लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पन्नास टक्के जळालेली आई आणि तिला विझविण्याच्या प्रयत्नात दोन्ही हात जळालेल्या वडिलावरील उपचाराचा खर्च भागविण्यासाठी दहावर्षीय फुलचंद कचऱ्यातील प्लास्टिक वेचतो. परंतु हे पैसे कमी पडतात. औषध नसल्याने आईला होणाऱ्या वेदना त्याला पाहवत नाही. आता दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आणखी महिनाभर आईवर उपचार चालणार आहे. यामुळे काय करावे, या अडचणीत चिमुकला फुलचंद सापडला आहे.फुलचंद राजेश सोनवणे हे पूर्ण नाव. कुही मांढळ येथील ससेगाव येथे तो राहतो. चौथ्या वर्गात असलेला फुलचंद या आगीच्या घटनेने घाबरून गेला आहे. मात्र हिंमत हरलेली नाही. आईला वाचवायचे आहे हा एकच ध्यास त्याने घेतला आहे. एका सामाजिक सेविकेची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी त्याची आणि ‘लोकमत’ प्रतिनिधीची भेट घालून दिली. फुलचंदला बोलते केल्यावर तो म्हणाला, वडील सुरेश कचऱ्यातून प्लास्टिक वेचतात तर आई शेतमजुरीचे काम करते. घरी एक वर्षाचा लहान भाऊ आहे. घरात वीज नाही. रॉकेलच्या चिमणीच्या प्रकाशात रात्र काढवी लागते. २४ जानेवारी रोजी रात्री सर्वजण झोपले असताना अचानक चिमणी पडली. ज्या भागात आई झोपली होती त्या अंथरुणाने पेट घेतला. तिच्या आरडाओरडाने आम्ही उठलो. बाबांनी पहिले आम्हा दोघांना बाजूला केले आणि आईला हाताने विझविण्याचा प्रयत्न करू लागले. आमच्या आवाजाने शेजारी धावून आले. त्यांनी पाणी टाकून आग विझवली. परंतु आई बरीच जळाली होती. ती ओरडत होती तर बाबांचे दोन्ही हात जळाले होते. मेडिकलमध्ये रात्री २ वाजता आलो. डॉक्टरांनी तपासून आईला बर्न वॉर्डमध्ये भरती केले. वीज मीटर घेण्यासाठी बाबांनी जमा केलेले पाच हजार रुपयातून आईचा कसाबसा औषधांचा खर्च निघाला. परंतु आता पैसे संपले. बाबांच्या दोन्ही हाताला जखम असल्याने ते कचरा वेचायला जाऊ शकत नाही, म्हणून मीच सकाळी उठून रुग्णालयाच्या परिसरात पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स, कचरा जमा करतो आणि विकतो. ४०-५० रुपये मिळतात. ते पैसे जमा करून औषधे आणतो. रुग्णालयातून आईला मिळणाऱ्या जेवणातून मी, लहान भाऊ, वडील कसेतरी पोट भरत होतो. परंतु आता ते मिळणे बंद झाल्याचे फुलचंदने रडत सांगितले. त्याने खिशात औषधांची चिट्ठी दाखवत औषध कुठून आणू असा प्रश्नही केला.लोकमतचे आवाहनघरात आधीच दारिद्र्य असलेले सोनवणे कुटुंब या घटनेमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहे. कचरा वेचून कसाबसा मेडिकलमधील औषधांचा खर्च भागवत आहे. दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न आहेच. या कुटुंबाला समाजाच्या मदतीची गरज आहे.