अशी ही बनवाबनवी हा चित्रपट नाहीये ओरिजनल, या बॉलिवूड चित्रपटाचा आहे रिमेक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:39 PM2019-05-09T18:39:58+5:302019-05-09T18:41:40+5:30
अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयासोबतच या चित्रपटाची कथा देखील प्रेक्षकांना भावली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, हा चित्रपट ओरिजनल नसून एका चित्रपटाचा रिमेक आहे
अशी ही बनवाबनवी या चित्रपटाला आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला त्याकाळात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
या चित्रपटाला 30 वर्षांहून अधिक काळ झाला असला तरी हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा असून या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. या चित्रपटातील अनेक संवाद आजही प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत. धनंजय माने इथेच राहातात का? हा संवाद या चित्रपटातील आहे हे माहीत नसलेले लोक बोटावर मोजण्याइतके मिळतील. या चित्रपटाला मराठीत जितकी लोकप्रियता मिळाली, तितकी कोणत्याही चित्रपटात क्वचितच मिळते.
अशी ही बनवाबनवी या चित्रपटात सचिन पिळगांवकर यांनी काम करण्यासोबतच त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयासोबतच या चित्रपटाची कथा देखील प्रेक्षकांना भावली होती. पण तुम्हाला माहीत आहे का, हा चित्रपट ओरिजनल नसून एका चित्रपटाचा रिमेक आहे. तुम्हाला ही गोष्ट वाचल्यानंतर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरे आहे. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट एका बॉलिवूड चित्रपटावरून बनवण्यात आला आहे.
बीवी और मकान हा चित्रपट चांगलाच गाजला होता. अशी ही बनवाबनवी हा चित्रपट याच चित्रपटाचा रिमेक असून या चित्रपटात कॉमेडीचा बादशहा मेहमूद मुख्य भूमिकेत होता. तसेच बिस्वजीत, कल्पना, शबनम पद्मा यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. चुपके चुपके, खुबसुरत यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिलेल्या हृषिकेष मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तर हेमंत कुमार या चित्रपटाचे निर्माते होते. बीवी और मकान या चित्रपटाची कथा आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटाची कथा अगदीच सारखी आहे.