दादा कोंडके यांना करावी लागली होती ही नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:36 PM2018-08-08T17:36:13+5:302018-08-08T17:36:54+5:30
दादा कोंडके यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असल्याने त्यांचे बालपण खूपच हलाखीत गेले. नायगावच्या मराठी कामगार वस्तीमध्ये ते लहानाचे मोठे झाले.
दादा कोंडके यांचा आज वाढदिवस आहे. दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर अनेक वर्षं राज्य केले. त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ ला मुंबईत झाला. दादा कोंडके यांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असल्याने त्यांचे बालपण खूपच हलाखीत गेले. नायगावच्या मराठी कामगार वस्तीमध्ये ते लहानाचे मोठे झाले. उदरनिर्वाहासाठी दादांनी अपना बाजार येथे नोकरी देखील केली आहे. ते लहानपणापासून नायगाव परिसरात खूपच प्रसिद्ध होते. त्यांना बँडवाले दादा असेच म्हटले जात असे.
दादा कोंडके यांनी सेवा दलाच्या बँड पथकामध्ये देखील काम केले आहे. त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात काम केले होते. त्यानंतर ते नाटकांमध्ये काम करू लागले. त्यानंतर त्यांनी दादा कोंडके आणि पार्टी असे पथकही काढले. त्याचवेळी त्यांची वसंत सबनीसांसोबत ओळख झाली. त्या दोघांची त्यावेळी चांगली मैत्री झाली आणि त्यांनी पुढे जाऊन स्वतःची नाटक कंपनी काढली. त्यानंतर विच्छा माझी पुरी करा हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आणले. हे नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या नाटकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे दादा कोंडके यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या. त्यांनी भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटानंतर सोंगाड्या हा त्यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाने त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत एक ओळख मिळवून दिली. त्यांनी राम राम गंगाराम, बोटं लावीन तिथे गुदगुल्या, पांडू हवालदार, आंधळा मारतो डोळा यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले.
दादा कोंडके यांचे लग्न झालेले होते. तसेच त्यांना तेजस्विनी नावाची मुलगी देखील होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणूनच वावरत असत. १४ मार्च १९९८ ला दादरला राहात्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पुतण्याने म्हणजेच विजय कोंडकेंनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते.