जमीर काझी
मुंबई : आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तेच्या तपशिलासह सहा मुद्द्यांवर सविस्तर तपशील मागितला आहे. त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रांनिशी पुढील चौकशीवेळी हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.
देशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर नसले तरी त्यासाठी कायदेशीर बाबींचा आधार घेत आहेत. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. देशमुख यांनी मंगळवारी ईडीच्या दुसऱ्या समन्सवरही स्वतः कार्यालयात हजर न राहता वकिलामार्फत आपले म्हणणे मांडले. मंगळवारी त्यांचे वकील ॲड. इंद्रपाल सिंग हे ईडीच्या कार्यालयात हजर राहून ज्यासंबंधी चौकशी केली जाईल, त्यासंबंधित माहिती विचारली, त्यावर त्यांना देशमुख यांच्यासह नातेवाइकांच्या नावे असलेली जंगम व स्थावर मालमत्ता, पाच वर्षांचा आयकर परताव्याचा तपशील, नागपुरातील श्री साई शिक्षण संस्थेचा सविस्तर तपशील, पाच वर्षांत जमा झालेली देणगी व एकूण निधी, खासगी सचिव संजीव पालांडे, स्वीय सहायक कुंदन शिंदे, यांच्याशी झालेल्या व्यवहाराचा तपशील, दोघांशी झालेल्या संभाषणाबाबतचे तपशील, त्याच्या नोंदीची सविस्तर माहिती मागण्यात आली आहे. या प्रश्नांच्या अनुषंगाने देशमुख यांच्याकडे चौकशी केली जाईल. देशमुख यांच्या वकिलांनी त्यासाठी अवधी मागितला असला तरी त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, त्यांना लवकरच तिसरे समन्स बजावून चौकशीला हजर राहण्याच्या सूचना केल्या जाणार असल्याचे समजते.