राजामौलींच्या चित्रपटात प्रवीण तरडे साकारणार खलनायकाची भूमिका, म्हणाले, "त्यांनी मला पाहिल्यावरच..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 17:03 IST2023-08-08T17:03:12+5:302023-08-08T17:03:58+5:30
प्रवीण तरडे राजामौलींच्या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण, दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

राजामौलींच्या चित्रपटात प्रवीण तरडे साकारणार खलनायकाची भूमिका, म्हणाले, "त्यांनी मला पाहिल्यावरच..."
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे अभिनयाबरोबरच त्यांच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. 'धर्मवीर', 'मुळशी पॅटर्न', 'सरसेनापती हंबीरराव' यांसारख्या चित्रपटातून प्रवीण तरडेंनी दिग्दर्शनाबरोबरच अभिनयाचीही छाप पाडली. आता प्रवीण तरडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.
प्रवीण तरडे आणि अभिनेता उपेंद्र लिमये यांनी 'बोल भिडू'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी दाक्षिणात्य चित्रपटात काम करणार असल्याचा खुलासा केला आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या चित्रपटातून तरडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत. राजामौलींच्या चित्रपटात तरडे खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रवीण तरडे म्हणाले, "राजामौली सर हे माझे आदर्श आहेत. बाहुबलीच्या आधीपासून जवळपास १३ वर्षांपासून माझ्या ऑफिसमध्ये त्यांचा फोटो आहे. ते एकमेव व्यक्ती आहेत जे त्यांची भाषा, राज्य आणि प्रादेशिकतेला पुढे घेऊन जात आहे. त्यांच्या आजूबाजूच्या समाजाची गोष्ट ते सांगतात."
ट्रक ड्रायव्हरने प्रसिद्ध अभिनेत्रीचं केलेलं अपहरण, म्हणाली, "किडनॅप करुन त्याने मला..."
"त्यांना कधी भेटू शकेन, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण, धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. त्या चित्रपटाचे पोस्टर त्यांच्या हातून प्रदर्शित करण्यात आलं होतं. हैदराबादमध्ये आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी त्यांना तुम्ही माझे आदर्श आहात, असं सांगितलं होतं. तेव्हा गमतीत ते मला तुमचा लूक साऊथ इंडियन आहे, असं म्हणाले. मला पाहिल्यानंतरच त्यांनी तुमचा लूक तामिळ आणि दाक्षिणात्य चित्रपटांना जाण्यासारखा आहे, असं सांगितलं होतं. मी त्यांच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. साऊथमधील व्हिलन जास्त फेमस आहेत. मी आनंदाने या भूमिकेसाठी होकार दिला," असंही प्रवीण तरडेंनी सांगितलं.