मंळी ! कोरोनाव्हायरस मुळे जागतिक अर्थव्यवस्थेची दोलायमान झालेली स्थिती, भारतामध्ये मागच्या आठवड्यापासून सुरू झाले लॉक डाऊन आणि शेअरबाजारातील भयंकर पडझड यामुळे गुंतवणूकदार म्हणून तुमच्या मनात चलबिचल झालेली असू शकते. मात्र हीच ती वेळ आहे कंबर कसून तयार होण्याची! कशाला बरं तयार व्हायचं?, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? उत्तर आहे - आपली गुंतवणूक जपून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी! ज्यांनी मागच्या दोन ते तीन महिन्याच्या आधी म्युचुअल फंड मध्ये पैसे ठेवलेले आहेत त्यांना अशी शंका आहे की जर आता मार्केट पडणारच आहे तरीही पैसे ठेवून काय करायचं? चला आपण हे फंड विकून टाकूया. ज्यांनी मागच्या वर्षी म्युचुअल फंडात गुंतवणूक केली त्यांची भीती वेगळी आहे! जरा कुठे थोडेसे रिटर्न दिसायला लागले होते आणि आता हे मार्केट असं झालं, मग काय करायचं आम्ही? ज्यांनी आत्ता मागच्या महिन्यातच म्युचुअल फंडात गुंतवणूक करायला सुरुवात केली त्यांची स्थिती अशी आहे की अरे बापरे, आम्ही सुरुवात केल्या केल्या हे कुठलं संकट!
तुम्हा सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांच्या मनात शेअर बाजाराची स्थिती बघून जो भीतीचा गोळा तयार झालाय तो अजिबातच गैर नाही. 40,000 कडे झेपावलेला सेन्सेक्स तीस हजाराच्या खाली कधी आला हे समजलंच नाही. मग आपण काय करायचं?, हा प्रश्न येणे स्वाभाविकच.
अशावेळी ससा कासवाची शर्यत आठवा. ससा आतताईपणा करून धावायला लागला आणि कासव मात्र आपल्या चालींनी हळूहळू जातच होतं. तसंच काहीसं तुम्हाला करायचा आहे. म्युचुअल फंडात गुंतवणूक करायची हे एकदा ठरलं की तीन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला योग्य म्युचुअल फंड निवडायला मदत करतील.
प्रश्न पहिला
तुमची गुंतवणूक दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी असेल? 2 ते 5 वर्षासाठी असेल? 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी असेल? याचे उत्तर दोन पेक्षा कमी असेल तर तुम्ही बॅलन्स आणि डेट फंडात गुंतवणूक करू शकता. जर तुमचे उत्तर तीन ते पाच असेल तर तुम्ही बॅलन्स आणि इक्विटी फंडात गुंतवणूक करू शकता. आणि जर तुमचे उत्तर पाच वर्षापेक्षा जास्त असेल तर शुद्ध इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासारखा सध्या उत्तम पर्याय नाही.
प्रश्न दुसरा
तुम्हाला पैसे इमर्जन्सीसाठी लागणार आहेत का? याचे उत्तर 'हो' असेल तर लिक्वीड फंडात पैसे गुंतवा. उत्तर 'नाही' असेल तर अन्य फंडांचा विचार करू शकता .
तिसरा प्रश्न
तुम्ही जे पैसे गुंतवता त्यातून तुम्हाला Tax Saving करायचं आहे का? जर उत्तर हो असेल तर ELSS फंडात गुंतवणूक करा.
मार्केट खाली आहे ते नक्कीच वर येणार! जो सेन्सेक्स 40 हजारापर्यंत गेला होता तो आता तीस हजाराच्या खाली उतरलेला असला तरी तो एके दिवशी 40000 नक्की जाणार. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी अजिबात घाबरून जायची गरज नाही. फंड मॅनेजर आणि त्याची तज्ज्ञ टीम सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून असते. त्यामुळे योग्य फंड निवडा आणि गुंतवणूक सुरूच ठेवा.