लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस कर्मचा-याच्या १२ वर्षीय मुलाचे अपहरण करून १० लाखांची खंडणी मागणारा आरोपी सुलतान मोहसिन खान (वय २८, रा. १६२, बोरगाव, वेलकम सोसायटी) याच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांंनी सोमवारी सायंकाळी यश मिळवले.
गिट्टीखदानमधील पोलीस वसाहतीत राहणारे आणि वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कमलेश जावडीकर यांचा १२ वर्षीय मुलगा सार्थक शुक्रवारी दुपारी वसाहतीत खेळत होता. ३ ते ४ अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याला जवळ बोलाविले. त्याला मारुती व्हॅनमध्ये कोंबून पळवून नेले. काही वेळेनंतर कमलेश जावडीकर यांना फोन आला. फोन करणाराने सार्थकच्या बदल्यात १० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही तर सार्थकला मारण्याची धमकीही दिली. या घटनेची माहिती पोलीस दलात होताच एकच खळबळ उडाली. त्याची शोधाशोध सुरू असतानाच सुदैवाने सार्थक सुखरूप घरी परतला. त्यामुळे पोलीस यंत्रणेने सुटकेचा श्वास टाकला अन् अपहरणकर्त्यांच्या फोनचा धागा पकडून त्याचा शोध सुरू केला. सोमवारी दुपारी तो गणेशपेठ परिसरात असल्याचे लक्षात येताच गिट्टीखदानचे ठाणेदार सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक साजिद, ईशान फाटे, मंजितसिंग यांनी धावपळ सुरू केली. अखेर त्याच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना सायंकाळी ५ च्या सुमारास यश आले. त्याने आपले नाव सुलतान खान सांगितले.
उत्तरप्रदेशात पळून जाणार होता
आरोपी सुलतान कानपूरला (यूपी) पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने तिकीटही काढले होते आणि गणेशपेठ स्थानकाकडून रेल्वेस्थानक गाठण्याच्या तो तयारीत होता. पैशासाठी तो त्याच्या मित्रांना फोन करत होता. हाच धागा पकडून पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या.