नागपूर : डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या स्टॉक मर्यादेच्या अध्यादेशाविरुद्ध कळमना धान्य बाजारातील अडतिया आणि व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन पुकारले असून चार दिवस जवळपास १० कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे.
गुरुवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अडतिया आणि व्यापाऱ्यांनी कळमना धान्य बाजारात नारे-निदर्शने केली. धान्य बाजाराचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, केंद्र सरकारने डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा लावली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. साठवणूक मर्यादेविरुद्ध कळमना धान्य बाजार सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय धान्यगंज अडतिया मंडळाने घेतला आहे. जवळपास ३०० पेक्षा जास्त अडतिया आणि व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी खरेदी-विक्री बंद केली आहे. अडतिये आणि व्यापारी मंडळाच्या कार्यालयासमोर प्रदर्शन करीत आहेत.
केंद्र सरकारने डाळींवर स्टॉक लिमिट लावली, पण काही राज्यांनी अंमलबजावणी केली नाही. त्याप्रमाणे राज्य शासनाने लागू करू नये. या संदर्भात शासनासोबत बोलणी सुरू आहे. स्टॉक लिमिट हटविण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. सेनाड म्हणाले, केंद्र सरकारच्या अध्यादेशात घाऊक व्यापाऱ्यांना २० क्विंटल अर्थात २ हजार क्विंटल स्टॉकची मर्यादा आहे. परंतु व्यापारी कोणत्याही एका प्रकारच्या डाळीचा साठा एक हजार क्विंटलपेक्षा जास्त ठेवू शकत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणे बंद केले आहे. त्याचप्रमाणे चिल्लर व्यापाऱ्यांना ५ टन अर्थात ५०० क्विंटलपेक्षा जास्त डाळींचा साठा ठेवता येणार नाही. याशिवाय दाल मिलर्सला गेल्या तीन महिन्यांचे उत्पादन वा वार्षिक क्षमतेच्या २५ टक्के म्हणजेच यापैकी जे जास्त असेल ती डाळींची मर्यादा राहणार आहे. सरकारने धान्याच्या साठवणुकीवर कोणताही मर्यादा लावलेली नाही.
आंदोलनात मंडळाचे पदाधिकारी गोपाळ कळमकर, कमलाकर घाटोळे, रामेश्वर हिरुळकर, नरेश जिभकाटे, राजेश सातपुते, सारंग वानखेडे, नीळकंठ हटवार, राजू उमाठे, रहमान शेख, स्वप्निल वैरागडे, भूषण क्षीरसागर, पंढरीनाथ मुंडले, चिंटू पुरोहित, रामदास गजापुरे, रमेश नाकाडे, उदय आकरे, विनोद कातुरे, भीमराव मुटे, मनोज भालोटिया, मनोहर हजारे, सुरेश बारई, इस्लाईल शेख, ज्ञानेश्वर गजभिये, गंगाधर बोरकर, दिनेश चांडक, शंकर शेंडे, सुनील गवते, राजू ठवकर, महेंद्र अग्रवाल, शेखर अग्रवाल यांच्यासह अनेक अडतिया व व्यापारी उपस्थित होते.