एकदा म्युच्युअल फंडाचा फंडा डोक्यात फिक्स झाला की मग अजिबात मागे वळून पाहायला नको. तुमच्या प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. दोन तरुण मुलं एकाच ऑफिसमध्ये काम करतात, पण एकाला त्याच्या बहिणीचे लग्न दोन-तीन वर्षांनी होणार आहे त्यासाठी पैसे हवेत, तर दुसऱ्याला एक झकास टू व्हीलर घ्यायची आहे! एखाद्या काकांना रिटायरमेंट झाल्यावर मस्त गावाला घर बांधायचंय! एका श्री आणि सौ ना निवांत युरोप टूर वर जायचंय ! या सर्वांसाठी म्युच्युअल फंड योजना लाभदायक ठरू शकतात.
म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करता येते किंवा ठरावीक महिन्याच्या अंतराने गुंतवणूक करता येते.
तुम्हाला अशी शंका आहे का की म्युच्युअल फंड फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे? तर अजिबात नाही! हा तुमचा गैरसमज आहे.
प्रत्येक महिन्याला कमीतकमी अगदी रुपये पाचशे एवढ्या छोट्याशा रकमेपासून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. जर एकरकमी पैसे गुंतवायचे असतील तर काही फंडांमध्ये एक हजार तर काही फंडांमध्ये पाच हजार रुपये सुरुवातीला गुंतवावे लागतात. तुम्ही फंडात पैसे गुंतविले की तुमच्या नावाचा एक फोलिओ तयार होतो.
हा फोलिओ म्हणजे थोडक्यात म्युच्युअल फंड कंपनीकडे असलेलं तुमचं खातं असं समजूया. आता एखाद्याने फंडात सुरुवातीला पाच हजार रुपये गुंतवले, काही महिन्यांनी त्याला पुन्हा पैसे गुंतवायचे पण पाच हजार रुपये त्याच्याकडे नाहीयेत. काही हरकत नाही ! एकदा फोलिओ उघडला की त्यानंतर कमीत कमी एक हजार रुपये पुन्हा गुंतवायची सोय आहे. काही फंडांमध्ये तर तुम्ही एका वेळी अगदी पाचशे रुपये सुद्धा गुंतवू शकता ! म्हणजे थोडक्यात काय पैसे गुंतवायचे असतील तर भरपूर इच्छा हवी पैसे थोडेसे कमी असले तरी चालतात !
तुम्हाला टॅक्स वाचवायची इच्छा आहे का?
अर्थातच टॅक्स वाचवायची इच्छा कुणाला नसते म्हणा ! मग तुम्ही तुम्हाला किती रुपये टॅक्स सेव्हिंग मध्ये हे गुंतवावे लागतात याची माहिती करून घ्या. प्रत्येकाला आपापल्या इनकमच्या अनुसार कमी जास्त टॅक्स पडतो. अशावेळी एकदा किती रुपये गुंतवायचे हे कळलं की टॅक्स बचत करून देणाऱ्या म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही तेवढी रक्कम वर्षभरात गुंतवा. समजा एखाद्याला एका वर्षात पन्नास हजार रुपये कर वाचवण्यासाठी गुंतवावे लागणार असतील तर त्या व्यक्तीने ते पैसे त्याच्या सोयीनुसार व बाजारातील परिस्थितीनुसार गुंतवावेत.
दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवायची तुमची इच्छा आहे का? अशा सिस्टिमॅटिक लोकांसाठी एक प्लान आहे याला म्हणतात एस आय पी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.