सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या 'शुभ लग्न सावधान'चा ट्रेलर तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 12:16 IST2018-09-20T12:12:08+5:302018-09-20T12:16:38+5:30
डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी शुभ लग्न सावधान या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे.

सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या 'शुभ लग्न सावधान'चा ट्रेलर तुम्ही पाहिला का?
लग्न म्हटले की, लगीनघाई ही आलीच! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित येत्या १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच मंगलमय वातावरणात ट्रेलर लाँच करण्यात आला. दादर येथील नक्षत्र मॉलमध्ये पार पडलेल्या या दिमाखदार ट्रेलर सोहळ्याचा उपस्थितांनी मनमुराद आस्वाद घेतला. मराठमोळ्या लग्नसमारंभाचा माहौल तयार करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, हजर राहिलेल्या प्रत्येकांचा विशेष पाहुणचारदेखील यादरम्यान करण्यात आला.
लग्नसंस्थेवर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमधून मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांची रेलचेल या चित्रपटात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर 'लग्न' या विषयावर फिरतो. लग्नाबद्दलचे विविध लोकांचे मतमतांतरे यात आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक ख्रिश्चनधर्मीय लग्नदेखील यात आपणास दिसून येत आहे. तसेच लग्नापासून दूर पळत असलेल्या नायकाची प्रेमाबद्दलची परिभाषादेखील यात पाहायला मिळते. एकंदरीतच हा ट्रेलर पाहताना 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा संपूर्णतः कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याची जाणीव होते.
डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. विवाहोत्सुकांना आपलासा करणारा हा सिनेमा, कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून आकारास आला आहे. तसेच या सिनेमास तृप्ती पुराणिक आणि त्यांच्या स्टुडियो एलिमेंटस्ने निर्मिती सहाय्य केले आहे. सहनिर्मात्यांची धुरा अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे आणि तुषार कर्णिक यांनी सांभाळली आहे. नवरात्रीच्या धामधुमीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेला 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट कुटुंबियांसोबत पाहायला जाण्यास प्रेक्षकदेखील नक्कीच आतुर झाले असतील, हे निश्चित!