आॅनलाईन लोकमतअहेरी : नक्षल्यांना ७५ लाख रु पये नेऊन देण्याच्या तयारीत असताना सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी आलापल्ली येथून तीन तेंदू कंत्राटदारांना अटक केली होती. आज त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून आणखी १ कोटी १ लाख जप्त करण्यात आले आहेत. प्राणहिता पोलीस उपमुख्यालय अहेरी येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मेच्या मध्यरात्री अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील विशेष अभियान पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांनी आलापल्ली येथून पहाडिया तुळशीराम तांपला(३५), रवी मलय्या तनकम(४५), नागराज समय्या पुट्टा(३७) या तीन तेंदू कंत्राटदारांना ताब्यात घेतले.यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनातून नक्षल पत्रक व ७५ लाख रु पये रोख पोलिसांनी जप्त केले होते. न्यायालयाने तिघांची पोलिस कोठडीत रवानगी केल्यानंतर अधिक चौकशीदरम्यान तिघांकडून आणखी १ कोटी १ लाख जप्त करण्यात आले. ही रक्कम बोटलाचेरु येथे लपवून ठेवण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत या तिघांकडून १ कोटी ७६ लाख रु पये जप्त करण्यात आले आहेत. आरोपींची अधिक चौकशी सुरु आहे.