मराठी सिनेसृष्टीतील 'या' गोष्टीची अशोक मामांना आजही वाटते खंत; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 11:38 AM2023-06-14T11:38:22+5:302023-06-14T11:39:46+5:30
Ashok Saraf: अशोक सराफ यांनी पडद्यापासून दूर राहण्याचं कारण सांगितलं.
मराठी कलाविश्वातील विनोदाचा बादशाह म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf). कधी नायक,कधी खलनायिक तर कधी विनोदी भूमिका साकारुन अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. आजवरच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांच्या कित्येक भूमिका गाजल्या. परंतु, गेल्या काही काळात त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. त्यामुळे अशोक मामा पुन्हा रुपेरी पडद्यावर का झळकत नाही असा प्रश्न चाहत्यांना पडतो.
अलिकडेच अशोक सराफ यांनी 'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात हजेरी लावली होती. यावेळी 'लोकमत फिल्मी'शी बोलत असताना त्यांनी पडद्यापासून दूर राहण्याचं कारण सांगितलं. सोबतच एका गोष्टीची प्रचंड खंत वाटते असंही त्यांनी म्हटलं.
अशोक मामांवर आली होती चेहरा लपवायची वेळ; ब्लँकेट खाली बसून केला होता कोल्हापूरचा प्रवास
"सध्या मी सिनेमा करत नाहीये. कारण, मला कोणी लिहूनच देत नाहीये. कोणी रायटरच सध्या नाहीये. पूर्वी मी जी कॉमेडी केली ती आता करु शकत नाही. पण, लोक कॉमेडियन म्हणून मला पहिल्यांदा ओळखतात. ते मला स्क्रिप्टही तशीच देतात. त्यांच्या समोर मी कॉमेडियन आहे. पण, मी बाकीचेही रोल केले आहेत हे त्यांना माहित नाही. किंवा कदाचित मी बाकीचे रोल करु शकतो याची त्यांना खात्री नाही. त्यामुळे मला ते असे रोल विचारत नाही. कॉमेडी रोलच विचारतात. आता सध्या माझ्या वयाची आणि माझ्या स्टाइलची कॉमेडी लिहणारं आहे कोण? त्यामुळे ही माझी मोठी खंत आहे", असं अशोक सराफ म्हणाले.
तिच्यासारखी तिच..; रंजनाविषयी अशोक सराफ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत
पुढे ते म्हणतात, "सध्याच्या घडीला कॉमेडी होत का नाहीये. ती त्या पद्धतीने लिहिली का जात नाहीये. आणि, जे लिहितात त्याला कॉमेडी म्हणायचं की आपल्या स्वत:ला फसवायचं हा प्रश्न आहे. त्यामुळे मी सध्याचे कॉमेडी रोल करत नाही. माझ्याकडे स्क्रिप्ट येतात. मी त्या वाचतो आणि बाजूला ठेवतो. मला जमणार नाही असं सांगतो. कारण, मला करावंसं वाटत नाही. त्यामुळे सध्या मी काही करत नाहीये. पण, एखादी चांगली स्क्रिप्ट आली तर मी ती करेन.
दरम्यान, अशोक सराफ यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी एकाहून एक दर्जेदार सिनेमा कलाविश्वाला दिले. सगळीकडे बोंबाबोंब, चंगू मंगू, अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, शेजारी शेजारी अशा किती तरी सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली.