नागपूर : काेराेनाचा प्रभाव आता ओसरला असल्याने गेल्या काही दिवसात रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढायला लागली आहे. अशात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारेही सक्रिय झाले आहेत. अशा दलालांना लगाम घालण्यासाठी मध्ये रेल्वे, नागपूर मंडळाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ६ ते ८ जुलैदरम्यान विशेष कारवाई अभियान चालविले. यामध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या १० दलालांना अटक करण्यात आली. ही कारवाई नागपूर पाेस्टसह मंडळाच्या सर्व पाेस्टमध्ये करण्यात आल्याचे आरपीएफ कमांडंट आशुताेष पांडेय यांनी सांगितले.
अटक केलेल्या दलालांकडे १२ आयडी असल्याचे समजले व त्यांच्याकडून ८७ तिकिटे जप्त करण्यात आली. यापैकी प्रवास न केलेल्या १० तिकिटांचा समावेश आहे. यासह ७७ जुन्या तिकिटा सापडल्या आहेत. या सर्व तिकिटांची किंमत १ लाख २५ हजार ३३९ रुपये आहे. या सर्व प्रकरणात ज्या संगणकाद्वारे अवैध पद्धतीने तिकीट बुक करण्यात आले, त्यांचे हार्डडिस्क आरपीएफने जप्त केले आहे. त्यांचीही तपासणी केली जात आहे. तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले. काेराेना काळात गेल्या सहा महिन्यामध्ये आरपीएफने विविध कारवाईमध्ये ३९ आराेपींना अटक केली आहे. यामध्ये गांजा तस्करीच्या प्रकरणाचाही समावेश आहे. याशिवाय ज्वलनशील पदार्थांची वाहतूक व इतर तस्करीच्या प्रकरणातही १ काेटी ७० लाखांचा माल पकडण्यात आल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले.
अनाथ मुलांसाठी स्पेशल सेल
आशुताेष पांडेय यांनी सांगितले, काेराेनामुळे देशात अनेक मुले अनाथ झाली आहेत. अशा निराश अवस्थेत घर साेडून त्यांची भटकंती करण्याची शक्यता आहे किंवा पाेट भरण्यासाठी गुन्हेगारीत प्रवेश करू शकतात. रेल्वेमध्ये एखादा मुलगा अशा अवस्थेत आढळल्यास त्याची विशेष काळजी घेण्याचे आदेश आरपीएफकडे मिळाले आहेत. यासाठी नागपूर मंडळात आरपीएफने विशेष सेल तयार केला आहे. यामध्ये दोन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना अशा मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत असे प्रकरण समाेर आले नाही. मात्र मागील सहा महिन्यात आरपीएफने रेल्वेगाड्या व स्टेशन परिसरात घरून पळून आलेल्या ३२ बेवारस मुलांना असामाजिक तत्त्वांच्या तावडीतून साेडविल्याचे पांडेय यांनी सांगितले. यातील काहींना त्यांच्या पालकांकडे तर काहींना चाईल्ड लाईनकडे साेपविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.