करंडे दाम्पत्याकडून फसवणूक : ४३ बेरोजगारांना गंडा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रोजगार लावून देण्याच्या नावाखाली बेरोजगारांकडून लाखो रुपये घेतल्यानंतर प्रकरण अंगलट येण्याचे संकेत मिळताच उलट्या बोंबा ठोकणाऱ्या प्रशांत रामकृष्ण करंडे (वय ४०), त्याची पत्नी रागिणी (वय ३४), दोघेही रा. अजनी रथ अपार्टमेंट, मनीषनगर), त्यांचा कार्यालयीन व्यवस्थापक यूसुफ खान आणि प्रियंका विद्या अशा चौघांविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. करंडे दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. बजाजनगरात करंडे दाम्पत्याने जी -९ प्रा. लि. नामक जॉब प्लेसमेंट कंपनी सुरू केली. देश-विदेशातील अनेक मोठ्या कंपन्या आणि उद्योग समूहासोबत आपला संपर्क असून, त्या माध्यमातून नोकरी लावून देण्याचा दावा करंडे दाम्पत्य आणि त्यांच्या सोबतचे कर्मचारी करीत होते. विदेशात लठ्ठ पगाराची नोकरी मिळणार असे आमिष दाखवले जात असल्यामुळे करंडे दाम्पत्यावर बेरोजगार तरुण विश्वास ठेवायचे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपली शैक्षणिक कागदपत्रे तसेच मोठी रक्कमही त्यांच्या हवाली करायचे. जुनी बुटीबोरी येथील रहिवासी आसिफ अब्बास शेख (वय २२) आणि अन्य ४२ तरुण-तरुणींना अशाच प्रकारे सिंगापूरला दोन वर्षांच्या करारावर नोकरी मिळणार असल्याचे करंडे दाम्पत्याने आमिष दाखवले. त्यासाठी वर्क परमिट व्हीजा, पासपोर्ट आणि अन्य खर्चाच्या नावाखाली प्रत्येकी ३ लाख रुपये या सर्वांकडून घेतले. मुंबईतील क्राफ्ट ओव्हरसीज कंपनीचे शाहीद शेख आणि राजेंद्र नागप (वय ४५, रा. वेस्ट स्टॉप वसाहत, अमृतनगर, घाटकोपर, पश्चिम मुंबई) यांच्या माध्यमातून ही नोकरी मिळणार असल्याचेही करंडे दाम्पत्यांनी पीडित बेरोजगारांना सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून ४३ बेरोजगारांनी उधार रक्कम घेऊन प्रत्येकी तीन लाख रुपये करंडेच्या हातात ठेवले. आता आपण सिंगापुरात महिन्याला लाखो रुपये पगार असलेली नोकरी मिळवू, असे स्वप्न ते रंगवू लागले. आरोपी शाहीद शेख आणि राजेंद्र नागप यांचा ई-मेल आला असून, तुम्हाला (तीन लाख रुपये देणाऱ्या सर्व उमेदवारांना) १५ जूनला चेन्नईत मेडिकलला जायचे आहे. तेथे मेडिकलची औपचारिकता पार पाडल्यानंतर कंपनीचा प्रतिनिधी तेथून तुम्हाला सिंगापुरात घेऊन जाणार असल्याचे करंडेने सांगितले. तसे मेलही संंबंधित उमेदवारांना केले. त्यानुसार, संबंधित बेरोजगार १५ जूनला चेन्नईत पोहचले. सोबत करंडेच्या कार्यालयाचा व्यवस्थापक यूसुफ खानही होता. तेथे १५ जूनला दिवसभर वाट पाहूनही आरोपींच्या कथित कंपनीचा प्रतिनिधी पोहचलाच नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उमेदवारांनी, व्यवस्थापकाने करंडेशी संपर्क साधला. करंडेने शाहीद शेख आणि राजेंद्र नागप यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र, संपर्कच झाला नाही. त्यामुळे करंडेने या सर्वांना नागपुरात परत बोलवून घेतले. यामुळे संतापलेले बेरोजगार दुसऱ्या दिवशी करंडेच्या कार्यालयात धडकले. त्यांनी फसवणुकीचा आरोप करून आपली रक्कम परत मागितली. करंडेने त्यांच्यासमोर पुन्हा मुंबईतील दलालांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. इकडे संतप्त बेरोजगार पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची भाषा वापरत असल्यामुळे करंडे हादरला. त्याने आपले मानगूट सोडवून घेण्यासाठी स्वत:च बजाजनगर पोलीस ठाणे गाठले. सिंगापुरात नोकरी देण्याच्या नावाखाली २ एप्रिल ते १६ जून दरम्यान आरोपी शाहीद शेख आणि राजेंद्र नागप या दोघांनी लाखो रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली. बजाजनगर पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी शाहीद शेख आणि राजेंद्र नागप या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्वत: हडपले ७० हजार बेरोजगारांचा रोष बघता ठाणेदार सुधीर नंदनवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणात पैशाच्या व्यवहाराची चौकशी केली. उमेदवारांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेणाऱ्या करंडेने आरोपी शाहीद शेख आणि राजेंद्र नागप यांच्या मुंबईतील एचडीएफसी बँकेच्या खात्यात तीन लाखांऐवजी प्रत्येकी २ लाख, ३० हजार रुपयेच जमा केल्याचे उघड झाले. आरोपी करंडे प्रत्येक उमेदवारांकडून रक्कम उकळताना दलालांकडूनही ७० हजार रुपये कमिशन घेत असल्याचेही स्पष्ट झाले. अर्थात फसगत झालेल्या उमेदवारांची ३२ लाख, ९० हजारांची रक्कम करंडेने हडपल्याचेही उघड झाले. दुसरे म्हणजे, वर्क परमिट व्हीजा बनावट असल्याचे ध्यानात आल्यानंतरही त्याने त्याकडे दुर्लक्ष करून उमेदवारांना फसवण्यात आरोपींनी मदत केल्याचे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात आसिफ अब्बास शेख (रा. वार्ड नं. २ बुटीबोरी) याच्या तक्रारीवरून प्रशांत करंडे, त्याची पत्नी रागिणी, व्यवस्थापक यूसुफ शेख आणि कर्मचारी प्रियंका वैद्य या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रशांत आणि त्याच्या पत्नीला अटक करून कोर्टातून त्यांचा मंगळवारी २६ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला. त्यांची बँक खाती गोठविण्याचेही पत्र पोलिसांनी संबंधित बँकांना दिले. रात्री या प्रकरणात यूसुफलाही पोलिसांनी अटक केली.
१ कोटी ४० लाख हडपले
By admin | Published: June 21, 2017 2:09 AM