मुद्रांक शुल्क कापणार खिसा : ५ कोटींची अतिरिक्त वसुलीनागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्णत्वात नागपूरकरांचा हातभार लागणार आहे. ३० जूनपासून विक्रीपत्र आणि बक्षीसपत्राच्या मुद्रांक शुल्कावर १ टक्के अधिभार आकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भात शासनाने अधिसूचना काढली आहे. त्यानुसार नागपूरकरांकडून वर्षभरात जवळपास ५ कोटी रुपयांचे अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार आहे. राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे कार्यालयाने २८ सप्टेंबरला नागपूर विभागाचे नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनिबंधकाला पत्र पाठवून १ आॅक्टोबरपासून अधिभार शुल्क आकारण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नागपूर शहरात होणारे जमिनीचे विक्रीपत्र आणि बक्षीसपत्राच्या मुद्रांक शुल्कावर मेट्रो रेल्वेच्या विकासासाठी १ टक्के अतिरिक्त अधिभार आकारण्यात येणार आहे. तसे पाहता राज्य सरकारने हा अध्यादेश ३० जूनला काढला आहे. त्या दिवशीपासून अंमलबजावणी न झाल्याने १ टक्के वसुली करण्यात आली नाही. पण आता ३० जूननंतर विक्रीपत्र आणि बक्षीसपत्र केलेल्यांना नोटिसा पाठवून मुद्रांत शुल्काच्या रकमेवर १ टक्के अधिभार भरण्यास सांगण्यात येत आहे. अनावश्यक अधिभार नकोनागपूर : अधिभारानुसार विभागात ग्राहक अतिरिक्त शुल्काचा भरणा करीत आहेत. शासनाने मेट्रो रेल्वेला महत्त्वाचा शहरी वाहतूक प्रकल्प घोषित केला आहे. यानुसार नागपूर क्षेत्रांतर्गत स्थावर मालमत्तेची अनुक्रमे विक्री, दान व फलोपयोग गहाण संबंधीच्या संलेखावर बाजारमूल्यात मोबदला किंवा कर्ज रक्कम जी जास्त असेल, त्या किमतीवर १ टक्के कराची रक्कम मिळण्याबाबत शासनाने कळविले आहे. त्यामुळे उदाहरणार्थ एका लाखाच्या मुद्रांकावर शासनातर्फे ७.५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी ६.५ टक्के तर ३० जूनपासून ७.५ टक्के मुद्रांक शुल्क लागणार आहे. त्यात ५ टक्के मुद्रांक शुल्क, १ टक्के एलबीटी, १ टक्के मेट्रो रेल्वे, अर्धा टक्के नासुप्रचे शुल्क आदींचा समावेश आहे.(प्रतिनिधी)
मेट्रो रेल्वेसाठी नागपूरकरांवर १ टक्का अधिभार
By admin | Published: September 30, 2016 3:13 AM