ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:54 PM2022-12-06T12:54:09+5:302022-12-06T13:12:26+5:30
मोहनदास सुखटणकर हे मुळचे गोव्याचे होते. गोव्याच्या 'धि हिंदू असोसिएशन'च्या माध्यमातून त्यांनी नाटकाला सुरुवात केली.
ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'रायगडाला जेव्हा जाग येते' हे त्यांचे गाजलेले नाटक. आज त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
मोहनदास सुखटणकर हे मुळचे गोव्याचे होते. 'दि गोवा हिंदू असोसिएशन'च्या माध्यमातून त्यांनी नाटकाला सुरुवात केली. 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'कैवारी', 'जावई माझा भला' ही नाटके तर 'चांदणे शिंपीत जा', 'वाट पाहते पुनवेची', 'निवडुंग' यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी भुमिका केल्या. तर 'दामिनी', 'बंदिनी', 'महाश्वेता' या त्यांच्या काही मराठी मालिका. मात्र ते मालिकांमध्ये फारसे रमले नाहीत. त्यांनी नेहमीच रंगभुमीला प्राधान्य दिले.
समीर चौगुलेची घेतली भेट
महाराष्ट्राची हास्यजत्रा यामधुन लोकप्रिय झालेला विनोदी कलाकार समीर चौगुलेला त्यांनी घरी भेटायला बोलावले होते. '९३ वर्षांचा आहे रे तुला भेटायची इच्छा आहे, पण शक्य होत नाही, एकदा घरी भेटायला ये असे ते समीर ला म्हणाले होते.' समीर ने त्यांच्या भेटीचा किस्सा सांगितला होता.
दि गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातुन त्यांनी नाट्यसेवा सुरु केली. यानंतर ते याच असोसिएशनमध्ये कार्यकर्ता म्हणून वावरले. त्यामुळे या संस्थेला त्यांच्या आयुष्यात महत्वाचे स्थान होते. त्यांनी ४० हून अधिक नाटकांमध्ये काम केले. 'मत्स्यगंधा', 'लेकुरे उदंड झाली', 'अखेरचा सवाल', 'दुर्गी', 'स्पर्श', 'आभाळाचे रंग' ही देखील त्यांची गाजलेली नाटके आहेत.