नागपूर : बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी मुलांचा इंग्रजी या कठीण वाटणाऱ्या विषयाशी सामना झाला. पेपर साेपा हाेता; पण खूपच वर्णनात्मक हाेता. लिहून-लिहून हात दुखले, दमायला झाले, अशी प्रतिक्रिया मुलांनी हाॅलमधून बाहेर पडताना दिली.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना हा विषय फारसा कठीण वाटत नाही; पण कला आणि वाणिज्य शाखांतील विद्यार्थ्यांसाठी टेन्शन देणारा असताे. मात्र बुधवारचा पेपर शाखानिहाय फरकापेक्षा लेखनाच्या गतीवर अवलंबून ठरला. यंदा पेपर संपल्यानंतर अतिरिक्त १० मिनिटे विद्यार्थ्यांना देण्यात आली हाेती. मात्र हा वेळही कमी पडल्याचे काहींनी सांगितले.
खूपच वर्णनात्मक, लिहून हात दुखले
निबंध असलेल्या पहिल्याच प्रश्नाचे उत्तर साेडविताना खूप वेळ लागल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. शेवटचा ‘नाॅव्हेल’वरील प्रश्नही दमायला लावणारा हाेता. उत्तर साेपे हाेते; पण लिहावे खूप लागल्याचे मुलांनी सांगितले. हात दुखले; पण पेपर पूर्ण झाला नाही, असेही काहींनी सांगितले.
वेळेचे नियाेजन गडबडले
काही प्रश्न साेडवायला खूप वेळ लागल्याने पूर्ण पेपर साेडविता आला नाही, असे काहींचे म्हणणे हाेते, तर काही विद्यार्थ्यांनी शेवटच्या अर्ध्या तासात घाईघाईत पेपर पूर्ण केल्याचे सांगितले. लिहिण्याची गती चांगली असलेल्यांनी मात्र पेपर खूप चांगला गेल्याचे सांगितले.
कॉपीसाठी कंपाउंडवर चढून खिडकीवर उडी
बीड : धारूर तालुक्यातील तेलगाव येथील सरस्वती विद्यालयातील परीक्षा केंद्रावर पहिल्याच पेपरला सर्रास कॉपींचा सुळसुळाट असल्याचे दिसले. शाळेच्या मागील बाजूने काही तरुण संरक्षण भिंतीवरून खिडक्यांवर जात होते.
तेथून आतील विद्यार्थ्यांना कॉपी देत असल्याचे कथित व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकाराने शाळेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून, येथील केंद्रप्रमुखांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
मोबाइलचा वापर?
बीड शहरातील चंपावती विद्यालयाच्या केंद्रावरही बाहेरून कॉपी पुरविल्या जात होत्या. तसेच एका परीक्षार्थीने आतमध्ये मोबाइल घेऊन प्रवेश केला. त्यानंतर काही वेळाने त्याने आतून बाहेर मोबाइल दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी ड्रोनचा वापर!
नांदेड : बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून संवेदनशील केंद्रांवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी या केंद्रांना भेट देत कॉपीमुक्त अभियानाची खातरजमा केली.