'...तर अजित पवारांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही'; प्रवीण दरेकरांनी स्पष्टच सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:40 PM2022-07-28T12:40:37+5:302022-07-28T12:41:09+5:30

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

BJP leader Praveen Darekar has criticized the opposition leader Ajit Pawar. | '...तर अजित पवारांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही'; प्रवीण दरेकरांनी स्पष्टच सांगितले!

'...तर अजित पवारांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही'; प्रवीण दरेकरांनी स्पष्टच सांगितले!

googlenewsNext

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकारने राज्यात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पवार यांनी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, प्रत्यक्ष पाहणी करावी असेही पवार म्हणाले.

विदर्भात झालेल्या अतिवृष्टीने लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेकांचा संसार उघड्यावर आला असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा केला. शेतकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी अजून पंचनामे केले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाही. ते तातडीने करून अहवाल शासनाकडे सादर करा, असे निर्देश त्यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

अजित पवारांच्या या दौऱ्यावर मात्र भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. अजित पवारांना फार लवकर जाग आली. पूरग्रस्त भागाची पाहणी व मदत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तात्काळ पोहोचले होते. वास्तविक पाहता विरोधी पक्ष नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सरकारला सूचना द्यायच्या असतात, परंतु वराती मागून घोडे नाचवण्याचा विरोधी पक्ष नेत्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली. 

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता आणि मी विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता असताना तात्काळ नुकसानग्रस्त भागात पोहचत होतो. परंतु यांचा आपला मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग सोडल्यास महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. म्हणून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ते २० दिवस उशीरा पोहचले, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

 

दरम्यान, राज्यात दहा लाख हेक्टरवरील जमीन पूरामुळे बाधित झाली असून शेती पुराच्या पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. पूरामुळे शेतीसह नुकसान झालेल्या घरांचेही पंचनामे करा आणि नागरिकांना तातडीची मदत करा. निधी केंद्र सरकारकडून आणावी की, राज्य सरकारने द्यावा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र वेळेत मदत झाली पाहीजे असंही पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर तातडीने विधीमंडळाचे अधिवेशन घेण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले.

Web Title: BJP leader Praveen Darekar has criticized the opposition leader Ajit Pawar.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.