मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने सेटवर खेचले होते अलका कुबल यांचे केस; कारण..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 12:28 PM2023-05-02T12:28:54+5:302023-05-02T12:29:38+5:30
Alka kubal : या घटनेनंतर अलका कुबल बराच वेळ रडत बसल्या होत्या
मराठी कलाविश्वातील सोज्वळ, लोभसवाणा चेहरा म्हणजे अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal). आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे अलका कुबल यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. त्यातच माहेरची साडी या चित्रपटाने त्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आजवरच्या कारकिर्दीत अलका कुबल यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये,दिग्गज कलाकारांसोबत काम केलं आहे. मात्र, एकेकाळी सेटवर त्याच्यासोबत एक थक्क करणारा प्रसंग घडला होता. सिनेमाचं शुटिंग सुरु असताना एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अलका कुबल यांचे केस खेचले होते.
'लेक चालली सासरला' या सिनेमातून अलका कुबल यांनी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यावेळी अलका या एवढ्या मोठ्या प्रसिद्ध अभिनेत्री होतील असं फारसं कोणाला वाटलं नव्हतं. परंतु, कोणीही गॉडफादर नसताना त्यांनी स्वत:च्या मेहनतीवर कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं. याच सिनेमाच्या सेटवर एक किस्सा घडला होता. ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांनी अलका कुबल यांचे जोरात केस खेचले होते. हा किस्सा ललिता ताम्हाणे यांनी शेअर केला आहे.
शशिकला यांनी का खेचले अलका कुबलचे केस?
'लेक चालली सासरला' या सिनेमात अलका कुबल यांनी सुनेची तर, शशिकला यांनी सासूची भूमिका साकारली होती. या सिनेमात या दोघींचा स्वयंपाक घरातील एक सीन होता. यात अलका कुबल स्टुलावर चढून लोणच्याची बरणी काढत असतात. मात्र, त्यांच्या हातून ती बरणी निसटते आणि खाली पडते. परिणामी, सासूच्या भुमिकेतील शशिकला तावातावे येतात आणि रागाने सुनेचे (अलका कुबल) केस खेचत तिला फरफटत हॉलमध्ये आणतात. विशेष म्हणजे या सीनदरम्यान, शशिकला यांनी अलका कुबल यांचे केस खरोखर जोरात खेचले होते. ज्यामुळे अलका कुबल रडायला लागल्या. शशिकला यांनी जरी मुद्दाम केलं नसलं तरीदेखील अलका कुबल यांना त्रास झाला. परिणामी, त्या सेटवरच रडायला लागल्या.
दरम्यान, शशिकला यांनी खरोखर अलका कुबल यांचे केस खेचले नव्हते तर केवळ चित्रपटाचा भाग म्हणून तसं केलं होतं. मात्र, त्यांनी खूप जोरात केस खेचल्यामुळे अलका कुबल यांचं डोकं बराच वेळ दुखत होतं. त्यामुळे अलका कुबल यांनीही मस्करीत, पुढच्या सिनेमात सून सासुचे केस खेचतीये असा प्रसंग असला पाहिजे. मी सून आणि शशिकलाबाई सासू. म्हणजे मला आजची परतफेड करता येईल, असं अण्णासाहेबांना म्हटलं.