नागपूर : केंद्रीय अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या सीमा शुल्कात ९ टक्के कपातीची घोषणा होताच दुपारी २.४० वाजेपर्यंत शुद्ध सोन्याच्या दरात २,९०० रुपये आणि चांदीच्या प्रतिकिलो दरात ३ हजार रुपयांची घसरण झाली. या घसरणीचा फायदा ग्राहकांना होईल आणि सोन्याची तस्करी थांबेल, असा विश्वास सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सोमवारी सोने ७३,४०० तर चांदीचे दर ८९ हजार होते. मंगळवारी खुलत्या बाजारात सकाळी १०.३० वाजता सोने ४०० रुपये तर चांदीत ५०० रुपयांची घसरण झाली. दुपारी १२.२० वाजता सोने पुन्हा ५०० रुपये तर चांदीचे दर एक हजारांनी उतरले. दुपारी १.१० वाजता सोने एक हजार आणि चांदीत दीड हजारांची घसरण झाली. दुपारी १.५० वाजता सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरले, मात्र, चांदीचे दर स्थिर होते. दुपारी २.१० वाजता सोने ५०० रुपये आणि चांदीत ३०० रुपयांची घसरण झाली. दुपारी २.४० वाजता सोन्याचे दर स्थिर होते, मात्र, चांदीत ३०० रुपयांची वाढ होऊन सोने आणि चांदीचे दर अनुक्रमे ७०,५०० आणि ८६ हजारांवर स्थिरावले. एकूणच मंगळवारी दुपारपर्यंत सोने २,९०० रुपये आणि चांदीत तब्बल ३ हजारांची घसरण झाली.