नागपूर : उत्तराखंडमधील नैनिताल-कालाधुंगी मार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात नागपूरच्या १० महिला पर्यटक जखमी झाल्या. वृत्त लिहेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, यातील दोघींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघी वगळता इतर ८ जखमींना कालाधुंगीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली. हे वाहन पर्यटकांना घेऊन परत नागपुरात येत होते. नैनितालपासून २ किमी अंतरावर असलेल्या लालमाटिया वळणावर वाहन उलटले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि नागरिकांचे बचाव पथक पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य केले. त्याचबरोबर जखमींना जवळच्या सामुदायिक उपचार केंद्रात नेण्यात आले. तेथून सर्वांना हलद्वानीला पाठवण्यात आले. जखमींमध्ये श्रुती कुलकर्णी, दीपाली विघ्ने, स्वाती राजहंस, कुंदा साखरवाडे, ज्योत्स्ना अंधारे, स्मिता तापस, विजया बर्डे, रुपाली जाधव, भक्ती चिंचोकर आणि माया कौटकर यांचा समावेश आहे. या घटनेत चालक बनारसी लाल सुखरूप आहेत. घटनेची माहिती तातडीने जखमींच्या कुटुंबीयांना देण्यात आली. जखमींचे नातेवाईक कालाधुंगीला रवाना झाले आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटन
‘लोकमत’ने जखमी महिलांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. सर्व महिला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात सेवा बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑफिसमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे सर्व महिला २० मे रोजी नैनितालला गेल्या होत्या. त्या नैनितालहून दिल्लीला जाणार होत्या व तेथून २८ मे रोजी नागपुरात परतणार होत्या. त्यापूर्वीच हा अपघात झाला होता.