लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात येत्या शनिवारपासून कोरोना लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी १ लाख १४ हजार लसींचे डोस बुधवारी रात्री उशिरा रेफ्रिजरेटर कंटेनरमधून अकोला येथून नागपुरात पोहोचले. गुरुवारी नागपूरसह सहा जिल्ह्यांना लस वितरण केली जाणार आहे. यासाठी सहायक आरोग्य अधिकाऱ्यांसह पाच जणांचे पथक गठित करण्यात आले आहे.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर शनिवारी लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात नागपूर शहर व ग्रामीणमधील २३, चंदपूर ११, वर्धा ११, गोंदीया ६, भंडारा ५ आणि गडचिरोली जिल्ह्यातील ७ केंद्रांचा यात समावेश आहे.
....
नागपूर शहर व जिल्ह्यात ३६१४५ कर्मचाऱ्यांची नोंदणी
नागपूर शहरात टप्प्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, रुग्णालयांचे इतर कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर अशा एकूण २४५०० आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार आहे. यामध्ये मनपासह ७९ शासकीय रुग्णालयांतील १२ हजार व ३५० खासगी रुग्णालयांतील १२५०० आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर ग्रामीणमध्ये ११ हजार ६४५ कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. शहरात आठ ठिकाणी तर ग्रामीणमध्ये १५ ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र शनिवारी पहिल्या दिवशी नागपूर शहरातील पाच केंद्रांवर लसीकरण करण्यात येईल. त्यानंतर ही संख्या वाढविली जाणार आहे.
....
लसीकरणासाठी जिल्हानिहाय केंद्रांची संख्या
नागपूर—२३
वर्धा—११
चंद्रपूर—११
भंडारा—५
गडचिरोली—७
गोंदिया—६
....
एका केंद्रावर १०० जणांना लसीकरण
एका ठिकाणी किमान १०० जणांना लसीकरण करण्यात येईल. लसीकरणासाठीच्या पथकामध्ये ५ सदस्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
....
असे आहेत लसीकरण केंद्र
नागपूर शहर : सदर रोगनिदान केंद्र, महाल रोगनिदान केंद्र, पाचपावली सूतिकागृह, के.टी. नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), एम्स, डागा हॉस्पिटल या आठ केंद्रांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी मात्र पाच केंद्रांवरून लस दिली जाईल. यात महाल रोग निदान केंद्र, मेडिकल, मेयो, एम्स, व डागा रुग्णालयांचा समावेश राहील.
नागपूर ग्रामीण : कळमेश्वर, मौदा, भिवापूर, उमरेड, काटोल, नरखेड, पारशिवनी, हिंगणा, कुही, रामटेक व कामठीतील उपजिल्हा रुग्णालय, सावनेर येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण संस्था, नागपूर तालुक्यातील बोरखेडी तसेच कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र.
.....
पहिल्या टप्प्यातील आरोग्य सेवक
नागपूर शहर -२४ हजार ५००
नागपूर ग्रामीण -११ हजार ६४५
...
कोल्ड चेन पॉइंट्स सेंटर (लस साठवणूक केंद्र)
शहर -४८
ग्रामीण -६८
.........
लसीची प्रतीक्षा व उत्सुकता
कोरोना लस नागपुरात कधी पोहोचणार याची बुधवारी दिवसभर उत्सुकता होती. महापालिका अधिकारी, जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे याची विचारणा केली जात होती. सायंकाळपर्यंत यासंदर्भात माहिती प्राप्त नव्हती. रात्री अकोला येथून कंटेनरमधून नागपुरात कोरोना लसीचे डोस पोहोचत असून रात्री उशिरा दोनच्या सुमारात नागपुरात येतील. अशी माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.