“सुनो द्रोपदी शस्त्र उठा लो...”, मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणावर सोनालीची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:08 AM2023-07-27T11:08:07+5:302023-07-27T11:08:54+5:30

“मी माझ्या मुलीला जगाबद्दल काय सांगू?”, मणिपूर घटनेवर सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया

marathi actress sonali kulkarni angry post on manipur women violence video | “सुनो द्रोपदी शस्त्र उठा लो...”, मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणावर सोनालीची संतप्त पोस्ट

“सुनो द्रोपदी शस्त्र उठा लो...”, मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणावर सोनालीची संतप्त पोस्ट

googlenewsNext

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात विविधांगी भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील घडामोडींवर ती तिचं मत अगदी परखडपणे मांडताना दिसते. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या मणिपूरमधील महिलांच्या धक्कादायक व्हिडिओबाबत सोनालीने पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करुन त्यांची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मणिपूरमधील या घटनेवर सर्वच स्तरातून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला गेला. अनेक सेलिब्रिटींनीही याबाबत पोस्ट केली होती. आता सोनालीने फेसबुकवरुन पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्याच्या ट्राफिकमध्ये ५ तास अडकलेला मराठी अभिनेता, म्हणाला, “ऑपरेशन झालेली माझी आई...”

सोनालीने पोस्टमध्ये काय म्हटलं?

“माझी मुलगी ११ वर्षाची आहे.. तिला सध्या सुट्टी आहे.. सुट्टीत तिच्यासाठी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आम्ही प्लॅन करत असतो...त्यातली एक गंमत म्हणजे रोज वर्तमानपत्रातल्या ३-४ बातम्या तिने वाचायच्या..कला, क्रीडा, समाज, राजकारण, विज्ञान, विश्व, माणसं...याबाबत कितीतरी गोष्टी तिच्या कानावर पडतात, तिला सांगण्याच्या निमित्ताने आमची माहिती, स्मृती ताजी होते...किती मजेत जाते सकाळ...पण गेल्या आठवड्यापासून माझा थरकाप उडाला आहे...मी आणि नचिकेत कावेरीपासून पेपर लपवतो आहोत.. एका लहान निरागस मुलीला आपल्या देशातली ही बातमी कुठल्या तोंडानं सांगू आम्ही..? की एका मोठ्या जमावाने दोन स्रियांना विवस्त्र करून हुल्लडबाजी करत, त्यांच्या शरिराला निंदनीय स्पर्श करत त्यांची धिंड काढली.. हा विकृत खेळ दिवसाढवळ्या झाला.. त्या असहाय्य स्त्रिया बचावासाठी पळत असताना कुठलाही समर्थ जबाबदार पुरूष त्यांना वाचवायला पुढे आला नाही..

स्त्रीवर परिस्थितीचा, इतिहासाचा सूड उगवू शकतो हे कोणी ठरवलं.. कोणी ठरवलं की स्त्री एक साधन आहे. तिचा आपण हवा तसा उपयोग करू शकतो...तीव्र संताप येतोय तेच तेच लिहिण्याचा...तो एक व्हिडिओ जेमतेम १० सेकंद पाहू शकले मी...त्यात काहींनी त्या बायांना केलेले अक्षम्य क्रूर अश्लील स्पर्श दिसले.. त्यात त्या पुरूषांची जात दिसली - त्या जातीचं नाव होतं नराधम! साधा चुकून पाय लागला कोणाला तर चटकन नमस्कार करतो आपण...परस्त्रीला मातेसमान मानतो आपण.. भारतीय संस्कार किती महान असतात म्हणतो आपण...मग? हे आहेत आपले संस्कार? अब्रूचे धिंडवडे काढायला शिकवणारे? बलात्कार झाल्यानंतर हौतात्म्य आणि सहानुभूती देणाऱे?

आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहेत, मंगळावर यान पाठवणाऱ्या टीममधे प्रामुख्यानं महिला शास्त्रज्ञ आहेत. यासाठी अभिमान वाटून घेत असताना हे काय घडून बसलं...सरकार, पोलीस, पत्रकार, समाजसेवक, न्यायव्यवस्था त्यांचं कर्तव्य करतीलंच...आशा तरी ठेवूया...गरज आहे ही मानसिकता बदलण्याची...हे पुरूष बदलण्याची! अशा गुन्ह्याला जबरदस्त दहशतीची शिक्षा सुनावण्याची...अशी सजा...जी ऐकून त्या झुंडीच नाही, तर कुणाच्याच पुढच्या सात पिढ्या मनातही पाप करू धजल्या नाही पाहिजेत...रडू येऊ नये म्हणून दात घट्ट मिटून ठेवले तरी डोळ्यातून घळघळ पाणी येतंय. जीव घाबरा होतोय...रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीबाळीला सुरक्षित घरी पोचवावंसं वाटतंय.. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, निर्वस्त्र देह कसाबसा हातांनी झाकून - धरणीमाते पोटात घे - असा मूक आक्रोशाचा भाव असलेल्या त्या दोघी मला पळताना दिसत आहेत.. कुठलं जनावरही असं पाशवी होताना ऐकलं नाहीए आपण..

मी माझ्या मुलीला जगाबद्दल काय चांगलं सांगू.. कोणालाच, कधीच अशा बातम्या वाचायला लागू नयेत.. पुष्यमित्र उपाध्यायांची कविताच अंगी बाणावी लागणार आता प्रत्येकीला...सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो...अब गोविंद ना आयेंगे...”

मणिपूरमधील या हृदयद्रावक घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे.

Web Title: marathi actress sonali kulkarni angry post on manipur women violence video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.