गायिका अन् नायिका... आशालता वाबगावकर यांचा जीवनप्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 08:26 AM2020-09-22T08:26:24+5:302020-09-22T08:30:50+5:30
'दि गोवा हिंदू असोसिएशन' या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या 'संगीत संशयकल्लोळ' या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.
आशालता वाबगांवकर या मराठी गायिका, नाट्यअभिनेत्री व चित्रपटअभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. मुंबईत ३१ मे १९४१ रोजी आशालता यांचा जन्म झाला. गिरगावातील 'सेंट कोलंबो हायस्कूल' या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून त्यांनी मानसशास्त्र विषयात एमए केले. घरी नाटक, संगीत कला असे कोणतेही वातावरण नव्हते. तरीही त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक शिक्षण घेत असताना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली.
'अपने पराये' या हिंदी चित्रपटात त्यांनी सर्वप्रथम काम केले. या कामाबद्दल त्यांना बेंगाल क्रिटिक्सचे पारितोषिक मिळाले. रायगडाला जेव्हा जाग येते हे त्यांचे पहिले नाटक होते. 'दि गोवा हिंदू असोसिएशन' या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या 'संगीत संशयकल्लोळ' या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. मुंबई आकाशवाणीवर त्या काळी कोकणी विभागात असणारे विष्णू नाईक यांनी आशालता नाईक या मुलीचे नाव सुचवले. एकही प्रश्न न विचारता प्रसाद सावकारांनी तिची निवड केली. संस्थेने स्पर्धेत सादर केलेल्या 'संशयकल्लोळ', 'शारदा' व 'मृच्छकटीक' या तिन्ही संगीत नाटकांत अनुक्रमे रेवती, शारदा व वसंतसेना या भूमिकांसाठी दर वर्षी आशाताईंना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. पं. गोविंदराव अग्नींनी त्यांची सर्व गाणी पारंपरिक पद्धतीने बसवली होती. त्यांची वसंत सेनेची भूमिका पाहूनच प्रा. वसंतराव कानेटकरांनी 'हीच माझी मत्स्यगंधा,' असे उद्गार काढले होते.
आशालता यांच्या अभिनय कारकीदीर्तील त्यांचे 'मत्स्यगंधा' हे नाटक मैलाचा दगड ठरले. इतक्या वर्षांनंतरही त्यांनी साकारलेली 'मत्स्यगंधा' आजही रसिकांच्या स्मरणात आहे. नाटकातील त्यांनी गायलेली 'गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफेकळी', 'अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा' ही नाट्यपदे गाजली. वसंत कानेटकर लिखित आणि मा. दत्ताराम दिग्दर्शित या नाटकाचे संगीत पं. जितेंद्र अभिषेकी यांचे होते. नाटकातील संगीताने पं. अभिषेकी यांनी नाट्यसंगीताचा बाज बदलला, त्याला नवे रूप दिले. नाटकातील 'सत्यवती' (मत्स्यगंधा)च्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. अठरा वर्षांची अल्लड तरुणी, पराशराकडून फसविली गेलेली आणि सूड घेण्याची प्रतिज्ञा करणारी राजकन्या आणि आयुष्य पूर्णपणे हरलेली राजमाता अशा १८ ते ७० वर्षे वयोगटातील विविध छटा यातून सादर करायच्या होत्या. ते एक आव्हानच होते. १ मे १९६४ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहात नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेले नाटक दुपारी अडीचच्या सुमारास संपले. या नाटकाने त्यांना खूप नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवून दिली.
'मत्स्यगंधा' च्या यशानंतर नाटक पूर्णवेळ करायचे असे ठरवून त्यांनी नोकरी सोडली. 'दि गोवा हिंदू असोसिएशन', 'चंद्रलेखा', 'मुंबई मराठी साहित्य संघ', 'माऊली प्रॉडक्शन', 'कलामंदिर', 'आयएनटी' आदी नाट्यसंस्थांमधून त्यांनी आजवर पन्नासहून अधिक नाटके केली आहेत. या सर्व नाटकांचे मिळून पाच हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत. 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'मदनाची मंजिरी', 'गारंबीचा बापू', 'गुडबाय डॉक्टर', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'स्वामी', 'गरुडझेप', 'तुज आहे तुजपाशी', 'हे बंध रेशमाचे', 'विदूषक', 'ही गोष्ट जन्मांतरीची', 'भावबंधन', 'गुंतता हृदय हे', 'छिन्न', 'देखणी बायको दुसºयाची' ही त्यांची काही गाजलेली नाटके. पु. ल. देशपांडे यांनी दूरदर्शनसाठी केलेल्या 'वा-यावरची वरात'मध्येही त्या होत्या. 'सावित्री', 'उंबरठा', 'पुढचं पाऊल', 'माहेरची साडी', 'नवरी मिळे नव-याला', 'एकापेक्षा एक', 'आत्मविश्वास' आणि अन्य शंभरहून अधिक मराठी चित्रपटही त्यांच्या नावावर आहेत. मराठी नाटक आणि चित्रपटांबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटाचा पडदाही गाजविला. दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले.
दूरदर्शनवर आशाताईंनी एका कोकणी नाटकात भाग घेतला होता. त्यातील त्यांचा अभिनय बघून नामांकित चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी त्यांच्याबद्दल चौकशी केली. त्यांचे 'गुंतता हृदय हे' हे नाटक पाहिले आणि 'अपने पराये' या आपल्या चित्रपटात त्यांना भूमिका दिली. अपने परायेनंतर आशालता यांचा हिंदीतील प्रवास सुरू झाला. अंकुश, अग्निसाक्षी, नमक हलाल, शराबी, कुली, निकाह, सदमा, चलते चलते, जंजीर, आज की आवाज, वो सात दिन, पसंद अपनी अपनी, मंगल पांडे, ये तो कमाल हो गया, तेरी मॉंग सितारोंसे भर दू, मरते दम तक , घायल, शौकिन आदी सुमारे २०० हून अधिक हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. तीन कोंकणी आणि एका इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मुंबई दूरदर्शनवरील महाश्वेता, पाषाणपती तसेच जावई विकत घेणे, कुलवधु या त्यांच्या काही गाजलेल्या मालिका होत. अंकुश चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेले आणि पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांनी गायलेले इतनी शक्ती हमे दे न दाता हे गाणेही लोकप्रिय आहे.
गायिका, गीतलेखिका
विशेष म्हणजे आशालता यांनी कल्याणजी-आनंदजी यांच्या वाद्यवृंदातून मुख्य गायिका म्हणून मुकेश, हेमंतकुमार आदींबरोबर काही काळ गाणीही गायिली आहेत. अभिनेत्री सुधा करमकर यांच्या 'लिटिल थिएटर'च्या 'गणपती बाप्पा मोरया' या बाल नाट्यातील त्यांनी गायलेली 'तू सुखकर्ता तू दु:खहर्ता, विघ्नविनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया' ही आरती आजही लोकप्रिय आहे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात दरवर्षी ही आरती वाजविली जाते. 'एचएमव्ही' कंपनीने त्याची ध्वनिमुद्रिकाही काढली. सुधा करमरकर यांच्यामुळे ती आरती गायची संधी त्यांना मिळाली.
गर्द सभोवती : अनुभवांचा खजाना
गर्द सभोवती हे पुस्तकही त्यांच्या नावावर आहे. यात त्यांना आलेल्या विविध प्रकारच्या ६७ अनुभवांचा समावेश आहे. या पुस्तकाची प्रस्तावना अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे यांनी लिहिली आहे.
आशालता यांच्या भूमिका असलेली नाटके
आश्चर्य नंबर १० (१९७१)
गरुड झेप (१९७३)
गुड बाय डॉक्टर (१९७६)
गुंतता हृदय हे (१९७४)
गोष्ट जन्मांतरीची (१९७८)
छिन्न (१९७९)
देखणी बायको दुसºयाची (१९९२)
मत्स्यगंधा (१९६४)
रायगडाला जेव्हा जाग येते (१९६२)
विदूषक (१९७३)
चित्रपट
आत्मविश्वास (१९८९)
तिन्ही सांजा(२००९)
पकडापकडी (२०११)
मणी मंगळसूत्र (२०१०)
लेक लाडकी (२०१०)
वन रूम किचन (२०११)
आशातार्इंनी गायलेली नाट्यगीते (कंसात नाटकाचे नाव)
अर्थशून्य भासे मज हा कलह प्रीतीचा (मत्स्यगंधा)
गर्द सभोवती रानपाखरे, तू तर चाफेकळी (मत्स्यगंधा)
जन्म दिला मज त्यांनी (मत्स्यगंधा)
तव भास अंतरा झाला (मत्स्यगंधा)
स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या (विदूषक)
चांद भरली रात आहे (विदूषक)
चांदण्यांची रोषणाई मी कधी ना पाहते (विदूषक)
राजसा राजकुमारा (विदूषक)
रवी किरणांची झारी घेऊनी (भावगीत)