नरेश डोंगरे , लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सवलतीचे स्वागतदार उघडल्यामुळे गृहलक्ष्मी लालपरीवर चांगलीच प्रसन्न झाली आहे. लक्ष्मीची पावलं वळल्यामुळे खडखडाट असलेल्या एसटीच्या तिजोरीला चांगलीच भरभराट आली आहे. गेल्या वर्षीपर्यंत एसटी महामंडळाच्या बसेस रिकाम्या ठणठण धावताना दिसायच्या. मात्र एसटी महामंडळाने १७ मार्च २०२४ ला महिलांना सरसकट प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर केली. तेव्हापासून गावोगावच्या महिला एसटीकडे धाव घेऊ लागल्या अन् रिकाम्या एस टी बसेस महिलांनी फुलून गेल्या. गर्दी अशी की l, अवघ्या सात महिन्यात तब्बल एक कोटी, १२ लाख, ५० हजार ६६८ महिलांनी नागपूर विभागातून प्रवास केला.
जानेवारी ते जुलै २०२४ या सात महिन्यातील प्रवासी महिलांची आकडेवारी काढल्यास सर्वाधिक प्रवासी महिलांनी मे महिन्यात प्रवास केल्याचे दिसून येतील.
विशेष म्हणजे, महिलांना तिकीट भाड्यात सूट जाहीर होण्यापूर्वी एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या अर्ध्यापेक्षाही कमी होती. मार्च २०२३ मध्ये ही सवलत लागू झाली. त्यापूर्वीच्या तीन महिन्यात दर महिन्याला साधारणतः तीन ते चार लाख महिला एसटीतून प्रवास करायच्या. मात्र ५० टक्के प्रवास सवलत लागू होताच मार्च २०२३ मध्ये पाच लाख ३७ हजार महिलांनी प्रवास केला. एप्रिलमध्ये ही संख्या दुप्पटहुन अधिक झाली. अर्थात एप्रिल २०२३ मध्ये १३ लाख ८३ हजार महिलांनी प्रवास केला. मे मध्ये १८ लाख, १६ हजार, जून मध्ये १५ लाख, १० हजार, जुलैमध्ये १३ लाख, ३६ हजार महिलांनी एसटीतून प्रवास केला. अर्थात मार्च ते जुलै २०२३ या पाच महिन्यात ६५ लाख, ८३ हजार महिलांनी एसटीतून प्रवास केला होता. तर आता २०२४ मध्ये जानेवारी ते जुलै या सात महिन्यात १ कोटी, १२ लाख, ५० हजार, ६६८ महिलांनी एसटीतून प्रवास केला. घसघशीत गंगाजळी महिलांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे एसटीच्या तिजोरीत घसघशीत गंगाजळी पडली आहे. गेल्या वर्षी मार्च ते जुलै २०२३ मध्ये एसटीचे उत्पन्न ३४ कोटी, ६२ लाख, १६ हजार, ४७४ रुपये होते. यावर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत ६० कोटी, ५ लाख, ९५ हजार, १६ रुपये एवढे आहे. अर्थात यावर्षी एसटी च्या तिजोरीत सुमारे २५ कोटींची जास्त गंगाजळी पडली आहे.