कामठी : कामठी तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. आरोग्य यंत्रणा फेल पडल्याने रुग्ण उपचारासाठी भटकंती करीत आहे. त्यामुळे गावातील कोरोना साखळी खंडित करण्यासाठी कढोली ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. लोकवर्गणीतून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये १० बेडचे विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. विलगीकरणात असलेल्या रुग्णांना नाश्ता, जेवण, औषधे मोफत दिली जात आहे. यासोबतच त्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जात आहे. या केंद्रात रुग्णांची काळजी घेण्यासाठी कापसी येथील डॉ. चिंधलोरे, गावातील दोन नर्स अलका निकाळजे आणि सारिका सहारे यांच्यासह नर्सिंग स्टाफची चमू नियुक्त करण्यात आली आहे. रुग्णांना गरज भासल्यास ऑक्सिजन सिलिंडरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात आरोग्य समिती स्थापन करण्यात आली आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच प्रांजल वाघ यांनी केले. या सर्व कार्यात ग्रामपंचायत सचिव ब्रह्मानंद खडसे यांच्यासह मनोहर रावजी ठाकरे,अशोक घुले, रवी रंगारी, अरुण शहाणे, शंकर घुले, विनोद वासनिक, बबलू पाटील, दिनेश ढोले, टेकराम महल्ले, सारिका सहारे, मीनाक्षी वाघ, शेखर शहाणे, गजानन हिवसे, माणिक गावंडे, सोपान गावंडे ,गणेश गावंडे सहकार्य करीत आहे.