Ved Marathi Movie : रितेश जिनिलियाचं रोमॅंटिक सॉंग, 'वेड तुझा' गाणं पुन्हा नवीन रुपात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 05:31 PM2023-01-17T17:31:05+5:302023-01-17T17:33:58+5:30
वेड ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता रितेश जिनिलिया चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज घेऊन येत आहेत.
Ved Marathi Movie : मुंबई फिल्म कंपनी निर्मित आणि रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच वेड लावलं आहे. चित्रपटानं आता ५० कोटींकडे घोडदौड सुरु केली आहे. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर आता दोघेही चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज घेऊन येत आहेत.
लोकाग्रहास्तव वेड चित्रपटाच्या टीमनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि मनोरंजनष्टीत ही गोष्ट पहिल्यांदाच होत आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्या नंतर याआधी कधीच कुणी एखादं गाणं नंतर चित्रपटात सामिल केलं नव्हतं. मराठी इंडस्ट्रीतच काय तर अगदी बॉलीवूड,टॉलीवूडमध्ये देखील हे घडलं नव्हतं. पण 'वेड' चित्रपटात आता सत्या(रितेश देशमुख) आणि श्रावणी(जिनीलिया देशमुख) यांच्यावर चित्रित केलेलं 'वेड तुझा..' या गाण्याचं नवं व्हर्जन सामिल करण्यात येणार आहे आणि सोबत काही नवे सीन्सही चित्रित करून सामिल करण्यात आले आहेत. यात सत्या आणि श्रावणीचा रोमान्स बघायला मिळणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी,२०२३ पासून चित्रपटगृहात 'वेड' पाहताना आता या नव्या गाण्याचा आनंदही प्रेक्षक घेऊ शकणार आहेत.
चित्रपटात आधी 'वेड तुझा..' हे गाणं रितेश देशमुख आणि जिया शंकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. त्या गाण्यानेही प्रेक्षकांवर जादू केली. त्यामुळे आता रितेश-जिनीलियाच्या 'वेड तुझा..' या गाण्याच्या नव्या व्हर्जनला देखील रसिक चाहते उचलून धरतील अशी आशा आहे. त्यामुळे आता रितेश-जिनीलियावर चित्रित झालेलं 'वेड तुझे..' गाण्याचं नवं व्हर्जन चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट ठरणार हे नक्की.