महिलांची निर्वस्त्र धिंड काढणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. मणिपूरमधील या प्रकाराबाबत कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला. आता मराठी अभिनेता हेमंत ढोमेने याबाबत ट्वीट केलं आहे.
हेमंत ढोमेने मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. त्याने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "गलिच्छ!!! या नराधमांना जनावरं म्हणणं सुद्धा जनावरांचा अपमान आहे…," असं म्हणत हेमंत ढोमेने ट्वीटमधून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांनी कमेंट करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गलिच्छ!!! या नराधमांना जनावरं म्हणणं सुद्धा जनावरांचा अपमान आहे…#निषेध#Manipur_Violencepic.twitter.com/iwRk5NVubg
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) July 20, 2023
मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?
मणिपूरमध्ये कुकी समुदायातील तीन महिलांची मैतेई समुदायातील लोकांकडून छेडछाड करण्यात आली होती. ४ मे रोजी त्यांना निर्वस्त्र करुन धिंड काढण्यात आली होती. घटनेच्या २१ दिवसांनंतर या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तीन महिलांना निर्वस्त्र करुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. यातील १९ वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. मणिपूरमधील या व्हायरल झालेल्या व्हिडिओची मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपीला गुरुवारी(२० जुलै) अटक केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. जमावाकडून पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपीचं घर जाळण्यात आलं आहे.