नागपूर : प्रवाशांची संख्या वाढताच रेल्वे तिकिटांची अवैध विक्री करणारे दलाल सक्रिय झाले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील रेल्वे सुरक्षा बलाने ६ ते ८ जुलैपर्यंत विशेष अभियान राबवून १० दलालांना अटक केली. तसेच, १ लाख २५ हजार ३३९ रुपयांची ८७ तिकिटे आणि संगणक हार्डडिस्क जप्त केली.
आरपीएफ कमांडंट आशुतोष पांडेय यांनी ही माहिती दिली. आरपीएफने कोरोना काळात आतापर्यंत ३९ गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यात २२ गांजा तस्करांचा समावेश आहे. याशिवाय ज्वलनशील पदार्थ, अमली पदार्थ यासह विविध प्रकारचा १ कोटी ७० लाख रुपयाचा माल जप्त केला आहे असे पांडेय यांनी सांगितले.
----------
अनाथ मुलांसाठी विशेष कक्ष
आरपीएफने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांची देखभाल करण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षात दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी मुले रेल्वेमध्ये आढळून आल्यास त्यांना या कक्षात ठेवले जाईल. आतापर्यंत अशी मुले मिळून आली नाही, पण गेल्या ६ महिन्यात आरपीएफने घर सोडून पळालेल्या व इतर ३२ मुलांना ताब्यात घेतले. त्यापैकी काहींना त्यांच्या घरी तर, काहींना चाईल्ड लाईनकडे पाठवण्यात आले अशी माहितीही पांडेय यांनी दिली.