Ved Marathi Movie box office collection : ‘वेड’ने अख्ख्या महाराष्ट्राला लावलं ‘याड’...; दोन दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 05:08 PM2023-01-01T17:08:50+5:302023-01-01T17:09:34+5:30
Ved Marathi Movie box office collection : रितेश व जिनिलियाच्या ‘वेड’ या सिनेमानं सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. होय, प्रदर्शनानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे.
Ved Marathi Movie box office collection : रितेश देशमुख (Riteish Deshmukh )आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) ‘वेड’ हा मराठी सिनेमा गेल्या शुक्रवारी (30 डिसेंबर) प्रदर्शित झाला. रितेशने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलंय. जिनिलिया या सिनेमाची निर्माती आहे. शिवाय हा तिचा पहिला मराठी सिनेमा आहे. रितेश व जिनिलियाच्या या सिनेमानं सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. होय, प्रदर्शनानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे.
पहिल्याच दिवशी या सिनेमाने दमदार ओपनिंग करत, महाराष्ट्रातील टॉप 5 दमदार ओपनिंग करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत पाचवं स्थान मिळवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी 3.50 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल शनिवारी या चित्रपटाने 4.40 कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत या चित्रपटाने 7.90 कोटींचा बिझनेस केला आहे. सिनेमाचा बजेट 15 कोटी असल्याचं कळतंय. त्यामुळे ‘वेड’ची सुरूवात दमदार झालीये, असं म्हणायला हरकत नाही.
ओपनिंग डेला 3.50 कमाई करणारा पाचवा मराठी सिनेमा...
‘टाईमपास 2’नंतर 3.50 कोटींची कमाई करणारा ‘वेड’ हा पाचवा सिनेमा ठरला आहे. ‘सैराट’नं पहिल्या दिवशी 3.60 कोटी कमावले होते. तर ‘लय भारी’नं 3.10 कोटींचा बिझनेस केला होता. ‘टाइमपास 2’ नं 3.75 कोटी तर ‘नटसम्राट’नं 3.50 कोटींची कमाई केली होती. ‘वेड’ 3.50 कोटी कमाई करत दमदार ओपनिंग करणाºया सिनेमांच्या यादीत पाचव्या क्रमांकाचा सिनेमा ठरला आहे.
‘वेड’ या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवसात सिनेमात प्रदर्शित झाल्यानं सिनेमाचे सगळे शो हाऊसफुल आहेत. नव्या वर्षात वेड हा सिनेमा आणखी कमाई करेल यात काही शंका नाही.