लाेकमत न्यूज नेटवर्क
बेसूर : शाॅर्ट सर्किटमुळे ठिणगी पडली आणि जमिनीवरील कचऱ्यासाेबतच शेतातील उसाने पेट घेतला. ही आग वेळीच आटाेक्यात न आल्याने १० एकरातील उसाची राख झाली. यात शेतकऱ्याचे किमान १७ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बेसूर (ता. भिवापूर) शिवारात मंगळवारी (दि. ९) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
अशाेक उमेश पवार, रा. बेसूर यांची बेसूर-हिवरा राेडलगत शेती आहे. त्यांनी १० एकरात उसाची लागवड केली हाेती. हा ऊस सध्या कापणीला आला हाेता. अशाेक पवार यांच्या शेताच्या शेजारी सचिन उताने, रा. बेसूर यांच्या काकाचे शेत आहे. ते मंगळवारी सकाळी शेतात गेला असता, त्यांना उसाने पेट घेतला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लगेच अशाेक पवार यांना माहिती दिली.
आग नियंत्रणात येत नसल्याने उमरेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल हाेईपर्यंत बहुतांश उसाची राख झाली हाेती, शिवाय शेतातील सिंचनाची साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थळी पडले. ही आग इतर शेतात पसरू नये, म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी उपाययाेजना केल्या. या आगीत किमान १७ लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती अशाेक पवार यांनी दिली. प्रशासनाने या आगीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
...
विजेच्या तारा आणि साैरऊर्जा
अशाेक पवार यांच्या शेतातून विजेच्या थ्री फेज तारा गेल्या असून, त्या लाेंबकळलेल्या आहेत, शिवाय या भागात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने त्यांच्यापासून पिकांचे नुकसान हाेऊ नये, म्हणून अशाेक पवार यांनी शेताला साैरऊर्जेचे कुंपणही लावले आहे. साैरऊर्जेच्या कुंपणामुळे ही आग लागली नसून, हवेमुळे विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि ठिणगी पडली असावी, अशी शक्यता जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.