अभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं हे योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 07:27 PM2020-05-26T19:27:33+5:302020-05-26T19:28:24+5:30
उपेंद्र लिमये यांच्या पत्नीची कामगिरी वाचून तुम्हालाही वाटेल त्यांचे कौतूक
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी स्वाती डॉक्टर असल्याचे फारच कमी लोकांना माहित आहे. इतकंच नाही तर कोरोना व्हायरसच्या संकटात त्यांनी मोलाचे योगदानही दिले आहे.
जोगवा, सूरसपाटा, यलो यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता उपेंद्र लिमये याची पत्नी डॉ. स्वाती लिमये होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने अर्सेनिक अल्बम 30 हे होमिओपॅथिक औषध कोरोना होण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवत असल्याचे जाहीर करत या औषधाचे सेवन करण्याचा नागरिकांना सल्ला दिला.
त्याला अनुसरून गोरेगाव येथे राहत असलेल्या होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर स्वाती उपेंद्र लिमये यांनी स्वतः अर्सेनिक अल्बम 30 हे औषध बनविले आहे आणि गोरेगाव व मालाड परिसरातील सुमारे 640 कुटुंबांना औषधाचे मोफत वाटप केले आहे. तसेच त्यांनी मालाड पोलीस स्टेशनमध्ये सुमारे 252 पोलीस कुटुंबासाठी औषध दिले.
येत्या काळात कोरोनाचे संकट लक्षात घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर हे औषध तयार करून मोफत वाटप करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या मोलाच्या कार्यात त्यांचा नवरा म्हणजेच अभिनेता उपेंद्र लिमये, मुलगी भैरवी लिमये तसेच संदीप भोसले, अर्जुन दळवी, आमोद दोशी सहकार्य करत आहे.