Har Har Mahadev Trailer : भगवा ज्याचा श्वास तो मराठी...! पाहा, ‘हर हर महादेव’चा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:16 AM2022-10-11T10:16:11+5:302022-10-11T10:16:24+5:30
Har Har Mahadev Trailer : ‘स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भिंतींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड...,’ हा शिवरायाच्या तोंडचा संवाद ऐकताना अंगावर शहारा येतो....
Har Har Mahadev Trailer : ‘हर हर महादेव’ या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उत्सुकता ताणून धरणारी अनेक कारणंही आहेत. सर्वांचा आवडता अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave ) या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. शरद केळकर बाजीप्रभुंच्या भूमिकेत आहे. शिवाय केवळ मराठीतच नव्हे तर मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड अशा पाच भाषांमधून हा चित्रपट आपल्या भेटीस येतोय. तूर्तास काय तर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
‘स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भिंतींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड...,’ हा शिवरायाच्या तोंडचा संवाद ऐकताना अंगावर शहारा येतो. स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांची झलक चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात सह्याद्रीच्या डोंगरदºया आणि छत्रपती शिवरायांच्या पाठमोऱ्या दर्शनाने होते. यानंतर बाजीप्रभू देशपांडे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात असलेले मतभेद पाहायला मिळतात ‘ज्याला रयतेचा आशीर्वाद तो मराठी... ज्याला जाती पाती वर्ज्य तो मराठी.. भगवा ज्याचा श्वास तो मराठी...हे व असे अनेक डायलॉग खिळवून ठेवतात. ‘राजासाठी सैनिक मरतातंच, पण एका क्षुल्लक सैनिकासाठी मरायला तयार झालेला राजा मी पहिल्यांदाच पाहिला...,’ हा बाजीप्रभूंच्या तोंडचा डायलॉग मनाला भिडतो. लढाईची दृश्ये पाहताना अंगावर रोमांच येतात.
एकंदर ट्रेलर जबरदस्त आहे. आता प्रतीक्षा आहे ती 25 ऑक्टोबरची. होय, दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या 25 ऑक्टोबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होतोय. अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. यात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, हार्दिक जोशी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.