"मला राजकारणात यायचं आहे", केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, "राज ठाकरेंसाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:28 PM2023-07-25T12:28:48+5:302023-07-25T12:29:30+5:30
केदार शिंदे राजकारणात येणार? 'त्या' वक्तव्यामुळे चर्चेला उधाण, म्हणाले, "मला राज ठाकरेंसाठी..."
'अगं बाई अरेच्चा', 'जत्रा', 'महाराष्ट्र शाहीर' असे एक सो एक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारे दिग्दर्शक केदार शिंदे सध्या चर्चेत आहेत. त्यांचा 'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद पाहून केदार शिंदे भारावून गेले आहेत. ब्लॉकबस्टर सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीला दिल्यानंतर केदार शिंदेंनी आता राजकरणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
'बाईपण भारी देवा'च्या यशानंतर केदार शिंदेंनी नुकतीच महाराष्ट्र टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली. "मनोरंजनसृष्टी सोडून स्वत:साठी करावीशी वाटणारी अशी कोणती गोष्ट आहे का?" असा प्रश्न केदार शिंदेंना या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उत्तर देत ते म्हणाले, "माझ्या घरी हे ऐकल्यानंतर काय वाटेल, मला माहीत नाही. पण, मला राजकरणात यायचं आहे. आजच्या राजकारणावर मला भाष्य करायचं नाही. मला चांगल्या उद्देशाने राजकारणात जायचं आहे."
'ओपेनहायमर'मध्ये इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीतेचं वाचन, 'महाभारत' फेम अभिनेता म्हणाला...
"आपण नेहमीच कोपऱ्यावर बसून असं नको व्हायला, तसं नको व्हायला म्हणतो. आपण जोपर्यंत त्या मैदानात उतरत नाही, तोपर्यंत आपल्याला बोलायचा अधिकार नाही. फक्त आधी मी माझ्या कामातून पैसे मिळवून सगळं सेट करेन. राजकारण माझं उदरनिर्वाहाचं साधन होता कामा नये. मी लोकांची कामं करेन. आणि मला मनापासून हे करायचं आहे. मला राज ठाकरेंसाठी हे करायचं आहे. आमच्या पडत्या काळात त्यांनी आमची साथ दिली. त्यामुळे त्यांच्या पडत्या काळात मला त्यांच्याबरोबर उभं राहायचं आहे. मला मंत्रीपदासाठी हे करायचं नाही. त्यातून मला सांस्कृतिक क्षेत्रासाठी काम करायची इच्छा आहे. सिनेमासाठी, नाट्यगृहांसाठी मला काम करायचं आहे," असंही केदार शिंदेंनी सांगितलं.
‘बाईपण भारी देवा’ने २४ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी, केदार शिंदे म्हणाले, “सैराटनंतर...”
सध्या केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा' या मराठी सिनेमाने अनेक बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. या सिनेमाने २४ दिवसांत ६५ कोटींची कमाई केली आहे. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमात रोहिणी हट्टांगडी, दीपा परब, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.