लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उंबरठा ओलांडला की जग पायाखाली घालता येथे म्हणतात, ते काही खोटे नाही. मनात प्रचंड इच्छाशक्ती घेऊन विदर्भातील १० बायकर्स रविवारी पावणेपाच हजार किलोमीटरच्या मोहिमेवर रवाना होत आहेत. यापूर्वीच्या भूतान आणि नेपाळच्या यशस्वी सफारीनंतर यंदा ही मंडळी कारगिल, श्रीनगरचा प्रवास जेजीलापास या धोकादायक मार्गावरून पूर्ण करणार आहे.
प्रशांत कावडे आणि सतीश मसराम यांच्यासह १० साहसी बायकर्सचा यात समावेश आहे. प्रशांत हे नागपूरचे असून, खासगी ट्युशन क्लासेस घेतात तर सतीश अमरावतीचे असून एलआयसी अभिकर्ता आहेत. सोबत १० युवकांचा ग्रुपही राहणार आहे. यंदाच्या चौथ्या रोमांचकारी मोहिमेबद्दल हे सारेच उत्सुक आहेत. मागील वर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे देशभर नाकाबंदी होती. त्यामुळे जाता आले नाही. ‘लोकमत’शी बोलताना प्रशांत कवाडे म्हणाले, २०१७ मध्ये ही कल्पना सुचली आणि अमलात आणली. १० जून २०१७ ला त्यांनी लेह-लडाख हा २१ दिवसांचा पहिला बाईक टूर केला. पहिलाच अनुभव थरारक होता. दाट धुक्यात हरवलेला मार्ग शोधत, तर कधी वितळलेल्या हिमनद्यांच्या छातीभर पाण्यातून बाईक काढताना ते गारठले. गाड्या बर्फात फसल्या. २०१८ मध्ये भूतानचा दुसरा टप्पा केला. गारठा, भूस्खलन, लहानसा अपघात, सहकाऱ्यांची बिघडलेली प्रकृती, ऑक्सिजनची कमतरता यावर मात करीत त्यांनी परतीचा मार्ग शोधला. तिसरा १७ दिवसांचा ४,२०० किलोमीटरचा टप्पा २७ नोव्हेंबर २०१९ पासून नेपाळ-गंगटोक असा केला. यंदा पुन्हा ही मंडळी सज्ज झाली आहेत.
‘नो वॉर, नो स्मोक’
‘नो वॉर, नो स्मोक’ असा संदेश ते यंदा प्रवासभर देणार आहेत. यासाठी त्यांनी बॅनर तयार करून घेतले आहेत. बायकर्सच्या बातम्या बघून आपणही असेच काहीतरी साहस करावे, अशी कल्पना यांच्याही मनात आली. भारत भ्रमण करणे, नवा प्रदेश पाहणे आणि संस्कृती जवळून समजून घेणे हा देखील हेतू असल्याचे प्रशांत कवाडे यांनी सांगितले.
...