नागपूर : मिहानमध्ये ‘गोल्फकोर्स’साठी आरक्षित असलेल्या १५० एकरच्या जमिनीवर आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) डोलारा उभा राहणार आहे. ‘एम्स’च्या निर्माणकार्यासाठी ही जागा ‘हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सलटन्सी कॉर्पाेरेशन लिमिटेड’ला, (एचएससीसी) हस्तांतरण करण्याच्या तयारीला वेग आला आहे. त्यापूर्वी जागेवर पाणी, वीज व रस्ता उपलब्ध करून द्यायचा आहे. यासाठी खर्चाचा अहवाल तयार केला जात असून साधारण तो १० कोटींवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती एम्सचे नवनियुक्त नोडल अधिकारी डॉ. रवी चव्हाण यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) नेत्ररोग विभागात डॉ. रवी चव्हाण हे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत ही जबाबदारी मेयोचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांच्याकडे होती. मात्र सहा महिन्यांपूर्वी डॉ. वाकोडे यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सहायक संचालकाची जबाबदारी देण्यात आल्याने ‘एम्स’च्या नोडल अधिकारीचा भार नुकताच डॉ. चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, मिहानमधील ‘सेझ’बाहेर सरकारी संस्थांना जमीन देण्यासाठी निविदेची गरज नाही, असा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याआधारे ‘एम्स’साठी १५० एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. एचएससीसीकडे जागा हस्तांतरण करण्यापूर्वी पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्याचे केंद्र सचिवांचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रस्तावित जागेवर पाणी, रस्ता व वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित खर्चाचा अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. साधारण १० कोटींवर हा खर्च जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
‘एम्स’च्या पायाभूत सोईंवर १० कोटींचा खर्च!
By admin | Published: October 02, 2015 7:24 AM