'विक्रम गोखले म्हणजे अभिनयाची शाळाच'; 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने शेअर केला अनुभव
By शर्वरी जोशी | Updated: January 10, 2022 17:30 IST2022-01-10T17:30:00+5:302022-01-10T17:30:00+5:30
Rupali suri: विक्रम गोखले यांची एक शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री झळकली आहे.

'विक्रम गोखले म्हणजे अभिनयाची शाळाच'; 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने शेअर केला अनुभव
विक्रम गोखले (vikram gokhale) हे नाव कोणत्याही प्रेक्षक वर्गासाठी नवीन नाही. मराठीसह हिंदी कलाविश्वातही विक्रम गोखले यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आपल्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येणारे विक्रम गोखले यांची एक शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री झळकली असून या शॉर्टफिल्ममध्ये विक्रम गोखले यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे तिने सांगितलं आहे. विशेष म्हणजे 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत 'विक्रम गोखले म्हणजे अभिनयाची शाळाच', असं तिने म्हटलं आहे.
बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली सुरी (rupali suri). जाहिराती, मालिका अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी रुपाली लवकरच एका शॉर्टफिल्ममध्ये झळकणार आहे. या शॉर्टफिल्ममध्ये विक्रम गोखले यांनी तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे एकंदरीत या फिल्मच्या शुटिंगचा अनुभव रुपालीने शेअर केला आहे. तसंच विक्रम गोखले यांच्याकडून प्रत्येक पावलावर नवीन गोष्ट शिकायला मिळाली हे तिने सांगितलं.
"विक्रम गोखले सरांसोबत शॉर्ट फिल्म करण्याविषयी ज्यावेळी मला विचारण्यात आलं त्यावेळी मी कशाचाच विचार न करता थेट होकार कळवला. मी स्क्रिप्ट किंवा अन्य कशाचीच चौकशी केली नाही. कारण, विक्रम सरांसोबत काम करणं म्हणजे शाळेत जाण्यासारखं आहे. त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. त्यांच्याकडून अभिनयातील खूप बारकावे शिकता आले, असं रुपाली म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्यांनी मला स्क्रीनवर मुक्तपणे बागडायला दिलं. पण, सोबतच माझा हातही धरुन ठेवला होता. ज्यामुळे माझे पाय जमिनीवर रहतील. एकंदरीतच या शॉर्टफिल्ममध्ये काम करायचा अनुभव छान होता."
दरम्यान, रुपाली सुरी ही कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. रुपालीने बॉलिवूड चित्रपटांसोबतच 'डॅड..होल्ड माई हॅण्ड' या इंग्रजी चित्रपटातही काम केलं आहे.